राज्यात ‘ईडी’च्या १४ ठिकाणी धाडी !

शेकडो बनावट आस्थापनांद्वारे ४ सहस्र कोटी रुपयांचा अपहार उघड !

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने राज्यात मे. कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्याशी संबंधित मनोज जयस्वाल, अभिजीत जयस्वाल, अभिषेक जयस्वाल आदींशी संबंधित १४ ठिकाणी धाड घातली. यात २५० हून अधिक बनावट आस्थापनांद्वारे ४ सहस्र कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले. या कारवाईत २०५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, डिमॅट खाती आणि ‘म्युच्युअल फंड’ गोठवण्याची प्रक्रिया चालू आहे. कारवाईत ५५ लाख रुपयांची रक्कम सापडली आहे.

बनावट आस्थापने काढून अपहाराची रक्कम त्यात वळवण्यात आल्याचे अन्वेषणात आढळले. बनावट आस्थापनांनी खोट्या प्रकल्पांच्या व्ययाची कागदपत्रे देऊन कर्ज घेतले. युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून ईडीने कारवाई केली.