बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाचा पिंपरी-चिंचवड येथे विशाल मोर्चा !

मोर्चात सहभागी धर्माभिमानी हिंदू

पुणे – बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या अमानुष हत्या, तसेच हिंदु मंदिरांवरील आक्रमणांच्या निषेधार्थ आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने शहरात विशाल ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ काढण्यात आला. १८ ऑगस्टला सकाळी क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे पुतळा चौक, चिंचवड रेल्वे स्थानक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पिंपरी येथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजप शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह भाजप, शिवसेना या पक्षांचे, राष्ट्रीय स्वयसेवक संघ, बजरंग दल, दुर्गावहिनी आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हिंदूंचा भव्य निषेध मोर्चा

या वेळी मोर्चेकर्‍यांनी विविध मागण्या केल्या. बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या अमानुष हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. सीएए कायद्यानुसार बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध यांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी. पुण्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर आणि बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत ? याचे सर्वेक्षण तातडीने करावे, तसेच त्यांना शोधून त्वरित देशाबाहेर हाकलून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशा मागण्या केल्या.

अतिशय शिस्तबद्ध आणि भव्य मोर्चा

मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत होता, दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. समारोपस्थानी पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

क्षणचित्रे

१. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारकाला अभिवादन करून मोर्चाचा आरंभ

२. मार्गात महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन

३. मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वज डौलात फडकत होता.

४. ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र आणि समारोपात शिववंदना

५. महायुतीचे आमदार, खासदारही मोर्च्यात सहभागी झाले होते.

जागृत हिंदु हाच जगाला धार्मिक जिहादींपासून वाचवू शकेल ! – शंकरजी गायकर, अखिल भारतीय सहमंत्री, विश्व हिंदु परिषद

भारतीय सैनिकांनी विशेषत: मराठा रेजिमेंटने स्वत:चे रक्त सांडून बांगलादेशाची निर्मिती केली आणि त्यांना पाकिस्तानी गुंडांच्या तावडीतून सोडवले; परंतु त्याची कदर त्यांनी राखली नाही. ते आपल्यावरच उलटले आहेत. आतापर्यंत ४ वेळा हिंदूंचे मोठे  हत्याकांड तेथे घडले आहे. जागृत हिंदू हाच जगाला धार्मिक जिहादी लोकांपासून वाचवू शकेल.

महिला आणि सकल हिंदु समाज समन्वय समितीचे प्रशासनाला निवेदनाद्वारे आवाहन !

पुण्यातील कायदेतज्ञ अधिवक्त्या वर्षा डहाळे यांनी बांगलादेश येथील महिलांवर होत असलेले अत्याचार कथन करून सर्वच इस्लामी राजवटीत महिला दुर्लक्षित राहिल्या, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, ही अत्यंत दुःखाची आणि संताप आणणारी गोष्ट आहे, असे नमूद केले. त्यानंतर मोर्च्यात सहभागी झालेल्या महिला आणि सकल हिंदु समाज समन्वय समितीने प्रशासनाला निवेदनाद्वारे आवाहन केले.

दुकानदार, व्यावसायिक यांचे मोर्च्याला उत्स्फूर्त समर्थन !

दुकानदार, व्यावसायिकही मोर्च्याला उत्स्फूर्त समर्थन देत होते. हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे पोचला. तिथे विश्व हिंदु परिषद केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी मोर्चाच्या प्रमुख मागण्या संबंधी माहिती देऊन बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांवर उपस्थितांचे लक्ष वेधले आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.