कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गातील वैद्यकीय सेवा २४ घंटे बंद रहाणार

सिंधुदुर्ग – कोलकाता येथील आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर क्रूर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा निषेध म्हणून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने १७ ऑगस्टला सकाळी ६ ते १८ ऑगस्टला सकाळी ६ या २४ घंट्यांच्या कालावधीत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय सेवाही या कालावधीत बंद रहाणार आहेत.  या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवल्या जातील. अपघातग्रस्तांना उपचार दिले जातील. नियमित बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी आधुनिक वैद्य (डॉक्टर) सेवा देत आहेत, त्या सर्व क्षेत्रांमध्ये हा ‘बंद’ पाळण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. संजय केसरे यांनी दिली.