हणजूण आणि वागातोर परिसरात ३२ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन : कानाकोपर्‍यात पार्ट्यांचे फलक

(ट्रान्स पार्ट्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक संगीत आणि त्यावर नृत्य असलेल्या पार्ट्या)

म्हापसा – हणजूण आणि वागातोर परिसरात १४ ते १८ ऑगस्ट या कालावधीत एकूण ३२ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक माध्यमात करण्यात येत असलेल्या विज्ञापनाद्वारे मिळाली आहे. हणजूण आणि वागातोर परिसरात प्रत्येक कोपरा, विजेचे खांब, मार्केट, संरक्षक भिंती आदी सर्व ठिकाणी या पार्ट्यांचे फलक लावण्यात आले आहेत. याविषयी प्रसारमाध्यमांतून आवाज उठवल्यानंतर स्थानिक पंचायतीने काही ठिकाणचे फलक हटवले आहेत. याविषयी हणजूण येथील सामाजिक कार्यकर्ते अंकित साळगावकर म्हणाले, ‘‘विजेचे खांब आदी सरकारी मालमत्तेवरील विज्ञापनांवर लक्ष ठेवणे, हे प्रशासन, पोलीस आणि स्थानिक पंचायत सर्वांचेच काम आहे. या अनधिकृत पार्ट्या आणि ध्वनीप्रदूषण यांस हे सर्व जण उत्तरदायी आहेत.’’

संपादकीय भूमिका 

प्रशासन झोपा काढत आहे का ?