Mahant Ramgiriji Maharaj: संभाजीनगर येथे पोलीस ठाण्यासमोर मुसलमानांचे आंदोलन !
|
संभाजीनगर – एम्.आय.एम्.चे नेते आणि मुसलमान १६ ऑगस्ट या दिवशी येथील पैठण गेट येथे सीटी चौक पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात एकत्रित जमले होते. या वेळी ‘रामगिरी महाराजांना अटक करावी’, अशी मागणी करत त्यांच्याकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न झाला. ‘जोपर्यंत महाराजांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, असे त्यांच्या नेत्यांनी सांगितले. या वेळी महाराजांना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी करण्यात आली. पंचाले (सिन्नर) येथे अखंड हरिनाम सप्ताहातील एका प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी काही माहिती सांगितल्याचे निमित्त करून त्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पोलीस जमावाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते; पण आंदोलनकर्ते मोठमोठ्याने ‘अल्ला हू अकबर’च्या (अल्ला महान आहे) घोषणा देत आक्रमक झाले. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मुसलमानांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांनी मुसलमानांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि ‘आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करून कारवाई करू’, असे आश्वासन दिले.
मी माझ्या वक्तव्यावर ठाम ! – महंत रामगिरी महाराज
प्रसारमाध्यमांनी या संदर्भात विचारल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना महंत रामगिरी महाराज म्हणाले, ‘‘मी जे बोललो, त्यावर ठाम आहे. जे होईल, त्याचे परिणाम भोगायला मी सिद्ध आहे. सध्या आमचा सप्ताह चालू आहे. त्यानंतर पाहू.’’
सहस्रो मुसलमानांनी नगर ते संभाजीनगर महामार्ग रोखून धरला !
सहस्रो मुसलमानांनी १६ ऑगस्ट या दिवशी नगर ते संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. सहस्रो मुसलमान जमले होते. महाराजांच्या फ्लेक्सवरील चित्राला मुसलमान हाताने मारत होते.
येवला येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या विरोधात येथे ठिया आंदोलन केले. त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करत मुसलमानांनी येवला पोलीस ठाण्याला घेराव घातला. रात्री ११ वाजेपर्यंत आंदोलन चालू होते. यानंतर पोलिसांनी महाराजांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
महंत रामगिरीजी महाराज यांना संरक्षण देण्याची राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी
महंतांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आल्याचा निषेध करून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रीय वारकरी परिषदेने पत्रक काढले आहे. यात म्हटले आहे की, यापूर्वी चित्रकार म.फी. हुसेन यांनी हिंदु देवतांची अश्लील आणि नग्न चित्रे रेखाटून जगभरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या, तेव्हा हिंदूंनी कुठल्याही प्रकारे कायदा हातात न घेता रीतसर तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारे कायदा हातात घेणार्यांवर पोलिसांनी कारवाई करावी.
संतांच्या केसालाही धक्का लावण्याचे धैर्य कुणी करणार नाही ! – मुख्यमंत्री
सिन्नरमध्ये पंचाले येथे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट या दिवशी येथील यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे दौर्यावर आले असतांना त्यांनी महंत रामगिरी महाराजांची भेट घेतली. मुख्यमंत्री महंत रामगिरी महाराज यांचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘महंत रामगिरी महाराजांनी समाजाला आणि वारकर्यांना दिशा देण्याचे काम केले आहे. आनंद दिघे हेही सप्ताहला जायचे. या राज्यात संतपरंपरा मोठी आहे. संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार चालू आहे. म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याचे धैर्य कुणी करणार नाही’’