गणेशोत्सवाच्या निमित्ताने झांज पथक चालू !
हिंदु एकता आंदोलन, वसगडे यांचा उपक्रम !
सांगली, १७ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु एकता आंदोलन, वसगडे यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु एकता आंदोलनाच्या ८० कार्यकर्त्यांनी झांज पथक चालू केले आहे. पथकाच्या पूजनाचा शुभारंभ आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या वेळी ते म्हणाले की, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवात हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु संस्कृतीचे पावित्र्य नष्ट करणार्या इतर वाद्यांना फाटा देऊन झांज, लेझीम, तलवार, दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा. बांगलादेशातील परिस्थिती पहाता हिंदु समाजाने हिंदु सण-उत्सवकाळात हिंदु समाजाची एकजूट दाखवावी.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे अध्यक्ष श्री. रोहित जाधव, उपाध्यक्ष श्री. पांडुरंग देवकर, हिंदु एकता आंदोलनाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, श्री. मनोज साळुंखे, विभागध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार यांसह सर्वश्री अवधूत जाधव, सोमनाथ गोटखिंडे, प्रदीप निकम, नीलेश चव्हाण, धोंडीराम पाटील, प्रतीक जाधव आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.