‘ससून’मधील आधुनिक वैद्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल !
पुणे – कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या सूत्रावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यात ससून रुग्णालयाचाही समावेश आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी (आधुनिक वैद्यांनी) ५ दिवसांपासून संप पुकारला आहे. यामध्ये एम्.बी.बी.एस्. पदवीच्या २५० विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. त्यामुळे ‘ससून’च्या रुग्णालयातील रुग्णसेवेची हानी होत आहे. रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांची संख्या न्यून होण्यासह शस्त्रक्रियांची संख्या न्यून होत आहे. मोठ्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडत आहेत. परिणामी रुग्ण आणि नातेवाईक यांचे हाल होत आहे.
‘ससून रुग्णालया’त ५६६ निवासी आधुनिक वैद्य आहेत. त्यांपैकी केवळ १८० आधुनिक वैद्य अत्यावश्यक (तातडीच्या) सेवेसाठी कार्यरत असून उरलेले सर्व संपामध्ये सहभागी झाले आहेत. शिक्षकांच्या साहाय्याने सध्या रुग्णसेवा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थी संपावर असल्याने महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज ठप्प झाले आहे.
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले, ‘‘संपामुळे बाह्यरुग्ण विभागासह अन्य सेवांवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक विभागातील सेवा आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया व्यवस्थित चालू आहेत.’’