संस्कृतचे मूल्यमापन मतपेढीवरून करू नका !
आज ‘संस्कृतदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘साहित्यिक साहित्याची निर्मिती करतात आणि ते साहित्य भाषेला समृद्ध करते. भाषेचे मूल्यमापन भाषिकांच्या संख्येवरून नव्हे, तर विविधतापूर्ण आणि समाजपयोगी साहित्याच्या निर्मितीवरून ठरते. अशा साहित्यामध्ये संस्कृत भाषेची तुलना कोण बरे करील ? स्वत: सरस्वतीमातेच्या ज्ञानाने आणि बुद्धीदाता श्री गणेशाच्या कृपेने थोर ऋषिमुनींनी विश्वाचे कल्याण साधणार्या समृद्ध साहित्याची निर्मिती संस्कृत भाषेतच केली; परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने संस्कृतला प्रोत्साहन देण्याऐवजी मृतभाषा करण्याचे पाप केले. मुसलमानांच्या मतांसाठी काँग्रेसने उर्दूचे उदात्तीकरण केले; मात्र संस्कृतला डावलले. खरेतर कोणत्याही भाषेचे मूल्यमापन मतपेढीवरून नव्हे, तर तिच्या श्रेष्ठत्वावरून करण्यात यायला हवे. काँग्रेसची ही चूक आताच्या केंद्र सरकारने सुधारावी. यासाठी केवळ जागतिक संस्कृतदिनाचा सोपस्कार न करता संस्कृत बळकट करण्यासाठी शासनाने योगदान द्यावे !
संकलक : श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई. (१८.८.२०२४)
१. अल्पभाषिक तरी संस्कृतच सर्वश्रेष्ठ !
संस्कृत भाषेचे व्याकरणकार ऋषि पाणिनी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘जागतिक संस्कृतदिन साजरा’ केला जातो. वर्तमानकाळात संस्कृत बोलणारे आणि ती समजणारे यांची संख्या अत्यल्प आहे. असे असले, तरी संस्कृत भाषेचे महत्त्व किंचितही न्यून होत नाही. याचे कारण सनातन धर्मातील वेद, उपनिषदे आणि अन्य प्राचीन धर्मग्रंथांची निर्मितीच संस्कृत भाषेत झाली आहे. भाषा ही संस्कृतीचे वहन करते. त्यामुळे पाश्चात्त्यांनी अन्य देशांवर स्वत:चे साम्राज्य स्थापन करतांना स्वभाषेचाही प्रभाव पाडला. भारत स्वतंत्र झाल्यावरही पाश्चात्त्यांचा प्रभाव अद्यापही भारतियांवर आहे. महाराष्ट्रात संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ चालू करण्यात आला; मात्र त्याचे अनुदान रखडवणे, वर्षानुवर्षे पुरस्कार न देणे, अशा प्रकारे संस्कृत भाषेची अवहेलना सर्वच राजकीय पक्षांच्या काळात झाली. उर्दू भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मात्र सरकारकडून प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. सर्वश्रेष्ठ साहित्य असूनही मतपेढीकडे पाहून संस्कृतची ही उपेक्षा होत असेल, तर हे संस्कृतचे नव्हे, भारतियांचे दुदैव आहे.
२. पुरस्काराची निवड आणि स्वरूप !
संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१२ पासून ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ चालू केला. महाराष्ट्र सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठीचे प्रशासकीय कामकाज नागपूर येथील कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय करते, तर पुरस्कार्थींची निवड उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून होते. प्राचीन संस्कृत पंडीत, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत अभ्यासक अन् संस्कृतचे प्रचारक आदी ८ जणांना हा पुरस्कार दिला जातो. यातील प्रत्येकाला २५ सहस्र रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याउलट विविध सांस्कृतिक क्षेत्रातील १२ जणांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी १ लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि हे पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. रकमेवरून पुरस्कारचे मूल्य ठरत नसले, तरी अन्य पुरस्कारांच्या तुलनेत सरकारकडून संस्कृतला तिला जाणारा दुजाभाव योग्य नाही.
३. स्मरणपत्रे पाठवूनही सरकारचे दुर्लक्ष !
वर्ष २०१५ ते २०२१ या ६ वर्षांचे रखडलेले ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ वर्ष २०२१ मध्ये एकत्रित देण्यात आले. त्या वेळी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने पुरस्कार वितरण आणि कार्यक्रमाचे आयोजन यांसाठी १८ लाख १७ सहस्र ९५८ रुपये इतका व्यय केला. ही रक्कम राज्य सरकारने अद्याप विश्वविद्यालयाला दिलेली नाही. पुरस्काराची रक्कम प्राप्त व्हावी, यासाठी विश्वविद्यालयाने सरकारला ३ स्मरणपत्रेही पाठवली; मात्र अद्याप अनुदान मिळालेले नाही. याउलट उर्दू घरे आणि उर्दू अकादमी यांसाठी राज्य सरकारने वर्ष २०१५ ते २०२४ या कालावधीत ३४ कोटी ८५ लाख १५ सहस्र रुपये अनुदान दिले आहे. यासह महाराष्ट्रात उर्दू भाषेच्या प्रचारासाठी उर्दू घरेही बांधण्यात आली आहेत. मतांसाठी उर्दूचे टोकाचे लांगूलचालन आणि संस्कृतचा उपहास आणखी किती दिवस चालू रहाणार ?
४. ज्ञानभाषा, देवभाषा, मोक्षदायिनी !
सर्वच क्षेत्रांतील दुर्लभ ज्ञान केवळ आणि केवळ संस्कृतमुळे समस्त मानवजातीला प्राप्त झाले. हे ज्ञान सद्यःस्थितीत विविध भाषांतून प्रचारित झाले असले, तरी त्याची उत्पत्ती संस्कृतमधून झाली आहे. ‘देवभाषा’ म्हणून संस्कृतचा गौरव होत असला, तरी या भाषेला गंगामातेप्रमाणे ‘मोक्षदायिनी’ही म्हणता येईल; कारण मोक्षप्राप्त करून देणारे गूढज्ञान संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे संस्कृतविषयी आपण जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तितकी अल्पच ठरेल. केवळ पुरस्काराची रक्कम वाढवून किंवा प्रतिवर्षी पुरस्कार प्रदान करून संस्कृत भाषा बळकट होणार नाही. संस्कृतसारख्या समृद्ध भाषा सद्यःस्थितीत परीक्षेत गुण मिळवण्यापुरती मर्यादित झाली आहे. या ज्ञानभाषेचा अभ्यास भारतीय जेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी करतील, तेव्हा केवळ भारत नव्हे, विश्व समृद्ध होईल. त्यामुळे संस्कृत भाषा केवळ वेदाध्ययन आणि पौरोहित्य यांपुरती मर्यादित न रहाता सर्वसामान्यांनाही ती आपली वाटेल, यासाठी भारत सरकारने प्रयत्न करायला हवेत.