हिंदूंवरील आघातांच्या विरोधात १७ ऑगस्टला ‘हिंदु धर्म परिषदे’चे आयोजन ! – सकल हिंदु समाज, कोल्हापूर
देव, देश आणि धर्म यांच्या हितासाठी ठराव आणि धर्मरक्षणाची शपथ !
कोल्हापूर, १५ ऑगस्ट (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवर तेथील धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहे. तेथील सैन्य आणि हंगामी सरकार हिंदूंचे रक्षण करण्यास असमर्थ दिसून येत आहे. त्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्या आघातांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी १७ ऑगस्टला ‘हिंदु धर्म परिषद’ आयोजित केली आहे. या परिषदेला दसरा चौक येथील शाहू स्मारक येथे सकाळी १० वाजता प्रारंभ होईल, अशी माहिती सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या परिषदेत ‘हिंदुत्व’ या विषयावर सद्गुरु संतोष तथा बाळ महाराज यांचे, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि आजचे वास्तव’ यावर प्रा. राजेंद्र ठाकूर यांचे, ‘हिंदु धर्मावर होणारे विविध आघात आणि लव्ह जिहाद’ या विषयावर सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये या मुख्य वक्त्यांचे, तसेच अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या धर्मपरिषदेचे औचित्य साधून आई अंबाबाई, आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन देव, देश आणि धर्म हिताचे १५ ठराव संमत केले जाणार असून हिंदु धर्मरक्षणाची शपथ घेतली जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजाजन तोडकर, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजित पाटील आणि श्री. विकी जरग, श्री. वाघापूरकरदादा, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शिवसेनेचे श्री. अर्जुन आंबी, ‘मराठा तितुका मेळवावा संघटने’चे श्री. योगेश केरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, मराठा व्यावसायिक संघटनेचे श्री. प्रसन्न शिंदे यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.