थोडक्यात : ३ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार !, मालकाने बाटलीत लघुशंका दिल्याचा तरुणींचा बनाव !….
३ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार !
आरोपीला नोकरीतून काढून टाकण्यासाठी शालेय प्रशासनाचा पालकांनी पाठपुरावा घ्यावा !
बदलापूर – येथील नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणार्या ३ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शाळेतील स्वच्छता कर्मचारी असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाळेत ‘दादा’ नावाने ओळखल्या जाणार्या एकाने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याचे मुलींनी सांगितले. पडताळणीनंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
साहाय्यक उपनिरीक्षकामुळे ६०० गुन्हेगारांवर कारवाई !
सर्वत्रचे पोलीस अशा प्रकारे कृतीशील कधी होणार ?
नागपूर – साहाय्यक उपनिरीक्षक राजेश पैडलवार (वय ५६ वर्षे) यांनी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटीज (एम्पीडीए) कायद्याची कठोर कार्यवाही करून अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्यामुळे ६०० हून अधिक गुन्हेगारांना शिक्षा झाली, तर पुष्कळ गुन्हेगारांना अटक झाली. खटला सिद्ध करतांना उत्तम मसुदा करणे, रणनीती ठेवून भक्कम खटला उभा करणे यादृष्टीने ते प्रयत्न करतात.
मालकाने बाटलीत लघुशंका दिल्याचा तरुणींचा बनाव !
वसई – येथे एका कारखान्यात काम करणार्या ३ तरुणींनी त्यांच्या पाण्याच्या बाटलीत मालकाने लघुशंका भरून दिल्याची तक्रार केली होती. मालकाने वेतन न दिल्याने संतापून तरुणीही हे कृत्य केले असल्याचे चौकशीअंती सिद्ध झाले.
ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता
ठाणे, १७ ऑगस्ट (वार्ता.) – ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला १६ ऑगस्टला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे योजनेला संमती मिळाली असून लवकरच ती मार्गी लागेल. यामुळे शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल. १२ सहस्र २०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात २२ स्थानके आहेत. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाईल.
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के !
पालघर – येथे १७ ऑगस्टला पहाटे ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. डहाणू, गांजा, कासा येथे ३.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले.
इनॉर्बिट मॉलमध्ये बाँबची धमकी !
वाशी (नवी मुंबई) – येथील रेल्वेस्थानक परिसरात असणार्या इनॉर्बिट मॉलमध्ये बाँब ठेवल्याच्या धमकीचा मेल आला होता. त्यामुळे संपूर्ण मॉल रिकामा करून पडताळणी चालू होती.
याच पार्श्वभूमीवर पनवेल येथील ओरायन मॉल येथेही पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत होती.