भावसत्संग ऐकल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर (‘ऑरा’वर) सकारात्मक परिणाम होतात !

भावसत्संगाचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

‘वर्ष २०१६ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या साधकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संगाचा आरंभ झाला. आठवड्यातून एकदा (प्रत्येक गुरुवारी) असणार्‍या या भावसत्संगात आध्यात्मिक कथा आणि त्यांचा भावार्थ सांगितला जातो. हा भावसत्संग सनातनच्या भाव असलेल्या साधिका घेतात. भावसत्संगात भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करावेत? साधना वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ? यांसंदर्भात मार्गदर्शनही केले जाते. या भावसत्संगामुळे अनेक साधकांना साधनेत साहाय्य झाले आहे. ‘भावसत्संग घेणे किंवा तो ऐकणे यांचा साधकांतील सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतात ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात.

१. चाचणीतील नोंदींचे विवेचन

या प्रयोगात भावसत्संग घेणार्‍या २ साधिका आणि भावसत्संग ऐकणारे ४ साधक-साधिका सहभागी झाले होते. भावसत्संगापूर्वी आणि भावसत्संगानंतर सर्वांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील नोंदीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

अ. भावसत्संग ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधिकांमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नाहीशी झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली.

आ. भावसत्संग ऐकल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढली.

इ. भावसत्संग घेणार्‍या साधिकांतील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.

निष्कर्ष : ‘भावसत्संग ऐकल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होतात’, हे यातून स्पष्ट झाले.

२. चाचणीतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

श्री. गिरीश पाटील

२ अ. भावसत्संग ऐकण्याचा चाचणीतील सर्वांवर (त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) सकारात्मक परिणाम होण्याचे कारण : भावसत्संगातील विषय साधनेसाठी प्रोत्साहन देणारे असतात. भावसत्संगामध्ये सांगितल्या जाणार्‍या आध्यात्मिक कथांतून श्रोत्यांची अंतर्मुखता वाढते आणि त्यांच्या मनात ईश्वराप्रती भक्तीभाव निर्माण होतो. या भावसत्संगातून भाव, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित झाली. त्यामुळे चाचणीतील सर्वांभोवती सात्त्विक स्पंदनांचे वलय निर्माण झाले. भावसत्संग ऐकण्यापूर्वी ज्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा होती ती नाहीशी झाली आणि सर्वांमधील सकारात्मक ऊर्जा वाढली.

२ आ. भावसत्संग घेणार्‍या साधिकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात वाढण्यामागील कारण : भावसत्संग घेण्यार्‍या साधिकांमध्ये मूलतः ईश्वराप्रती भाव आहे. राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संग घेणे, ही समष्टी सेवा दोघींनी भावपूर्ण केल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात वाढली.

थोडक्यात ‘व्यक्तीने भक्तीभाव निर्माण करणारे भावसत्संग ऐकणे तिच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहेत’, हे या चाचणीतून स्पष्ट झाले.’

– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.७.२०२४)

इ-मेल : mav.research2014@gmail.com

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक