सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अन्य जिल्ह्यांतून येणार्या साधकांच्या निवासाची सेवा करतांना कोल्हापूर येथील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !
११.५.२०२३ या दिवशी गोव्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ब्रह्मोत्सवासाठी भारतातील काही राज्यांतील साधक गोवा येथे जाणार होते. पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांतून गोव्याला जाणार्या साधकांचे आदल्या दिवशीचे, म्हणजे १०.५.२०२३ या दिवशीच्या निवासाचे नियोजन कोल्हापूरमध्ये करायचे होते.
१. आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), वारणानगर, कोल्हापूर.
१ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितल्याप्रमाणे देवाला शरणागतीने प्रार्थना करून प्रयत्न केल्यावर निवासाचे झालेले नियोजन ! : ‘कोल्हापूर येथे ७०० साधक निवासासाठी येणार होते. त्या वेळी ‘इतके मोठे नियोजन कसे होणार ?’, असा विचार काही क्षण माझ्या मनात येऊन गेला. त्यानंतर २ दिवस उलटून गेल्यानंतरही कुठेच निवासव्यवस्था झाली नाही. मी सद्गुरु स्वाती खाडये यांना ही अडचण सांगितल्यावर त्यांनी देवाला शरण जाऊन प्रार्थना करून प्रयत्न करण्यास सांगितले.
१. एका हितचिंतक अर्पणदारांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी लगेच सांगितले की, ते कुंथूगिरी (जि. कोल्हापूर) येथील जैन मंदिरात ६० जणांच्या विनामूल्य निवासाचे नियोजन करू शकतात.
२. मी वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील ‘तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालया’तील कर्मचार्यांची बैठक घेऊन त्यांना साधकांची निवासव्यवस्था करण्याचा विषय सांगितला. त्या वेळी सर्वांनी अतिशय उत्साहाने ‘निवासव्यवस्था करूया’, असे सांगितले. ते सर्वजण लगेचच वसतीगृहातील खोल्या निवासासाठी सिद्ध करू लागले. एका कर्मचार्याने साधकांप्रमाणे अगदी मनापासून तेथील वास्तूशुद्धीही केली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ‘देवच सर्व करून घेत आहे’, याची जाणीव झाली. तिथे ९५ जणांच्या निवासाची व्यवस्था सहजतेने झाली.
३. कोल्हापूर येथील साधिका सौ. उमा ठोमके यांचे कोल्हापूरमध्ये एक विश्रामगृह (लॉज) आहे. तेथे त्यांनी ५० जणांच्या निवासाचे नियोजन केले. तेथील एका खोलीचे भाडे २५०० रुपये आहे, तरीही त्यांनी १७ खोल्या विनामूल्य दिल्या. त्यांच्या ओळखीने पहाटे ५.३० वाजता ३०० जणांसाठी न्याहारीही मिळाली.
४. सौ. तेजस्विनी सरनोबत या साधिकेने १०० जणांच्या निवासाचे नियोजन एका धर्मशाळेत अल्प दरात करून दिले. त्यासाठी तिच्या पतीने पुष्कळ सहकार्य केले.
५. वाठार (जि. कोल्हापूर) येथे एका धर्मप्रेमींनी ४० जणांचे निवासाचे नियोजन विनामूल्य केले.
अशा प्रकारे देवाच्या कृपेने कोल्हापूर येथे ७०० साधकांसाठी निवासव्यवस्था आणि ३५० साधकांसाठी सकाळची न्याहारी यांचे नियोजन झाले. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. आधुनिक वैद्य (डॉ.) मानसिंग शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), कोल्हापूर
२ अ. ईश्वरी कृपेमुळे मोठ्या संख्येने साधकांची निवासव्यवस्था होणे
१. ‘इतर जिल्ह्यांतून येणार्या साधकांची कोल्हापूर येथे निवासव्यवस्था करण्याची सेवा मला मिळाली होती. आरंभी मी ‘राधाकृष्ण मंदिरा’च्या विश्वस्तांना याविषयी विचारले. तेव्हा तेथील सर्व खोल्या आरक्षित झालेल्या असल्यामुळे तेथे सोय होऊ शकली नाही; पण त्यांनी स्वतःहून ‘गीतामंदिर’ येथे भ्रमणभाष करून ‘तिथे ५० साधकांची विनामूल्य निवासव्यवस्था होऊ शकेन’, असे सांगितले.
२. त्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिराच्या जवळ असलेल्या ‘यात्री निवास’ येथे चौकशी केली असता तेथे अल्प दरात जागा उपलब्ध झाली. तेथे पुण्यातील ११० साधकांची निवासव्यवस्था करता आली.
३. ‘महालक्ष्मी धर्मशाळा’ येथे अल्प दरात १०० साधकांच्या निवासाचे नियोजन केले.
४. गगनबावडा मार्गावरील दोनवडे गावातील एक जुने साधक श्री. एस्.एम्. पाटील आणि तेथील दोन धर्मप्रेमी यांनीही निवासस्थान मिळवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. त्यांना एक कार्यालय विनामूल्य मिळाले. त्यांनी स्वतःहून ‘५० साधकांसाठी न्याहारी आणि चहा यांचे नियोजन करतो’, असे सांगितले.
कोल्हापूर येथे यात्री निवासासाठी नेहमीच गर्दी असते, तरीसुद्धा एवढ्या सर्व साधकांची निवासव्यवस्था काही ठिकाणी विनामूल्य, तर काही ठिकाणी अल्प दरात झाली. हे सर्व नियोजन फक्त ईश्वरी कृपेमुळेच झाले. त्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
सर्व सूत्रांचा दिनांक (२५.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |