अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीकोनातून हस्तरेषाशास्त्र !

‘हस्तरेषाशास्त्र हे तळहातांवरील रेषांवरून व्यक्तीच्या जीवनाचे दिग्दर्शन करणारे प्राचीन शास्त्र आहे. हस्तरेषाशास्त्राद्वारे व्यक्तीचा स्वभाव, आरोग्य, बुद्धी, विद्या, कार्यक्षेत्र, प्रारब्ध आदी अनेक गोष्टींचा बोध होतो. प्रस्तुत लेखात अध्यात्माशी संबंधित गोष्टींचा विचार हस्तरेषाशास्त्रात कसा केला जातो, याविषयीचे विवेचन मांडण्यात आले आहे.

१. तळहातांवरील रेषांवरून व्यक्तीची पूर्वजन्मातील आणि वर्तमान जन्मातील साधना समजणे

तळहातांवरील रेषांवरून व्यक्तीची पूर्वजन्मातील आणि वर्तमान जन्मातील साधना समजू शकते. हे प्रामुख्याने तळहातावरील भाग्य रेषेवरून (अध्यात्म रेषेवरून) लक्षात येते; मात्र त्यासमवेत तळहातावरील चंद्र आणि गुरु या ग्रहांचे उंचवटे, बोटे, मणिबंध (मनगटावरील रेषा) आणि तळहातावरील इतर रेषा हे घटक विचारांत घ्यावे लागतात. तसेच ‘व्यक्तीचे जीवन कसे चालू आहे ? ती सकारात्मक आणि उत्साही आहे का ? ती जीवनातील आव्हानांकडे संधी म्हणून पहाते का ? तिच्या विचारांमध्ये सुस्पष्टता आहे का ? ती बुद्धीने निर्णय घेते कि ती भावनाप्रधान आहे ?’, इत्यादी सूत्रे विचारांत घेणे अत्यावश्यक असते.

२. ‘व्यक्तीने अध्यात्माकडे वळणे’ या घटनेचा हस्तरेषाशास्त्राद्वारे बोध होऊ शकणे

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला

सामान्यतः दुःख, जिज्ञासा, भक्ती किंवा जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग इत्यादी अनेक कारणांमुळे लोक अध्यात्माकडे वळतात. अध्यात्माकडे वळण्यासाठी त्या वेळी असलेली व्यक्तीची इच्छा, क्षमता आणि तळमळ हे घटक पुष्कळ महत्त्वाचे असतात अन् त्यांनुसार देव तसे प्रसंग व्यक्तीच्या जीवनात घडवून आणतो. ‘अध्यात्माकडे वळणे’, हे व्यक्तीच्या जीवनातील मोठे परिवर्तन असून हस्तरेषाशास्त्राद्वारे याचा बोध होऊ शकतो.

३. हस्तरेषाशास्त्रीय संशोधनाद्वारे ‘बालकाचा जन्म उच्च लोकांतून झाला आहे का ?’, हे ओळखणे शक्य असणे

दैवी बालके (टीप) या जगासाठी एक आशेचा किरण आहेत आणि त्यांना येथे अत्यंत महत्त्वाचे कार्य करायचे आहे. ही बालके जेव्हा कार्य करतील, तेव्हा तो काळ पृथ्वीवरील ‘सत्ययुग’ असेल. यापूर्वी मी काही बालकांचे हात पाहिले आहेत; त्यावरून ‘ती बालके दैवी असून त्यांच्या जन्माचा विशिष्ट उद्देश आहे’, हे लक्षात येते. या विषयावर अधिक संशोधन केल्यास तळहातांवरील रेषांवरून ‘बालकाचा जन्म उच्च लोकांतून पृथ्वीवर झाला आहे का ? हे समजू शकेल’, असे मला वाटते.

टीप – दैवी बालके म्हणजे स्वर्ग, महर्, जन आदी उच्च लोकांतून जन्मलेले जीव. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अशा १ सहस्रांहून अधिक दैवी बालकांना सूक्ष्म-परीक्षणाद्वारे ओळखले आहे.

३ अ. जन्मानंतर त्वरित बाळाचा हात पाहिल्यास ‘त्याचा जन्म कोणत्या लोकातून झाला आहे ?’, हे समजणे शक्य असणे : मी नुकत्याच जन्मलेल्या बाळाचाही हात पाहिला आहे. त्याच्या तळहातावर गतजन्मातील जीवनाचा आलेख दर्शवणार्‍या रेषा होत्या. त्याच्या हातावरील रेषा त्याचा साधनामार्ग दर्शवत होत्या. २ ते ३ मासांनी या रेषा हळूहळू नष्ट होत गेल्या आणि या जन्मातील संस्कारांनुसार नवीन रेषा निर्माण झाल्या. जन्मानंतर त्वरित बाळाचा हात पाहिल्यास ‘त्याचा जन्म कोणत्या लोकातून झाला आहे आणि त्याच्या या जन्माचा उद्देश काय आहे ?, हे समजू शकेल’, असे मला वाटते.

४. हस्तरेषांवरून ‘व्यक्तीला पूर्वजांचा किंवा अनिष्ट शक्तींचा त्रास आहे का ?’, हे समजणे

यासाठी तळहातावरील चांगल्या अन् सदोष रेषा, तळहाताचा रंग, तळहातावर विविध रंगात असलेले भाग, बोटांचा आकार, अंगठ्याचा आकार, तळहातावर बिंदूदाबन करतांना शरिरात होणार्‍या वेदना आदी सर्व घटकांचा विचार करावा लागतो. त्यामुळे शरिराच्या कोणत्या भागात त्रास अधिक आहे, हे शोधता येऊ शकते. वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या व्यक्तींच्या तळहातांवर विविध रंगांचे डाग असतात. ‘वाईट शक्तींचा त्रास न्यून झाल्यावर हे डाग नाहीसे होतात’, असे माझ्या पहाण्यात आले आहे.

४ अ. अतृप्त पूर्वज हे त्यांच्या वंशजांच्या गुणसूत्रांत (टीप) स्थान निर्माण करत असल्यामुळे अनुवांशिक आजार एका पिढीतून पुढच्या पिढीत जाणे : अनिष्ट शक्ती शरिराच्या कमकुवत भागावर किंवा मनात अयोग्य विचार आल्यास व्यक्तीच्या मनावर आक्रमण करतात. पूर्वज हे सामान्यतः त्यांच्या वंशजांच्या गुणसूत्रांत स्थान निर्माण करतात आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या इच्छा पूर्ण करतात. पूर्वज हे स्वतःला पुढील गती मिळण्यासाठी त्यांच्या वंशातील जी व्यक्ती साधना करत असेल, तिची चांगली कर्मे प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. पूर्वजांना त्यांच्या वंशजांच्या गुणसूत्रांत स्थान निर्माण करणे सोपे असते. अशा प्रकारे अनुवांशिक आजार एका पिढीतून पुढच्या पिढीत जातात.

टीप – सजिवांच्या पेशीकेंद्रकातील अनुवांशिक गुण वाहून नेणारा घटक म्हणजे ‘गुणसूत्र’.

४ आ. साधनेमुळे घराण्यातील व्यक्तींच्या गुणसूत्रांत सुधारणा होऊन अनुवांशिक दोष पुढच्या पिढीत न जाणे : एखादी व्यक्ती जोपर्यंत साधना, शांतीपाठ किंवा श्राद्धादी कर्मे करत नाही, तोपर्यंत पूर्वज तिच्या शरिरात अडकून रहातात. त्यामुळे कुणीतरी म्हटले आहे, ‘जेव्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती साधना करू लागते किंवा संतपद प्राप्त करते, तेव्हा तिच्या घराण्यातील ७ पिढ्यांना त्याचा लाभ होतो.’ साधनेमुळे घराण्यातील व्यक्तींच्या गुणसूत्रांत सुधारणा होते आणि त्यामुळे अनुवांशिक दोष पुढच्या पिढीत जात नाहीत.

४ इ. समाजातील अधिकाधिक लोकांनी साधना केल्यास त्यांचा आध्यात्मिक त्रास दूर होऊन पृथ्वीवर सत्ययुग येऊ शकणे : अशा प्रकारे समाजातील अधिकाधिक लोकांनी साधना केल्यास त्यांचे पूर्वज मुक्त होतील आणि त्यांच्या येणार्‍या पिढ्यांत अनुवांशिक दोष निर्माण होणार नाहीत, तसेच लोक वाईट शक्तींच्या त्रासांपासून मुक्त होऊन पृथ्वीवर खर्‍या अर्थाने सत्ययुग अवतरेल.

५. साधना करणार्‍या व्यक्तीच्या तळहातांवरील रेषा सामान्य (साधना न करणार्‍या) व्यक्तीच्या तुलनेत वेगाने पालटत असणे

सामान्यतः तळहातांवरील रेषांमध्ये होणारे पालट हे व्यक्तीची विचारप्रक्रिया, विचारांचा कालावधी आणि त्यांच्यातील सातत्य यांमुळे घडून येतात. हा पालट होण्यास किमान ६ मास ते २ वर्षे इतका कालावधी लागतो. साधना करणार्‍या व्यक्तीच्या अंतर्मनातील संस्कार साधनेमुळे नष्ट होत असतात. त्यामुळे तिच्या तळहातांवरील रेषा सामान्य (साधना न करणार्‍या) व्यक्तीच्या तुलनेत वेगाने पालटतात.

५ अ. जीवनाचा अंत निकट आल्यावर तळहातांवरील रेषांमध्ये पुष्कळ पालट होणे किंवा त्या नष्ट होणे : व्यक्तीच्या जीवनाचा अंत निकट आल्यावर तिच्या तळहातांवरील रेषांमध्ये पुष्कळ पालट होतात किंवा त्या नष्ट होतात. व्यक्तीचा देवाण-घेवाण हिशोब संपत आल्याने आणि साधनेमुळे अंतर्मनातील संस्कार नष्ट झाल्याने असे घडते.’

– हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला, ऋषिकेश, उत्तराखंड. (१७.४.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.