भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म, हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने, दृश्य आणि अदृश्य विश्व हे केवळ परमात्म्याचेच स्वरूप अन् पिंडाला कावळा शिवणे आणि न शिवणे यांमागील अध्यात्मशास्त्र’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(लेखांक ३६)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/824832.html

प्रकरण ६

पू. प्रा. सु.ग. शेवडे

७. विश्व उत्पन्न करून ते चालवणारा विधाता ! 

आपल्या उदरात गर्भ धारण करण्यामुळे, पुढे प्रसूती यातना सहन करण्यामुळे आणि स्वभावतःच अपत्यावर आत्मीयतापूर्ण प्रेम असल्यामुळे आईवर अपत्य संगोपनाचे दायित्व येते. कुटुंबाच्या उदरभरणासाठी लागणारा पैसा कमावून आणणे हे दायित्व स्वाभाविकच मोकळ्या असलेल्या पुरुषावर येऊन पडले. वयात आलेल्या स्त्रीशी पुरुषाचा संबंध येण्याने गर्भधारणा होते. त्यामुळे तिच्या ठिकाणी उचित काळी उचित पुरुषापासूनच संरक्षणासह संतती प्राप्त व्हावी, यासाठी विवाहसंस्था निर्माण झाली. अशा प्रकारे जन्मसिद्ध गुणधर्मांची व्यवस्था जन्मसिद्ध कर्तव्यांनी होणे, हीच व्यवस्था असल्यामुळे आणि जगातील सर्वच पदार्थांच्या, सर्वच गुणधर्मांचे सर्वांगीण ज्ञान असणाराच ही व्यवस्था करू शकेल. असे सर्वज्ञान केवळ जगाच्या निर्मात्यालाच असणे संभवते; म्हणून ही व्यवस्था लावून देणे, हेही त्याचेच कर्तव्य ठरते; म्हणून ज्या विधात्याने हे एवंगुणविशिष्ट विश्व उत्पन्न केले, त्याने ते कसे चालावे, याचीही व्यवस्था केली.

८. वेदांची निर्मिती 

स्वकर्तव्यांसह सारी प्रजा उत्पन्न केल्यावर पूर्वी तो प्रजापती ब्रह्मदेव त्यांना (त्या प्रजेला) म्हणाला, ‘तुम्ही या व्यवस्थेनुसार वागा, तसे वागल्याने ही व्यवस्था तुमची कामधेनू ठरेल. ही व्यवस्था म्हणजे काय ? ‘वेदप्रणिहितो धर्मो ह्यधर्मस्तद्विपर्ययः ।’ (श्रीमद्भागवत, स्कन्ध ६, अध्याय १, श्लोक ४०), म्हणजे ‘वेदोक्त आचरण म्हणजेच धर्म आणि त्याच्या विरुद्ध आचरण म्हणजे अधर्म होय.’ म्हणून धर्म सांगण्यासाठी ईश्वरानेच वेद उत्पन्न केले. जेव्हा ‘एकोऽहं बहुस्याम् ।’ (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मवल्ली, अनुवाक ६) म्हणजे ‘मी एक आहे, माझे अनेकात रूपांतर व्हावे’, ही प्रेरणा त्या स्वस्थ परमात्म्याला झाली, तेव्हा त्याने एकसमयावच्छेदे करून सारे विश्व उत्पन्न केले.

९. ईश्वरनिर्मित वेद आणि कर्तव्याचे असणारे सामान्य ज्ञान ! 

ज्याचे जे वेदप्रणित विहित कर्म आहे, ते ईश्वराची इच्छा; म्हणूनच त्याने पार पाडले पाहिजे; पण प्रत्येकाला वेद कुठे कळतात ? ईश्वराने यासाठी एक असामान्य योजना निर्माण केली की, प्रत्येकाच्या बुद्धीतच कर्तव्याचे सामान्य ज्ञान दिले. पती-पत्नींनी एकमेकांशी प्रामाणिक राहून संसार करावा. आईने मुलांवर प्रेम करावे. मोठ्यांनी लहानांकडे वात्सल्यबुद्धीने, क्षमाशील वृत्तीने पहावे. लहानांनी मोठ्यांचा आदर करावा. स्त्रीचे सर्वांनी रक्षण करावे. वृद्धांची अन्यांनी सेवा करावी. खोटे बोलू नये. दुसर्‍याचे द्रव्य अपहरण करू नये. प्राणीमात्रांवर दया करावी. दुष्ट व्यक्तींना शिक्षा करावी. भुकेल्याला अन्न द्यावे. तहानेल्याला पाणी द्यावे. निराधाराला आश्रय द्यावा, इत्यादी गोष्टी वेदांत सांगितल्या आहेतच; पण वेद न वाचताही मनुष्याच्या बुद्धीत ईश्वराने त्या गोष्टी ठेवल्या आहेत. म्हणून धर्म ही विश्वाची व्यवस्था आहे. ईश्वर हा या विश्वाचा धनी आहे. विश्व अनादी आहे. विश्वव्यवस्था वेदांत सांगितली आहे. ते वेदही ईश्वरी आहेत आणि तो धर्मही ईश्वरी आहे. ईश्वराच्या न्यायालयात न्याय, अन्यायाचा निवाडा वेदांनुसार होतो. वेदांनुसार वर्तन हे उचित आणि वेदविरोधी वर्तन अनुचित, म्हणजेच अन्याय्य, त्यानुसार गती मिळणार.

१०. धर्माचे द्वैविध्य : प्रवृत्ती आणि निवृत्ती !

वेदोक्त धर्म हा प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा २ प्रकारचा आहे. असा का ?; कारण आपण प्रत्येक जण २ घटकांनी बनलेले आहोत. शरीर आणि आत्मा. शरिराचा उत्कर्ष, म्हणजे जगातील व्यावहारिक उत्कर्ष. शरीर निरोगी असणे, कुटुंब समृद्ध असणे, ऐश्वर्य लाभणे, संपत्ती भरपूर मिळणे, घरदार, मानमरातब, प्रतिष्ठा ही सारी भौतिक समृद्धी आहे. ती प्रवृत्तीमार्गाने लाभते. अभ्युदयासाठी प्रवृत्तीमार्ग, दुसरा घटक म्हणजे आत्म्याची उन्नती कशी ?

आपण जी कर्मे करतो, त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. अर्थात् आपल्याला, म्हणजे आत्म्याला. देह हा माझा आहे. हात-पाय, नाक-डोळे हे सारे माझे आहेत.

– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/826031.html