भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म, हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने, दृश्य आणि अदृश्य विश्व हे केवळ परमात्म्याचेच स्वरूप, पिंडाला कावळा शिवणे अन् न शिवणे यांमागील अध्यात्मशास्त्र, विश्व उत्पन्न करून ते चालवणारा विधाता आणि ईश्वरनिर्मित वेद अन् कर्तव्याचे असणारे सामान्य ज्ञान’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक ३७) – प्रकरण ६
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/825227.html
१०. धर्माचे द्वैविध्य : प्रवृत्ती आणि निवृत्ती !
वेदोक्त धर्म हा प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा २ प्रकारचा आहे. असा का ?; कारण आपण प्रत्येक जण २ घटकांनी बनलेले आहोत. शरीर आणि आत्मा. शरिराचा उत्कर्ष, म्हणजे जगातील व्यावहारिक उत्कर्ष. शरीर निरोगी असणे, कुटुंब समृद्ध असणे, ऐश्वर्य लाभणे, संपत्ती भरपूर मिळणे, घरदार, मानमरातब, प्रतिष्ठा ही सारी भौतिक समृद्धी आहे. ती प्रवृत्तीमार्गाने लाभते. अभ्युदयासाठी प्रवृत्तीमार्ग, दुसरा घटक म्हणजे आत्म्याची उन्नती कशी ?
आपण जी कर्मे करतो, त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. अर्थात् आपल्याला, म्हणजे आत्म्याला. देह हा माझा आहे. हात-पाय, नाक-डोळे हे सारे माझे आहेत. तो ‘मी’, म्हणजे आत्मा हा देहाचा मालक आहे. त्यामुळे माझा एक हात गेला, एक डोळा गेला, तर ते देहाचे अल्प झाले, माझे नाही. मी आहे तेवढाच आहे. पाय जाण्याने शरीर लांडे होते, ‘मी’ नाही. मग माझी खरी उन्नती माझ्या आत्मिक कल्याणात आहे. आत्म्याची उन्नती या देहाने केलेल्या कर्मांवर अवलंबून आहे; म्हणून हा देह भौतिक समृद्धी किंवा स्वास्थ्यासाठी, वाटेल तसे अधर्माने वागणार नाही, हे मी पाहिले पाहिजे. त्याला वाममार्गापासून आवरले पाहिजे. गाडीचे इंजिन गाडीला पळवते. ॲक्सिलेटर वेग वाढवतो; पण गाडीने कसे, कुठे, किती वेगाने चालावे, हे काम क्लच, गियर, ब्रेक यांचे आहे. हे खरे तर गाडीच्या भन्नाट पळण्याला अडथळा करत असतात; पण तेच त्यांचे काम आहे. हा निवृत्तीमार्ग आहे. मन हे ओढाळ (अनिर्बंध) गुरु, परधन परकामिनीकडे धावे. त्या ओढाळ मनाला आवरण्याचे काम परमार्थाचा विचार करतो. तो त्याला धावण्यापासून निवृत्त करतो; म्हणून धर्म हा ऐहिक ऐश्वर्य अवश्य मिळवून देतो; पण पापाचरणाने नव्हे.
११. तुकाराम गाथेतील महत्त्वपूर्ण ओव्या !
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेच करी।। – तुकाराम गाथा, अभंग २८५४, ओवी १
अर्थ : योग्य मार्गाने पैसा मिळवावा; पण त्या पैशालाच लिप्त राहू नये. अलिप्तपणाने तो खर्च करावा.
असे केल्याने,
‘उत्तमचि गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीव खाणी।।’ – तुकाराम गाथा, अभंग २८५४, ओवी २
अर्थ : अशा जिवाला उत्तम गती लाभेल आणि उत्तम सुखोपभोगांची प्राप्ती होईल.
१२. इतर पंथांचे केंद्र परमेश्वर, तर हिंदु धर्माचे केंद्र मनुष्य असणे
इतर सर्व पंथांत परमेश्वराचा विचार आहे. परमेश्वरकृपेचा भक्तीमार्गही आहे; पण आचारमार्गाचा विचारच नाही; म्हणून इतर सर्व पंथांचे केंद्र परमेश्वर आहे. हिंदु धर्माचे केंद्र मनुष्य आहे. मी कसेही वागलो आणि ‘देव’, ‘देव’ केले की, देव माझा उद्धार करील’, असे हिंदु धर्म मानत नाही.
१३. स्वकर्तव्य टाळून नामजप करणारा पापी होय !
परमभगवद्भक्त नारदमुनी म्हणतात,
‘‘अपहाय निजं कर्म कृष्णकृष्णेति वादिनः।
ते हरेर्द्वेषिणः पापाः धर्मार्थं जन्म यद् हरेः।।’’
अर्थ : स्वकर्म सोडून केवळ ‘कृष्ण कृष्ण’ म्हणणारे लोक भक्त नसून हरिद्रोही आहेत; कारण साक्षात् श्रीहरि स्वतः धर्मसंस्थापनेचे कर्म करण्यासाठी मृत्यूलोकात अवतरतात.
स्वकर्तव्य सोडून किंवा टाळून जो ‘हरि’, ‘हरि’ करत बसेल, तो परमेश्वराचा द्वेष्टा आहे आणि ब्रह्महत्येसारखा पापी आहे.
१४. ज्ञानी असण्याचे लक्षण
स्वकर्तव्याचरण हा कर्मयोग ! त्यातून ईश्वराचे नित्य स्मरण हा भक्तीयोग ! ‘तो परमात्माच सर्व जगताचे सर्वस्व आहे, किंबहुना ‘कर्ता करविता तोच आहे,’ असा निर्मळ, निखळ अकर्तृत्वभाव हे ज्ञानाचे लक्षण आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।’, म्हणजे ‘हे संपूर्ण जगच विष्णुमय आहे. हाच विष्णुभक्तांचा धर्म आहे. यामुळे भेदभाव करणे, हा भ्रम असून ते कर्म अपवित्र आहे’, अशी उदार बुद्धी आणि सर्वांभूती भगवद्भाव हे ज्ञान्याचे लक्षण आहे. ज्ञानी म्हणजे विद्वान किंवा पंडित नव्हे. विद्वान असूनही ज्ञानी नसलेले अनेक आहेत. ‘सारे विश्व हे त्या परमात्म्याच्याच दृग्गोचर आविष्काराचे दर्शन आहे’, असे जाणून जीवन व्यवहार करणे हे ज्ञान ! ज्ञानमार्गाने जो मला (म्हणजे) पुरुषोत्तमाला भेटतो, तो सदाचारी पुरुष किंवा सर्वज्ञ समजावा. तो म्हणजेच भक्तीची परिसीमा होय.
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/826598.html