अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ! – डॉ. संजय उपाध्ये, ज्येष्ठ प्रवचनकार
चिंचवड (पुणे) येथे ‘गांधीपेठ तालीम मित्रमंडळा’च्या वतीने व्याख्यान !
पुणे – अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे अनेक गोष्टींसाठी सवलत मिळाली आहे. त्याचा वापर करतांना विवेक आणि तारतम्य पाळायलाच हवे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले. ते चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात ‘गांधीपेठ तालीम मित्रमंडळा’कडून आयोजित ‘मन करा रे प्रसन्न !’ या मालिकेतील ‘स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ ?’ या विषयावर बोलत होते.
डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले की, आपल्या परंपरा आणि प्रतीके यांच्यामागे शास्त्रीय विचारांची बैठक आहे. आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणतो, त्यातील सर्वच तत्त्वांचे पालन होते असे नाही. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र म्हणून आम्ही स्वतंत्र झालो असलो, तरी त्यासोबत येणारी कर्तव्ये आणि दायित्व आम्ही पाळतो का ?, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.