‘राजे फाऊंडेशन’च्या वतीने तोरणागडावर गड संवर्धन आणि वृक्षारोपण !
मुंबई – छत्रपती शिवरायांनी १६ व्या वर्षी मोगलांकडून श्री तोरणागड (प्रचंडगड) जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पायथ्याशी, तसेच वेल्हे गाव परिसरात ५० वृक्ष लावून ‘राजे फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या वतीने गड संवर्धन आणि वृक्षारोपण मोहीम पार पडली.
श्री तोरणा गडाची पायवाट, वरील महादरवाजा येथे स्वच्छता करण्यात आली. झुंजार माची, बुधला माची, लकडखाना परिसर आणि हत्तीचा बुरुज आदी ठिकाणी शेवाळ अन् तृण काढण्यात आले. मेंगाईदेवीच्या मंदिराची आणि पाण्याच्या तलावाची स्वच्छता करण्यात आली. डोंगर माथ्यावर झाडांच्या मुळांमुळे डोंगराची माती घट्ट पकडून ठेवण्यास साहाय्य होते. त्यामुळे डोंगरावरील माती किंवा डोंगर ढासळत नाही आणि गडदुर्ग सुरक्षित रहातात; म्हणून वृक्षारोपणाचा उद्देश होता. या उपक्रमानंतर संस्थेच्या सर्व शिलेदारांनी एकत्रित येऊन महाराजांसमोर नतमस्तक होत घोषणा दिल्या.
राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) ही संस्था वर्ष २०१२ पासून कार्यरत आहे. छत्रपती शिवरायांच्या शिवसंस्कारांचा प्रसार करणे, हे संस्थेचे ध्येय आहे. संस्थेने अनेक समाजोपयोगी कार्य केलेली आहेत.
रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शिवजन्मोत्सव सोहळा, शिववक्तृत्व स्पर्धा असे अनेकविध कार्यक्रम संस्था आयोजित करत असते.
या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष सिद्धांत पिसाळ, उपाध्यक्ष योषित नागावकर, मयुरेश पाटील, सचिव रोहित पिसाळ, उपसचिव संतोष पवार, खजिनदार पंकज कोल्हे, उपखजिनदार अमित जाधव, कार्यकारणी सदस्य अशोक कुडले, गजानन सावंत, प्रवीण पड्याल, सुदर्शन देसाई, प्रशांत गुप्ता,महादेव जगदाळे, रवींद्र सडेकर, निलेश कांबळे, अनिकेत पवार आदी पदाधिकारी, तसेच मुंबई, पुणे, येथून जवळपास ५० हून अधिक शिलेदार उपस्थित होते.