रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्या साधिकांना आलेल्या अनुभूती

१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. श्रीमती सुषमा पराते, नागपूर

श्रीमती सुषमा पराते

१ अ. ध्यानमंदिरात नामजप एकाग्रतेने होऊन मन स्थिर झाल्याने कधीही न अनुभवलेली शांतता अनुभवता येणे : ‘ध्यानमंदिरात नामजप करायला बसल्यावर ‘माझ्या संपूर्ण देहामध्ये चैतन्य वाढत आहे’, असे मला जाणवले. केवळ १० मिनिटांत माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला. त्यानंतर माझे मन स्थिर आणि शांत झाले. ‘माझ्या आजूबाजूला कुणीही नसून मी केवळ मनात खोलवर शांतता अनुभवत होते.’ (१९.१.२०२४)

२. सौ. सुरेखा पाटील, पुणे

सौ. सुरेखा पाटील

२ अ. ‘आश्रमातील चैतन्यामुळे माझा देह आणि मन यांवरील सर्व आवरण निघून माझे मन शांत अन् पूर्ण निर्विचार झाले.

२ आ. आश्रमात पुष्कळ आनंद अनुभवता येणे : घरी असतांना माझ्या मनामध्ये पुष्कळ अनावश्यक विचार यायचे. आश्रमात आल्यावर माझ्या मनाला पुष्कळ शांत वाटले. माझे मन एकाग्र झाले. ‘श्वासातून किती चैतन्य घेऊ आणि काय करू’, असे मला वाटले. आश्रमात मला पुष्कळ आनंद अनुभवता आला.

२ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दाखवलेल्या प्रयोगांनंतर माझे शरीर हलके होऊन मला पुष्कळ चैतन्य मिळाले. (२१.१.२०२४)

३. सौ. सुनीता उत्तम दीक्षित, माळशिरस, सोलापूर.

सौ. सुनीता उत्तम दीक्षित

३ अ. सुगंधाची अनुभूती येणे

१. ‘१८.१.२०२४ या दिवशी आरंभी सत्संगसेवक सर्वांना सूचना देत असतांना मला अष्टगंधाचा सुगंध आला.

२. १९.१.२०२४ या दिवशी मी चेहर्‍यासमोर तळहाताची मुद्रा करून नामजप करत असतांना मला पुन्हा सुगंधाची अनुभूती आली.

३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रति असलेल्या भावामुळे विविध अनुभूती येणे : शिबिराला आरंभ झाल्यावर ‘परात्पर गुरुमाऊलींचे पावन श्रीचरण माझ्या मस्तकावर आहेत’, असा भाव माझ्यात निर्माण झाला. त्या वेळी मला गारवा जाणवला. ‘माझे स्वभावदोष आणि अहं नष्ट होत आहेत’, असे मला जाणवले. ‘परात्पर गुरुमाऊलींकडून चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि ते माझ्या सहस्रारचक्रात जात आहे’, असेही मला जाणवले.’

‘परात्पर गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अपार कृपेमुळे मला रामनाथी (गोवा) येथील भूवैकुंठरूपी सनातन आश्रमातील शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’ (२०.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक