येत्या काळात प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेचा हस्तक्षेप वाढलेला दिसेल !
बांगलादेशातील उठावामागे अमेरिकेचा हात ? : शेख हसीना यांचा आरोप !
‘बांगलादेश उठावामागे अमेरिकेचा हात आहे’, असा उघड आरोप तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘सेंट मार्टिन बेट’ अमेरिकेला न दिल्याने हा उठाव केला’, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘सेंट मार्टिन बेट’चा प्रश्न काय आहे ? अमेरिका आणि चीन यांचा या बेटावर डोळा का आहे ? सेंट मार्टिन बेट कारणीभूत आहे का शेख हसीना यांच्या सत्ताच्युत होण्याला ? बांगलादेश ‘क्वाड’चा (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ४ देशांचा गट) सदस्य बनणार का ? सध्या बांगलादेशमध्ये स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस हे अमेरिकेचे प्रतिनिधी आहेत का ? या सूत्रांचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
१. बांगलादेशातील उठावामागे अमेरिकेचे मोठे षड्यंत्र
‘बांगलादेशामध्ये अभूतपूर्व उठाव झाल्यानंतर शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आणि देश सोडून पलायन करावे लागले. त्यापूर्वी त्यांना देशाला काहीतरी उद्देशून सांगायचे होते; पण त्या सांगू शकल्या नाहीत. देश सोडल्यानंतर प्रथमच त्यांनी सार्वजनिक वक्तव्य केलेले आहे. त्यात त्या स्पष्टपणे म्हणत आहेत, ‘बांगलादेशामध्ये झालेला उठाव हा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग होता आणि त्याचा मुख्य सूत्रधार हा अमेरिका आहे. अमेरिकेच्या माध्यमातूनच या सर्व गोष्टी घडून आलेल्या आहेत.’ अशा प्रकारचे सूतोवाच रशियाने ८ मासांपूर्वीच केले होते, ‘अमेरिका पुरस्कृत उठाव बांगलादेशात होणार आहे.’ त्यामुळे संशय होताच की, बांगलादेशमध्ये एकदम १ कोटींहून अधिक लोकांनी रस्त्यावर येणे आणि ६-६ मास त्यात सातत्य ठेवणे, हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय समर्थनाखेरीज शक्य नाही. यातील छुप्या कलाकारांविषयी साशंकता होतीच, आता खुद्द माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीच या स्वरूपाचा आरोप केला आहे.
२. ‘सेंट मार्टिन बेटा’चे सामरिक आणि व्यापारिक दृष्टीकोनातून महत्त्व
सेंट मार्टिन हे ३ चौरस किलोमीटर आकाराचे एक लहानसे बेट आहे. ते बांगलादेशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात येते. या बेटाविषयी म्यानमार आणि बांगलादेश यांच्यात वाद चालू आहे. त्यामुळे ते वादग्रस्त बनले आहे. वर्ष २०१२ मध्ये लवादाने बांगलादेशाच्या बाजूने निर्णय दिला होता. तेव्हापासून त्यावर बांगलादेशाची मालकी आहे. या बेटाचे ठिकाण हे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हे बेट मलाक्का सामुद्री धुनीच्या अगदी जवळ आहे. या मलाक्का सामुद्री धुनीच्या माध्यमातून जगाच्या व्यापाराची ४० टक्के सागरी वाहतूक होते. चीनचा ६५ टक्के व्यापार हा मलाक्का सामुद्री धुनीतून होतो. अशा अत्यंत महत्त्वपूर्ण सामुद्री धुनीच्या जवळ हे बेट आहे. त्यामुळे या बेटावर सैनिकी तळ उभारले किंवा प्रभाव निर्माण झाला, तर एकाच वेळी म्यानमार, बांगलादेश आणि भारत या तिघांवरही नियंत्रण ठेवणे, तसेच हिंदी महासागर, आशिया प्रशांत क्षेत्र आणि बंगालचा उपसागर या सर्वांवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. त्यामुळे अमेरिकेचा या बेटावर डोळा आहे. या सर्व गोष्टींना शेख हसीना यांचा विरोध होता. चीनचाही या बेटावर डोळा असून तोही तेथे प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
३. महंमद युनूस यांच्या कार्यकाळात बांगलादेश ‘क्वाड’चा सदस्य बनण्याची शक्यता
अमेरिकेकडून शेख हसीना यांना २ प्रस्ताव दिले गेले होते. त्यात ‘क्वाड’ या संघटनचे सदस्य होण्यास सुचवले होते. (‘समुद्र मार्गांचे रक्षण करणे’, हा ‘क्वाड’ या संघटनेचा उद्देश असला, तरी चीनच्या हस्तक्षेपाला विरोध करणे, हा प्रमुख उद्देश आहे.) ‘क्वाड’मध्ये बांगलादेशाने सहभागी व्हावे, अशा स्वरूपाचा अमेरिकेचा प्रस्ताव होता. त्याला शेख हसीना यांचा विरोध होता. त्यामुळे हसीना यांना पदावरून हटवणे, हे अमेरिकेसाठी महत्त्वाचे होते. हा अमेरिकेचा प्रशांत क्षेत्राच्या धोरणाचा एक भाग होता. त्याप्रमाणे या गोष्टी घडून आल्या आहेत.
आता बांगलादेशात महंमद युनूस यांचे काळजीवाहू सरकार नियुक्त झाले आहे. त्यामुळे तेथे येत्या ४-६ मासांत सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील. या काळात बांगलादेशाचे काळजीवाहू सरकार ‘क्वाड’मध्ये सहभागी होऊ शकते. बांगलादेश ‘क्वाड’मध्ये सहभागी झाला, तर या सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेसह ‘क्वाड’ देशांचाही प्रभाव वाढेल. त्यानंतर त्या बेटाला चीन त्याच्याकडे घेणार नाही. त्यामुळे एका मोठ्या षड्यंत्राचा हा एक भाग असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.
४. ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात ए इस्लामी’ यांची सत्ता आल्यास अमेरिकेची अडचण
यापूर्वी अमेरिकेने शेख हसीना यांचा आरोप धुडकावून लावला आहे. एक गोष्ट आवर्जून लक्षात घेणे आवश्यक आहे की, तेथे ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात ए इस्लामी’ यांच्या युतीचे सरकार स्थापन झाले, तर अमेरिकेचीच अडचण वाढणार आहे; कारण ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात ए इस्लामी’ यांचे पाकिस्तानशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. यासमवेतच पाकिस्तान हा चीनशी अत्यंत जवळचा देश असल्याने अमेरिकेचे जे स्वप्न आहे की, बांगलादेशाला ‘क्वाड’मध्ये घेणे किंवा सेंट मार्टिन बेटावर प्रभाव निर्माण करणे, हे साध्य होणार नाही. महंमद युनूसचे काळजीवाहू सरकार सत्तेवर असेपर्यंत अमेरिकेला ते साध्य करता येणार आहे, म्हणजे पुढच्या ४-६ मासांतच त्यांना कृती करावी लागणार आहे. ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ला सत्तेवर आणणे, हा अमेरिकेच्या धोरणाचा भाग नसावा; कारण ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात ए इस्लामी’ हे अमेरिकेच्या विरोधात आहेत. तेच सत्तेवर आले, तर सेंट मार्टिन बेटावर अमेरिकेला प्रभाव निर्माण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हे काळजीवाहू सरकार असतांनाच अमेरिकेला दबाव वाढवून पुढच्या काही गोष्टी कराव्या लागतील.
५. बांगलादेशचे पंतप्रधान महंमद युनूस आणि अमेरिका यांच्यात घनिष्ट संबंध
नवनिर्वाचित पंतप्रधान महंमद युनूस यांच्याकडे सध्या बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारची सत्तासूत्रे आहेत. त्यांचे अमेरिकेशी अतिशय घनिष्ट नाते आहे. त्यांचे अमेरिकेशी अत्यंत जवळचे संबंध आहेत, तसेच ते अमेरिकेचेच प्रतिनिधी समजले जातात, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे आता युनूस यांच्या कार्यकाळात काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
६. शेख हसीना यांना चीनचा विरोध
शेख हसीना या काही काळ चीनच्या अत्यंत जवळ गेल्या होत्या. बांगलादेशावर चीनचा मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढला होता. त्यांच्या कार्यकाळात बांगलादेश चीनसमवेत एकत्र सैनिकी सरावही करत होता. अलीकडच्या काही दिवसांमध्ये काही कारणांनी त्यांचे चीनशी खटके उडाले होते. त्या ५ दिवसांच्या चीनच्या दौर्यावर गेल्या होत्या. तेव्हा त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली. चिनी माध्यमांनी त्यांना पुरेसे महत्त्व दिले नाही, तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही त्यांना भेटायला नकार दिला होता. त्यानंतर त्या परत भारताच्या जवळ आल्या. चीनला त्या नकोशा झाल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ला हाताशी धरून एक मोठे षड्यंत्र सिद्ध करण्यात आले.
७. बांगलादेशाच्या विरोधात षड्यंत्र करतांना अमेरिकेचे भारताकडे दुर्लक्ष
शीतयुद्ध काळात अमेरिकेने अशा प्रकारची षड्यंत्रे अनेक देशांमध्ये केली आहेत. अशा प्रकारची आंदोलने होणे, त्यानंतर तेथील सत्ताधीश पळून जाणे, हे काही प्रथम घडलेले नाही. अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ पुरस्कृत अशा प्रकारची आंदोलने किंवा गोष्टी अनेक देशांमध्ये विशेषत: आफ्रिकी किंवा लॅटीन अमेरिकी देशांमध्ये अनेकदा घडलेल्या आहेत. दुर्दैवाचे, म्हणजे हे करत असतांना अमेरिकेने भारताचा विचार केलेला नाही. बांगलादेशात जर ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात ए इस्लामी’ यांची सत्ता आली, तर भारताला किती त्रास होऊ शकतो, याचा विचार भारताचा मित्र असतांनाही अमेरिकेने येथे केलेला नाही.
८. सेंट मार्टिन बेट आणि आशिया प्रशांत क्षेत्र यांवर वर्चस्व निर्माण करणे अमेरिकेचे ध्येय
सध्या सत्तेचे लोलक (पेंडुलम) युरोपमध्ये राहिलेले नाही. २० व्या शतकात युरोपमध्ये २ महायुद्धे घडली. त्यामुळे सत्तेच्या राजकारणाचे युरोप केंद्र होता. आता व्यापार आणि आर्थिक हितसंबंध हे अतिशय महत्त्वपूर्ण बनले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने २१ व्या शतकात आशिया खंड आणि मुख्यत: अशिया प्रशांत खंड क्षेत्र हे व्यापाराचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे अमेरिकेने स्वाभाविकपणे या भागात त्याचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे. अमेरिकेने किंवा डोनाल्ड ट्रंप यांनीही बोलून दाखवले आहे की, त्यांचा खरा शत्रू रशिया नसून चीन हा आहे. चीनमुळे अमेरिकेचे आशिया प्रशांत क्षेत्रातील व्यापार हितसंबंध धोक्यात येत आहेत. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष होणार आहे. त्यामुळे अमेरिकेसाठी आशिया प्रशांत क्षेत्र सर्वस्व आहे. उद्या चीनने तैवानवर आक्रमण केले, तर मलाक्का सामुद्री धुनीचे कार्य महत्त्वपूर्ण असणार आहे. या पार्श्वभूमीवर सेंट मार्टिन हे बेट फार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी तेथे अमेरिकेचे सैनिकी तळ असेल. परिणामी सध्या आशिया प्रशांत क्षेत्रात अधिकाधिक प्रभाव वाढवण्याचे, सेंट मार्टिन बेटावर सैनिकी तळ निर्माण करण्याचे आणि चीनला प्रत्युत्तर देण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. त्यामुळे येत्या काळात हिंदी महासागर किंवा आशिया प्रशांत क्षेत्रात अमेरिकेचा हस्तक्षेप हा वाढलेला दिसेल.’
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक (१२.८.२०२४)
(साभार : डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे फेसबुक)