Russia Ukraine War : युक्रेनने रशियाचा आणखी एक पूल पाडला !
कीव (युक्रेन) – युक्रेन रशियाचा कुर्स्क हा प्रांत कह्यात घेतल्यानंतर तेथील पूल उडवून देत आहे. युक्रेनने आतापर्यंत रशियाचे २ पूल पाडले आहेत. कुर्स्कमध्ये ३ पूल होते. आता एकच पूल शेषा आहे. दुसरा पूल पाडल्यानंतर युक्रेनच्या वायूदलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनी सांगितले की, या पुलाचे धोरणात्मक महत्त्व आहे. तो खंडित झाल्यानंतर रशियाच्या पुरवठा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी सांगितले, ‘कुर्स्क क्षेत्राला ‘बफर झोन’ बनवण्यासाठी आक्रमण करत आहेत.’ ‘बफर झोन’ म्हणजे २ देशांमधील रिकामी जागा. ही जागा कुणीही व्यापत नाही.’
युक्रेनच्या सैन्याने रशियामध्ये ३५ कि.मी. आत घुसून किमान ८२ गावे नियंत्रणात घेतली आहेत. याद्वारे रशियाकडून १ सहस्र १५० चौरस किलोमीटरचा प्रदेश नियंत्रणात घेतला आहे. युक्रेनने अचानक केलेल्या आक्रमणानंतर रशियाच्या २ लाखांहून अधिक नागरिकांना घर सोडून पळून जावे लागले. युक्रेनने रशियाच्या १५० हून अधिक लोकांना पकडले आहे. त्यांपैकी बहुतांश सैनिक आहेत. युक्रेनच्या सैन्याधिकार्याने सांगितले की, रशियाने सीमेवर अनेक सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्यापैकी बरेच लोक लढण्यास सक्षम नाहीत आणि सहजपणे हार मानतात.