बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !
१. बांगलादेशात हिंदूंच्या हत्या, बलात्कार आणि मालमत्तेची जाळपोळ
‘५.८.२०२४ या दिवशीपासून बांगलादेशात अराजकता चालू झाली. मुसलमान समाजाच्या विद्यार्थ्यांनी आरक्षणाचे निमित्त पुढे करून मोर्चे काढले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे आरक्षणाविषयी निकालपत्र आले. हे आंदोलन नियंत्रणात आणण्यात पंतप्रधान म्हणून शेख हसीना यांना अपयश आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर शेख हसीना या जीव वाचवण्यासाठी देश सोडून भारताच्या आश्रयाला आल्या. त्यांनी देश सोडल्यावरही बांगलादेशात दंगली आणि जाळपोळ चालूच राहिली. धर्मांधांनी हिंदूंची घरे, दुकाने, कारखाने आणि मंदिरे ही नष्ट केली, मोठ्या प्रमाणात लूटमार केली, तसेच काही हिंदु नेत्यांच्या हत्या केल्या. तेथे आतापर्यंत २७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या हातून इस्कॉनचे मंदिरही सुटले नाही. या हिंसाचारात कोट्यवधी रुपयांची हानी झाली.
२. बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या ३४ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर !
वर्ष १९४७ मध्ये ब्रिटिशांनी गांधी आणि नेहरू यांच्या संमतीने धर्माच्या आधारावर भारताची फाळणी केली. त्या वेळी बांगलादेशात (पूर्व पाकिस्तानात) हिंदूंची लोकसंख्या ३४ टक्के होती, आज ती केवळ ८ टक्के राहिली आहे. फाळणीच्या वेळी धर्मांधांच्या हातून लाखो हिंदू मारले गेले आणि लाखो महिलांवर बलात्कार करण्यात आले. वर्ष १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडून बांगलादेश स्वतंत्र केला. दुर्दैवाने त्या वेळीही बांगलादेश आणि पाकिस्तान येथील धर्मांधांनी अधिकाधिक हिंदूंच्या हत्या केल्या, तसेच महिलांवर बलात्कार केले. उपकाराची फेड त्यांनी अपप्रकारांनी केली.
३. बांगलादेशावर थेट कारवाई करण्यास भारताला मर्यादा
बांगलादेशातील धर्मांधांनी आसामसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली. वर्ष १९७१ च्या युद्धानंतर तर तेथील भौगोलिकताच पालटली. सध्याच्या अराजकतेच्या वातावरणात भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंसाठी थेट कृती केली नसली, तरी भारतात घुसखोरी होऊ नये; म्हणून सैन्याला सतर्क ठेवले आहे. हे खरे आहे की, आतंरराष्ट्रीय बंधनांमुळे भारताला आततायीपणा करता येणार नाही. कोविडच्या संक्रमणानंतर बांगलादेशाने भारताच्या साहाय्याने ६ टक्के विकास दर गाठला होता. अमेरिका, चीन, पाकिस्तान या सर्व देशांना बांगलादेश भारताकडे झुकल्याचे सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने तेथे अस्थिरता चालू केली.
४. बांगलादेशातील अस्थिरतेवर भारतातील प्रतिक्रिया
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविषयी वाचा फोडणार्या बांगलादेशी (सध्या भारतात आश्रयाला आहेत.) लेखिका तस्लिमा नसरीन यांची प्रतिक्रिया मार्मिक आहे. त्या म्हणाल्या, ‘‘ज्या जिहादी आतंकवाद्यांना घाबरून आणि त्यांचे ऐकून शेख हसीनाने मला देश सोडण्यास भाग पाडले, त्या आतंकवाद्यांमुळे त्यांनाही जीव वाचवण्यासाठी सत्ता सोडून पलायन करावे लागले आहे.’’ भाजपच्या खासदार कंगना राणावत म्हणाल्या, ‘‘बांगलादेशाच्या अवतीभवती एवढे मुसलमान राष्ट्रे असतांना शेख हसीना यांनी भारतातच आश्रय घेतला. ही गोष्ट हिंदु राष्ट्राचे महत्त्व विषद करते.’’ उत्तरप्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, ते पहाता आपले दायित्व वाढले आहे; कारण सनातन धर्म टिकवण्यासाठी आपण एकत्रित कार्य करणे आवश्यक आहे.’’ याउलट काँग्रेसचे खासदार खुर्शीद आलम म्हणाले, ‘‘भारतात ही स्थिती यायला वेळ लागणार नाही. येथेही ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’सारख्या कायद्यांमुळे असंतोष आहे.’’ हिंदुद्वेष्ट्या मेहबूबा मुफ्ती तसेच बरळल्या. दुर्दैवाने महाराष्ट्रात काही वेगळ्या प्रतिक्रिया आल्या नाही. वास्तविक सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून सरकारला बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यास सांगणे आवश्यक आहे.
५. असंघटित असणे हा हिंदूंना लागलेला शाप !
८०० वर्षांपूर्वी तत्कालीन राजे केवळ त्यांचे राज्य सांभाळण्यात व्यस्त होते. ते हिंदु म्हणून शेजारच्या हिंदु राजाला साहाय्य करत नसत. त्यामुळे मुसलमान आक्रमणकर्त्यांचा लाभ झाला. आजही एकगठ्ठा मते मिळावीत; म्हणून राजकारण्यांकडून हिंदुहिताकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचीच किंमत आपण चुकवत आहोत. हे चित्र पालटण्यासाठी आता ईश्वरालाच अवतार घ्यावा लागेल.’ (८.८.२०२४)
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय
संपादकीय भूमिकासमस्त हिंदूंनी मतभेद बाजूला ठेवून सरकारला बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यास सांगणे आवश्यक ! |