गोव्याबाहेरील प्रसारमाध्यमांकडून गोव्यात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत नसल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित

गोवा सरकार अशी वृत्त संकेतस्थळे आणि वृत्तवाहिन्या यांच्यावर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १५ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी मुक्त झाला. यानंतर १५ ऑगस्ट १९६२ पासून प्रतिवर्ष गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, तरीही गोव्याबाहेरील काही प्रसारमाध्यमांनी ‘गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही’, असे वृत्त प्रसारित केले आणि हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून होत आहे.

यंदा‘झी न्यूज २४ तास’ या वृत्त संकेतस्थळाने १४ ऑगस्ट या दिवशी ‘गोव्यात कधीच भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही’, असे वृत्त प्रसारित केले. त्यानंतर गोमंतकियांनी सामाजिक माध्यमातून ‘झी न्यूज २४ तास’ हे वृत्त संकेतस्थळ आणि संबंधित पत्रकार यांना त्यांची चूक दाखवून दिली. यानंतर त्वरित ही वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवण्यात आली. गोव्यातील काँग्रेसने खोटे वृत्त प्रसारित करून गोव्याला अपकीर्त केल्याच्या प्रकरणी ‘झी न्यूज २४ तास’ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

याविषयी पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘सरकारने या वृत्तवाहिनीला चूक लक्षात आणून दिल्यानंतर ‘गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही’, असे प्रसिद्ध केलेले वृत्त गोव्याबाहेरील संबंधित वृत्तवाहिनीने संकेतस्थळावरून (पोर्टलवरून) काढून टाकले आहे. गोवा सरकार असे चुकीचे वृत्त प्रकाशित करणारे वृत्त संकेतस्थळ आणि वृत्तवाहिन्या यांच्यावर कारवाई करणार आहे.’’

गोव्याबाहेरील काही प्रसारमाध्यमे गोव्याविषयी चुकीचे वृत्त प्रकाशित करत असल्याचे उघड

गोव्याबाहेरील काही प्रसारमाध्यमे गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नसल्याचे चुकीचे वृत्त गेल्या काही वर्षांपासून प्रसारित करत आहेत. ‘जनसत्ता’ने ७ ऑगस्ट २०२२ आणि ‘डेक्कन हेराल्ड’ने १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी अशा स्वरूपाचे वृत्त प्रकाशित केले होते. याचबरोबर ‘झी न्यूज’, ‘नवभारत टाइम्स’, ‘नई दुनिया’, ‘नवराष्ट्र’, ‘फर्स्टपोस्ट, ‘सकाळ’, ‘हॅल्लो महाराष्ट्र’, ‘इंटरटेन्स’ आदी प्रसारमाध्यमांनी अशाच प्रकारची वृत्ते यापूर्वी प्रकाशित केली आहेत. यामुळे गोमंतकियांमध्ये संतापाची लाट आहे. चुकीची माहिती प्रसारित करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ‘ओ.एस्.डी.’ आत्माराम बर्वे यांच्यासह अनेकांनी केली आहे.