भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म आणि हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक ३६)
प्रकरण ६
२. दृश्य आणि अदृश्य विश्व हे केवळ परमात्म्याचेच स्वरूप !
इतक्या अपरिवर्तनीय भक्कम सिद्धातांनी युक्त ग्रंथ सहस्रो वर्षांपूर्वी कसे उत्पन्न झाले असतील ? आज अत्यंत प्रगत, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाची साधने उपलब्ध होऊनही कोणते अपरिवर्तनीय शाश्वत सिद्धांत संशोधित झाले आहेत ? किंबहुना विज्ञानाचा प्रत्येक शोध हा त्याच्याच मागील शोधाला खोटा ठरवणारा आणि त्याच्यानंतर येऊ शकणार्या पुढील शोधांकडून खोटा ठरवला जाणारा असतो.
तो एकमेवाऽद्वितीय ब्रह्म त्याला ‘एकोऽहं बहु स्याम् ।’ (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मवल्ली, अनुवाक ६) म्हणजे ‘मी एक आहे, माझे अनेकात रूपांतर व्हावे’, अशी प्रेरणा झाली आणि तोच विश्व बनला. त्यामुळे सारे दृश्य आणि अदृश्य विश्व हे केवळ परमात्म्याचेच स्वरूप आहे. त्यापेक्षा भिन्न नाही. त्यामुळे या विश्वाचे उपादान आणि निमित्त कारणही तोच परमात्मा आहे. तोच सारे विश्व बनला, म्हणजेच ‘सारे विश्व त्यानेच उत्पन्न केले’, असे व्यवहारात आपण म्हणतो.
३. गुणधर्मांनुसार पदार्थांची उत्पत्ती आणि कर्तव्यनिश्चिती !
संपूर्ण सृष्टीतील, पदार्थांच्या उत्पत्तीसमवेतच त्यांचे गुणधर्म उत्पन्न झाले किंवा गुणधर्मांसहच सारे पदार्थ उत्पन्न झाले अन् त्यानुसारच त्यांची कर्तव्ये निश्चित झाली. कावळा म्हटला की, तो काळाच असायचा. त्याचे घरटे कसे ? त्याचे आयुष्य किती ? त्याचे अंडे कसे ? त्या अंड्याचा काळ किती ? कावळ्याचे अन्न काय ? त्याने खावे काय, प्यावे काय, हे सारे त्याच्या उत्पत्ती समवेतच ठरले. ज्याने उत्पन्न केले, त्याने ठरवले की, कावळ्याने काव काव करावे, कोकिळेने कुहू कुहू करावे. कावळ्याने घरटे बांधावे, कोकिळेने त्यात अंडी टाकावी. हे त्याने ठरवले.
४. मर्यादा ओलांडू नये !
‘पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय ९, ओवी २८२) म्हणजे ‘डोंगरांनी आपले आसन सोडू नये, समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघू नये.’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘पर्वताने आपली बैठक सोडायची नाही. सह्याद्रीने हिमालयाला भेटायला जायचे नाही. समुद्राने आपली मर्यादा ओलांडायची नाही.’
५. पिंडाला कावळा शिवणे आणि न शिवणे यांमागील अध्यात्मशास्त्र !
मेलेला माणूस केवळ चैतन्यरूपाने दहाव्या दिवशी विधीपूर्वक आवाहन केल्यावर येतो. विधीविधान झाल्यावर तो तृप्त, वासनारहित असेल, तर विसर्जन केल्यावर जातो; पण तसे नसेल, तर तेथून हालत नाही. आपल्याला तर केवळ पिंडच दिसतो. त्या पिंडावर ती व्यक्ती म्हणून आपण संस्कार केलेले असतात. तो तेथून हालला नाही, तर केवळ कावळ्यालाच प्रत्यक्ष व्यक्तीरूपांत तो दिसतो. मग तो पिंड तेथेच ठेवून बाकीचे लोक मागे सरकतात आणि कावळ्याची वाट पहातात. हाका मारतात. कावळे जवळ येतात. पुनःपुन्हा वाकडी मान करून पिंडाकडे पहातात; पण त्या पिंडाला शिवत नाहीत. कसे शिवतील ? त्यांना व्यक्ती दिसते. मग बाजूचे लोक ‘त्या व्यक्तीच्या अतृप्त इच्छांचा अंदाज घेऊन आपण पूर्ण करू’, असे मान्य करतात. त्यात त्याची इच्छा जाणून मान्यता झाली, तर ती व्यक्ती जाते. आता मात्र कावळ्याला केवळ भातच दिसतो. स्वाभाविकच तो पिंडाचा फडशा पाडतो. कावळा या प्राण्याच्या दृष्टीमध्ये हे सामर्थ्य आहे.
६. शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी !
विश्वव्यवस्थेचा एक भाग आहे. विश्वनिर्मात्या ईश्वरालाच सर्व पदार्थ-जातींचे गुणधर्म पूर्णत्वाने ठाऊक आहेत. त्यांची उपयुक्तताही पूर्णपणे ठाऊक आहे; म्हणूनच त्यांची कर्तव्ये त्यानेच कायमची ठरवून दिली. गाय, म्हैस, घोडा, हत्ती इत्यादी प्राणी शाकाहारी आहेत, तर वाघ, सिंह, कुत्रा, लांडगा, कोल्हा इत्यादी प्राणी मांसाहारी आहेत. त्यांचा आहार त्यांच्या उत्पत्तीसमवेतच ठरला. मग मांसाहारी प्राण्याला शिकार करणे, हे स्वाभाविक कर्तव्य आले. शाकाहारी प्राण्याच्या मांसाला विशेष रूची असते आणि शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत आणि पशुत्वहीन असतात. यामुळे स्वाभाविकच ते मांसाहार्यांचे शिकार होतात. लाकूड पाण्यावर तरंगते आणि आगीत जळते. या गुण-धर्मापायी अन्न शिजवण्यासाठी विस्तवाची आवश्यकता असल्याने लाकूडच जाळले जाते आणि होड्या तरंगणार्या लाकडाच्याच बनवल्या जातात.
(क्रमश:)
– भारताचार्य, धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे
(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/825227.html