RSS Chief On Bangladesh : बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

स्वसंरक्षण आणि स्वातंत्र्य, हेच भारताचे प्राधान्य असल्याचेही प्रतिपादन !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

नागपूर – बांगलादेशातील हिंदूंना त्रास होऊ नये, हे पहाणे एक देश म्हणून सरकारचे जसे दायित्व आहे, तसे आपलेही आहे. सरकार त्याचे काम करेलच; मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक आहे. देशात योग्य आणि शांततेचे वातावरण निर्माण करणे हे सर्वांचे दायित्व आहे. त्यासाठी समाजाने आपल्या जीवनातील छोट्या-छोट्या समस्यांवर उपाय शोधला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. भागवत पुढे म्हणाले,

१. देशासाठी बलीदान करणारा समूह आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज, यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी तर निघून गेली; पण आजच्या पिढीवर स्वातंत्र्याच्या रक्षणाचे दायित्व आहे.

२. देशाच्या सीमेवर सैनिक लढतात. त्यांच्या कुटुंबाची काळजी करणे, ‘स्व’ काय आहे ?, हे समजून आचरण करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

३. स्वातंत्र्य मिळालेल्या देशासाठी जे मार्ग निवडले आहेत, त्यांवरून चालणे आवश्यक आहे. त्यासाठी घटनात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

४. शेजारील देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे. तेथील हिंदू बांधवांना आजही विनाकारण चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे स्वसंरक्षण आणि स्वातंत्र्य, हेच भारताचे प्राधान्य असून ते प्रत्येकाचे दायित्व आहे.