पोलीस उपनिरीक्षकाने भूमी बळकावणे प्रकरणातील आरोपीला पोलीस निरीक्षकाच्या दूरभाषवरील संभाषणाची माहिती पुरवली
उपनिरीक्षकावर गुन्हा नोंद
पणजी, १६ ऑगस्ट (वार्ता.) – पोलीस निरीक्षकाने केलेल्या दूरभाषविषयीचा कॉल डिटेल रेकॉर्ड (दूरभाषवरील संभाषणाविषयीची नोंद) लबाडीने मिळवल्याच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे. आदित्य वेळीप यांनी सदर सी.डी.आर्. (कॉल डिटेल रेकॉर्ड) भूमीविषयी गैरव्यवहार करणार्या आरोपीला दिल्याचे अन्वेषणानंतर समोर आले आहे. हा पोलीस उपनिरीक्षक पूर्वी विशेष अन्वेषण पथकाशी जोडलेला होता. (यावरून भूमी बळकावणे प्रकरणी स्थापन केलेल्या विशेष अन्वेषण पथकातील पोलिसांचे भूमी माफियांशी कसे साटेलोटे आहेत, ते दिसून येते. यामुळे मूळ भूमी मालकांना कसा न्याय मिळणार ? – संपादक)
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार भूमी बळकावणे प्रकरणातील आरोपीने जेव्हा ‘पोलीस निरीक्षकाने दूरभाषवरून त्याची सतावणूक केली’, असा आरोप करून त्या पोलीस निरीक्षकाच्या दूरभाषवरील संभाषणाच्या सी.डी.आर्.ची प्रत ज्येष्ठ पोलीस अधिकार्यांना सादर केली, तेव्हा आरोपीने सी.डी.आर्. कुठून मिळवला ? असा प्रश्न उपस्थित झाला; कारण हा सी.डी.आर्. केवळ पोलिसांनाचा अन्वेषणासाठी मिळू शकतो. त्यानंतर अन्वेषण केल्यानंतर सदर सी.डी.आर्. पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांनी वर्ष २०२३ मध्ये मिळवला होता आणि त्यानंतर त्याची प्रत आरोपीला दिली होती, अशी माहिती समोर आली. त्या वेळी वेळीप फोंडा पोलीस ठाण्यातील सेवेत होता. एका प्रकरणाचे अन्वेषण करतांना सी.डी.आर्. मिळवण्याविषयीच्या दूरभाष क्रमांकांच्या सूचीत या पोलीस उपनिरीक्षकाचा दूरभाष क्रमांक समाविष्ट करण्यात आला होता. प्रथमदर्शी अहवाल नोंद केल्यानंतर सदर पोलीस उपनिरीक्षकाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याविषयी एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘हे प्रकरण ‘अवैध कामासाठी सी.डी.आर्. मिळवण्यासाठी स्वत:च्या पदाचा गैरवापर करू नये’, याचे इतर पोलीस अधिकार्यांसाठी उदाहरण ठरेल.’’