गोव्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करू ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
पणजी, १८ ऑगस्ट (वार्ता.) – सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी लवकरच एकतर वटहुकूम आणू किंवा पुढील विधानसभा अधिवेशनात कायदा आणू, अशी हमी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे आदी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी पुढे सांगितले. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणी देशभर डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गोव्यातही या प्रकरणाचा निषेध म्हणून डॉक्टरांनी आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री विश्वजीत राणे बोलत होते.
कोलकाता येथील घटना निंदनीय
राणे पुढे म्हणाले, ‘‘कोलकाता येथील घटना निंदनीय आहे. डॉक्टरांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. आरोग्यमंत्री या नात्याने डॉक्टरांना माझा पाठिंबा आहे. डॉक्टरांना आम्ही देवासमान मानतो आणि त्यांना संरक्षण देणे, हे आमचे कर्तव्य आहे. राज्यातील महिला डॉक्टर, परिचारिका आणि अन्य महिला कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा देण्यात येईल. रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची डॉक्टरांनी केलेली मागणी आम्ही पूर्ण करू.’’
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. राजेश पाटील प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि सर्व कॅमेरे कार्यरत आहेत. जानेवारी मासात सर्व कॅमेरे तपासून पाहिले आहेत. या कॅमेर्यांमध्ये ६० दिवसांचे चित्रीकरण सुरक्षित रहाते.’’
गोव्यात आपत्कालीन सेवा सुरळीत
पणजी – कोलकाता येथील घटनेविरुद्धच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभाग १७ ऑगस्ट या दिवशी २४ घंट्यांसाठी बंद ठेवला होता. रविवारी बाह्य रुग्ण विभाग बंदच असतो. यामुळे ही सेवा १९ ऑगस्ट या दिवशी सकाळी चालू होणार आहे. महाविद्यालयातील आपत्कालीन सेवा १६ ऑगस्टपासून आतापर्यंत सुरळीत चालू आहे. यावर डॉक्टरांनी कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. आपत्कालीन सेवेशी निगडित सर्व इतर विभागांतील डॉक्टरदेखील सेवेसाठी उपस्थित होते. या काळात रुग्णवाहिका सेवाही चालू होती. यामुळे डॉक्टरांच्या संपाचा लोकांना त्रास झाला नाही. हे आंदोलन अद्याप संपलेले नसून डॉक्टर महिलेला न्याय मिळेपर्यंत आम्ही आवश्यक पाठपुरावा करणार असल्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजही संपावर
पणजी – कोलकाता येथील घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार, १९ ऑगस्ट या दिवशीही गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत; मात्र बाह्यरुग्ण विभागासह आपत्कालीन सेवा चालू रहाणार आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.