डॉक्टरांचे रक्षण करणार्‍या कायद्यांमध्ये सुधारणा करून ते सक्षम करावेत ! – IMA President Dr. R. V. Asokan

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येवरून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांचे खुले पत्र !

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष आर्.व्ही. अशोकन्

नवी देहली – डॉक्टरांचे रक्षण करणार्‍या कायद्यांमध्ये सुधारणा करून ते सक्षम केले पाहिजेत. भारतीय न्याय संहिता अधिक सशक्त झाली पाहिजे. भारतद्वेष्ट्या षड्यंत्रांच्या (‘डीप स्टेट’च्या) आहारी जाता कामा नये, असे वक्तव्य ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष आर्.व्ही. अशोकन् यांनी केले. कोलकाता येथे ३१ वर्षीय महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या यांप्रकरणी अशोकन् यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ९ ऑगस्टच्या रात्री कोलकात्यातील प्रसिद्ध आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे ही घटना घडली होती. त्या निमित्ताने अशोकन् यांनी हे खुले पत्र लिहिले आहे.

अशोकन् पुढे म्हणाले की,

१. पीडितेेच्या मृत्यूनंतर १० लाख मेणबत्त्या पेटवल्या गेल्या. युद्धाचे सहस्रावधी ढोल वाजले. प्रत्येक भारतीय कुटुंबाने आपली मुलगी गमावली. मातांना राग अनावर झाला. वडील मूकपणे रडले.

२. कनिष्ठ पदावरील पदव्युत्तर डॉक्टर (रेसिडेंट डॉक्टर) सर्वांत आधी रस्त्यावर उतरले. पुढील ७ दिवस ते झोपले नाहीत. त्यांची जागरूकता आणि अग्नीशक्ती हीच राष्ट्राची आशा आहे. ते आठवड्याला १०० तास काम करतात. त्यांनी विरोधाला जुमानले नाही.

३. डॉक्टर हे अनाथ नाहीत. स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली. डॉक्टरांचे रक्षण करू शकणारे कायदे झाले पाहिजेत.