जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवेत रहाणार्या ६१ आध्यात्मिक पातळी असलेल्या चिंचवड येथील कै. (सौ.) कुसुम नाथा गावडे (वय ५५ वर्षे)
‘१६.७.२०२४ (आषाढ शुद्ध १०) या दिवशी पिंपरी, चिंचवड (जिल्हा पुणे) येथील साधिका सौ. कुसुम नाथा गावडे (वय ५५ वर्षे) यांचा दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. त्या अपघातात त्यांचे जागीच निधन झाले. १५.८.२०२४ (श्रावण शुद्ध १०) या दिवशी त्यांचे प्रथम मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने यांची त्यांच्या मोठ्या मुलीला, एका संतांना आणि एक साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. भक्ती दीपक डाफळे (कै. कुसुम गावडे यांची मोठी मुलगी), सातारा
१ अ. मुलांवर लहानपणापासून साधनेचे संस्कार करणे : ‘आईने खडतर आयुष्य भोगले. तिचे प्रारब्ध तीव्र होते. कठीण परिस्थितीतही तिने आम्हा भावडांना गुरुदेवांशी जोडून ठेवले. ती सतत आम्हाला ‘रडायचे नाही, लढायचे’, असे सांगायची.
१ आ. आजारपणामुळे मृत्यूचे विचार मनात येणे; मात्र स्वयंसूचना घेतल्यानंतर विचार अल्प होणे : दोन वर्षांपूर्वी तपासण्या केल्यावर आईचे एक मूत्रपिंड निकामी झाले होते, तर दुसर्या मूत्रपिंडाचे ३० टक्के कार्य चालू असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिला ‘आता माझा मृत्यू होईल का ?’, अशी भीती वाटत असे. त्यावर तिने माझ्याकडून स्वयंसूचना बनवून घेतली होती. ती सूचना नियमित घेतल्याने तिच्या मनातील मृत्यूची भीती आणि स्वतःविषयीचे काळजीचे विचारही अल्प झाले.
१ इ. मुलीच्या समवेत भ्रमणभाषवर साधनेच्या प्रयत्नांविषयीच बोलल्यामुळे आणि साधनेचे प्रयत्न वाढल्यामुळे आनंदी वाटणे : आम्ही दोघी भ्रमणभाषवर व्यष्टी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन या विषयांवरच बोलत असू. या वर्षभरात तिचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले होते. तिचा परिस्थिती स्वीकारण्याचा भाग वाढला होता. याआधी तिला ते जमत नसे. हळूहळू तीसुद्धा स्वतःहून सूचना बनवायला शिकली. यामुळे तिचे स्वतःचे विचार अल्प होऊन नामजप अधिक होऊ लागला. मागील वर्षभरापासून ती आनंदी वाटत होती.
१ ई. मुलीला स्वतःमध्ये न अडकवता साधनेत स्वावलंबी बनवणे : ती मला नेहमी ‘‘माझ्या आधारापेक्षाही गुरुदेव आणि सद्गुरु स्वातीताईंचा आधार पुष्कळ मोठा आहे. तू त्यांच्याशी बोलत जा’’, असे सांगायची. अशा प्रकारे तिने मला तिच्यामध्ये अडकवले नाही. मला तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही तिने मला त्रासांकडे सकारात्मक दृष्टीने पहायला आणि देवाचा आधार घ्यायला शिकवले. तिने मला साधनेमध्ये स्वावलंबी बनवले.
१ उ. गुरुदेवांच्या कृपेमुळे मृत्यू होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत आई गुरुपौर्णिमेच्या प्रसारसेवेत होती.
१ ऊ. मृत्यूसारख्या कठीण प्रसंगातही कुटुंबियांना गुरुकृपेमुळे स्थिर रहाता येणे
१ ऊ १. आईच्या निधनाची वार्ता समजल्यावर गुरुदेवांचा धावा होऊन त्यांच्या चरणी प्रार्थना होणे : १६.७.२०२४ या दिवशी माझे आई-बाबा शेतीच्या कामानिमित्त राजगुरुनगर येथे गावी निघाले होते. वाटेत त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. तेव्हा आई रस्त्यावर पडली. तिच्या अंगावरून डंपर गेल्याने तिचे जागेवरच निधन झाले. त्या वेळी माझ्या वडिलांनी मला भ्रमणभाष करून लगेच कळवले. त्याच क्षणी गुरुदेवांचा धावा चालू केल्यावर माझे मन शांत आणि स्थिर झाले. त्या वेळी मी गुरुदेवांना ‘आईची काळजी घ्या’, अशी प्रार्थना केली.
१ ऊ २. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी आधार देऊन स्थिर रहाण्यास साहाय्य करणे : त्यानंतर मी सर्वप्रथम सद्गुरु स्वातीताईंना आणि नंतर पू. (सौ.) मनीषाताईंना कळवले. त्या वेळी दोघींनी मला आधार दिला. त्यांनी मला दत्ताचा नामजप करण्यास सांगितले. त्याच दिवशी पू. (सौ.) मनीषाताई काही साधकांसह माझ्या माहेरी आम्हाला भेटायला आल्या. तसेच काही साधकांना आमच्या गावी माझ्या साहाय्याला पाठवले. त्यानंतर सद्गुरु ताई आणि पू. मनीषाताई आम्हा सर्व कुटुंबियांशी भ्रमणभाषवरून २ – ३ दिवस बोलल्या. त्यांनी आम्हाला आधार देऊन स्थिर ठेवले.
१ ऊ ३. गुरुदेवांवरील श्रद्धा वाढून परिस्थिती स्वीकारता येणे : त्या वेळी ‘आईचे आयुष्य एवढेच असून तिचा पुढील साधनाप्रवास गुरुदेवच करून घेणार आहेत. गुरुदेवांनी याआधी आम्हाला तारले आहे, यापुढेही तेच तारणार आहेत’, या विचाराने मला रडू आले नाही.
१ ऊ ४. न रडता ‘आईचा मृत्यूनंतरचा प्रवास चांगला होण्यासाठी प्रयत्न करायला हवे’, असे वाटणे : अन्य नातेवाईक आईच्या आठवणीने रडायचे. ते पाहून मलाही वाईट वाटायचे. तेव्हा ‘मला यापुढे आईचा सहवास आणि तिचे प्रेम मिळणार नाही’, या विचारापेक्षा ‘तिच्यावरील प्रेमासाठी मी दत्ताचा नामजप केला पाहिजे. तिचा मृत्यूनंतरचा प्रवास चांगला होण्यासाठी पुढील विधी व्यवस्थित केले पाहिजेत’, असे विचार गुरुदेवांनीच दिले. मी नातेवाईकांनाही स्थिर रहाण्यास, तसेच दत्ताचा नामजप करण्यास सांगत होते.
१ ऊ ५. ‘आई पूर्णवेळ साधक होऊन गुरुदेवांकडे गेली आहे’, असे भावाने सांगणे : आईच्या निधनानंतर चौथ्या दिवशी आम्ही कुटुंबीय भक्तीसत्संग ऐकत होतो. सत्संग ऐकतांना माझा लहान भाऊ श्री. तुषार नाथा गावडे मध्येच म्हणाला की, ‘आई आता पूर्णवेळ साधक झाली आहे. ती गुरुदेवांकडे गेली आहे.’ प्रत्यक्षात आई गेल्यानंतर त्याला पुष्कळ रडू येत होते; मात्र हे विचार आल्यानंतर तो रडला नाही. ही गुरुदेवांचीच कृपा आहे.
१ ए. निधनानंतरचे सर्व विधी करतांना जाणवलेली सूत्रे
१. ‘घरात कोणाचा मृत्यू झाला आहे’, असे जाणवत नव्हते.
२. अंत्यविधीसाठी सातार्याहून पुण्याला जातांना वाटेत आम्हाला २ -३ मुंगुस दिसले. त्यानंतर गावाजवळ पोचल्यावर आमच्या वाहनासमोर इंद्रधनुष्य तयार झालेले दिसले.
३. तिसर्या दिवशी सकाळी स्मशानभूमीत गेल्यावर विधी होईपर्यंत मोराचा आवाज येत होता.
४. मृत्यूनंतर १० दिवस प्रतिदिन एक जखमी कावळा खाण्यासाठी घरासमोर येणे : अंत्यविधी झाल्यानंतर दुसर्या दिवशी एक जखमी कावळा घरासमोर आला. तो प्रतिदिन घरासमोर यायचा. त्याला खायला दिले की, तो खायचा आणि चालत जाऊन झाडाखाली थांबायचा. १० व्या दिवसाचे विधी झाल्यानंतर तो कावळा पुन्हा दिसला नाही.
५. १० व्या दिवशीचे सर्व विधी होतांना वातावरणात आनंद जाणवत होता.
६. १३ व्या दिवशीचा विधी झाल्यावर घरात विविध रंगाचे दैवी कण दिसत होते.
१ ऐ. निधनानंतर आलेल्या अनुभूती
१ ऐ १. ‘दुःखाचा त्याग करणे ही गुरुदक्षिणा आहे’, असा विचार मनात येऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी विषय मांडण्याची सेवा करता येणे : आईच्या निधनानंतर ५ दिवसांनी गुरुपौर्णिमा होती. सातारा जिल्ह्यातील एका गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी मला वक्ता म्हणून विषय मांडण्याची सेवा होती. निधनाची बातमी कळल्यावर त्याच दिवशी ‘मला सेवा करायची आहे; कारण सेवेतून मला चैतन्य मिळणार आहे’, असा बुद्धीचा निश्चय झाला होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गुरुदेवांची ‘त्याग करणे’, ही खरी गुरुदक्षिणा आहे’, अशी चौकट प्रसिद्ध झाली होती. ती वाचल्यानंतर माझ्या मनात ‘आपल्या दु:खाचा त्याग करून सेवा करणे’, ही गुरुदक्षिणा आहे’, असा विचार आला. त्याआधी गुरुदेवांनीच २ वेळा माझ्याकडून सरावही करवून घेतला.
१ ऐ २. वक्ता म्हणून बाहेर गावी जाण्यासाठी नातेवाइकांनी वडिलांना मुलीला नकार द्यायला सांगणे; मात्र वडिलांनी ठामपणे सेवा महत्त्वाची असल्याचे सांगणे : गुरुपौर्णिमेच्या एक दिवस आधी मी माझ्या वडिलांना सांगितले, ‘‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला विषय मांडण्याची सेवा मिळाली आहे. ती करून मी पुन्हा घरी येते.’’ तेव्हा काही नातेवाईक बाबांना म्हणाले, ‘‘तिला कशाला पाठवता ?’’ त्या वेळी बाबांनीच नातेवाइकांना सांगितले की, ‘‘तिने सेवा करणे महत्त्वाचे आहे. तिला जायलाच पाहिजे.’’ अशा प्रकारे गुरुदेवांनीच बाबांना नातेवाइकांना सांगण्याचे बळ दिले. तसेच मलाही गुरुकृपेनेच स्थिर रहाता येऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी विषय मांडता आला.
१ ऐ ३. आईच्या निधनानंतर दुसर्या दिवशी स्वप्नात ‘श्री सत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले. त्या रात्रभर माझ्या समवेत बसून होत्या’, असे मला जाणवले.
१ ओ. प्रार्थना आणि कृतज्ञता : ‘गुरुदेवा, तुमच्या चरणी माझी श्रद्धा दृढ होऊदे. तुमच्याविना माझे कोणीच नाही. भक्त आणि देवाचे हे नाते आणखीन घट्ट होऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.
या प्रसंगात गुरुदेवांनीच माझी आणि माझ्या कुटुंबियांच्या मनाची सिद्धता करवून घेतली. आम्ही सर्व जण स्थिर राहू शकलो, ते केवळ गुरुदेवांमुळेच ! गुरुदेवांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. श्रीगुरु, सद्गुरु स्वातीताई, पू. (सौ.) मनीषाताई यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
२. पू. (सौ.) मनीषा महेश पाठक, पुणे
२ अ. ‘कै. (सौ.) कुसुम गावडे यांचा गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) अत्यंत भाव होता.
२ आ. सेवेत सहभाग : त्या प्रसारसेवा, खाऊ बनवणे, प्रदर्शन कक्ष, संपर्क सेवा, समाजात भाव सत्संगाची लिंक पाठवणे अशा सेवांमध्ये सहभागी होत असत. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या प्रसारात त्या त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी रात्री ८.३० पर्यंत थांबल्या होत्या. अशा प्रकारे त्या जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत सेवेत सहभागी होत्या.
२ इ. मुलांवर साधनेचे उत्तम संस्कार करणे : काकूंनी त्यांच्या तिन्ही (सौ. भक्ती डाफळे, सातारा (मोठी मुलगी, वय ३४ वर्षे), श्री. तुषार गावडे, चिंचवड (मधला मुलगा, वय ३२ वर्षे), कु. सोनल गावडे, चिंचवड (लहान मुलगी, वय २९ वर्षे) मुलांवर साधनेचे उत्तम संस्कार केले. त्यामुळे अशा कठीण प्रसंगातही त्यांची मुले स्थिर राहू शकली. तसेच त्यांनी त्याही स्थितीत साधनेचे प्रयत्न केले.
२ ई. श्री. नाथा यशवंत गावडे (वय ५६ वर्षे) यांनीही त्यांच्या पत्नी आणि मुलीला सेवेत साहाय्य करणे : काकूंचे यजमानही (श्री. नाथा यशवंत गावडे, वय ५६ वर्षे) त्यांना सेवेत साहाय्य करायचे. काकूंना सेवेला जायचे असल्यास त्यांना दुचाकीवरून सेवेच्या ठिकाणी सोडणे, परत घरी घेऊन येणे अशा प्रकारे त्यांनी साहाय्य केले. घरात इतका मोठा प्रसंग होऊनही गुरुपौणिमेच्या दिवशी सौ. भक्ती डाफळे यांनी सेवेला प्राधान्य दिले.
३. सौ. लता वाघ (वय ४७ वर्षे), वल्लभनगर
३ अ. प्रेमभाव : ‘काकू प्रेमळ होत्या. त्यांच्या बोलण्यात नम्रता असे. ‘प्रत्येक साधक हा आपल्या कुटुंबातील आहे’, असा त्यांचा भाव होता.
३ आ. भाव : गुरुपौर्णिमेच्या प्रसारात जिज्ञासूला त्या तळमळीने निमंत्रण देत असत. ‘कार्यक्रमाला अधिकाधिक जिज्ञासू येण्यासाठी योग्य प्रकारे माहिती कशी सांगता येईल ?’, असा त्यांचा भाव होता.
‘अशा साधक काकूंच्या समवेत गुरुदेवांनी समष्टी सेवेची संधी दिल्याबद्दल श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३०.७.२०२४)
कठीण परिस्थितीतही गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून स्थिर रहाणार्या सातारा येथील सौ. भक्ती डाफळे (वय ३४ वर्षे)
१. आईच्या निधनाचा प्रसंग स्थिर राहून स्वीकारणे : सौ. भक्ती समष्टी सेवेत असते. ताईला निवासी शिबिरे, सेवा यांसाठी रामनाथी, गोवा किंवा पुणे येथे जायचे झाल्यास ती मुलांना कधी सासरी, तर कधी माहेरी ठेवून जात असे. अशा वेळी ताईने तिच्या माहेरी मुलांना ठेवले, तरी तिची आई मुलांना सांभाळत असे. अशा प्रकारे आईही ताईला सेवेत साहाय्य करत असे. आईशी तिची जवळीक होती. असे असूनही आईच्या निधनाचा प्रसंग तिने स्थिर राहून स्वीकारला.
२. प्रवासात दत्ताचा नामजप करणे : अपघाती निधनाचे वृत्त ऐकल्यावरही ती स्थिर होती. ताईनेच मला भ्रमणभाषवरून सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर चिंचवडला आल्यावर तिची प्रत्यक्ष भेट झाली. ताई आणि तिचे सासरचे सर्व कुटुंबीय चारचाकीतून प्रवास करून आले होते. सर्व जण स्थिर राहून संपूर्ण प्रवासात दत्ताचा नामजप करत होते.
३. कुटुंबियांना आधार देणे : या कठीण समयी सौ. भक्ती हिने सर्व कुटुंबाला आध्यात्मिक स्तरावर आधार दिला आणि सर्व प्रसंग शांतपणे हाताळला.
४. वक्ता म्हणून विषय मांडण्याची सेवा भावपूर्ण करणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी ताईकडे सातारा येथे वक्ता म्हणून विषय मांडण्याची सेवा होती. याही स्थितीत ताईने विषयाची सिद्धता केली. त्या वेळी तिचा ‘गुरुदेव माझ्या समवेत असून तेच माझ्याकडून सेवा करवून घेणार आहेत’, असा भाव होता. तिच्यातील भावामुळे तिने सांगितलेला विषयही प्रभावी झाला.
५. साधनेची तळमळ : साधना म्हणून कसे प्रयत्न केले पाहिजे, होणारे त्रास, मानसिक स्थिती यांविषयी ती मोकळेपणाने बोलून घेत असे. तिला सांगितलेले उपायही तिने मनापासून केले. यातून तिची साधनेची तळमळ लक्षात आली.’
(पू.) सौ. मनीषा महेश पाठक, पुणे (३०.७.२०२४)
|