Rokeya Prachi Attacked : बांगलादेशातील हिंदु अभिनेत्री रोकेया प्राची यांच्यावर ढाकामध्ये आक्रमण !

विद्यार्थी आंदोलनात मारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता श्रद्धांजलीचा कार्यक्रम !

बांगलादेशातील हिंदु अभिनेत्री रोकेया प्राची

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशी अभिनेत्री रोकेया प्राची यांच्यावर ढाका येथे आक्रमण करण्यात आले. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे ‘बंगबंधू’ यांच्या ढाका येथील ऐतिहासिक निवासस्थानी त्या मेणबत्ती पेटवून निषेध व्यक्त करत होत्या. विद्यार्थी आंदोलनात मारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रद्धांजली वहाण्यासाठी आयोजित या मूक आंदोलनाच्या वेळी ३० ते ४० लोकांनी तेथे येऊन तेथे उपस्थित असणार्‍यांवर आक्रमण केले. या आंदोलनाचे आयोजन प्राची यांनी स्वत: केले होते. ही घटना १४ ऑगस्टच्या रात्री घडली.

भारतीय प्रसारमाध्यमांना राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या रोकेया प्राची यांनी माहिती देतांना सांगितले की, आक्रमणकर्ते माझ्यासाठी आले होते. त्यांना मला मारायचे होते. मी आधी अवामी लीगची सदस्या होते. त्यामुळेच त्यांनी माझ्यावर आक्रमण केले.

अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही आक्रमण !

१७ ऑगस्टच्या सकाळी ढाक्यातील ३२ धानमंडी रस्त्यावर अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानी जात होते. या सर्व आक्रमणांमागे विरोधी पक्ष ‘बी.एन्.पी.’, जमात-ए-इस्लामी, तसेच इतर अनेक विद्यार्थी संघटना असल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदोउदो करून हिंदूंना वेठीस धरणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील उपटसुंभ आता चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !