मंदिरामध्ये भाविक येतात, मंदिर परिसर आणि मंदिरे स्वच्छ ठेवा !
पुणे दौर्याच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना
पुणे – मंदिर परिसर स्वच्छ ठेवा. मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर इतके भव्य आहे; परंतु प्रवेशद्वाराजवळील कचरा उचलला नाही का ? कुणीही असले, तरी स्वच्छता ठेवली पाहिजे, अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर विश्वस्तांना फटकारले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे १५ ऑगस्ट या दिवशी पुणे दौर्यावर होते. तेव्हा माहेश्वरी समाजाच्या ‘श्रीराम मंदिरा’मध्ये दर्शनासाठी यावे, असा आग्रह माहेश्वरी समाजाच्या लोकांनी केला. त्या वेळी ते मंदिर दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांनी कचर्याविषयी दु:ख व्यक्त केले. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवार यांना सर्व पंख्यांवर धूळ दिसली. गाभार्यामध्ये प्रवेश करतांना तारांचा पडदा दिसला. याविषयी मंदिर व्यवस्थेवर आणि विश्वस्तांवर अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी विश्वस्तांनी ‘‘दादा, तुम्ही आमचे कान टोचले आहेत. आम्ही नक्की यामध्ये सुधारणा करू’’, असे सांगितले.
मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री बाहेर येत असतांना प्रवेशद्वाराजवळ पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचारी होते. तेव्हा पवार यांनी ‘हा कचरा कधी काढायचा ?’ असा प्रश्न केला. तेव्हा कर्मचार्यांनी ‘‘दादा, माती आहे’’, असे उत्तर दिले. त्यांचे उत्तर ऐकून अजितदादांनी आश्चर्य व्यक्त केले. (उपमुख्यमंत्र्यांना कर्मचारी असे उत्तर देत असतील, तेथे सर्वसामान्यांच्या सूचनांना, मागण्यांना किती किंमत देत असतील ? याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)