गोव्यातील डॉक्टरांकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर निदर्शने
|
पणजी, १६ ऑगस्ट (वार्ता.) – कोलकाता येथील रुग्णालयात ९ ऑगस्ट या दिवशी एका ३१ वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी १६ ऑगस्टला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने केली. या घटनेचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम्.ए.) या संस्थेने १७ ऑगस्टला भारतातील सर्व डॉक्टरांनी संपावर जावे, असे आवाहन केले आहे. डॉक्टरांचा हा संप १७ ऑगस्ट या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून १८ ऑगस्टला सकाळी ६ वाजेपर्यंत, असा २४ घंटे आहे. गोव्यातील डॉक्टरही या संपात सहभागी होणार आहेत. यासंबंधी आय.एम्.ए.च्या मुख्य कार्यालयातून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘या संपाच्या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवा चालू रहातील, तसेच अपघातासारख्या प्रकरणात आपत्कालीन सेवा चालू राहील. बाह्य रुग्ण विभाग कार्यरत नसतील. केवळ निवडक शस्त्रक्रिया केल्या जातील.’’