दोडामार्ग येथे बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्याची हिंदू रक्षा समितीची मागणी
दोडामार्ग – बांगलादेशात सध्या चालू असलेल्या हिंदूंच्या हत्या दुर्दैवी असून हिंदूंना कुणी वाली राहिला नाही. त्यामुळे भारत सरकारने तात्काळ बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्यावे आणि त्या सर्व हिंदूंना भारतात आणून प्रस्थापित करावे. समान नागरी कायदा, समान शिक्षण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदे तात्काळ लागू करावेत. ‘हिंदू रक्षा समिती दोडामार्ग’चा भारत सरकारच्या राष्ट्र आणि हिंदु धर्माविषयीच्या कार्याला संपूर्ण पाठिंबा राहील, असे निवेदन ‘हिंदू रक्षा समिती’ने येथील तहसीलदार अमोल पवार यांना दिले.
येथील ‘महाराजा हॉल’मध्ये भारतमाता की जय, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, दत्त संप्रदाय, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ यांची बैठक झाली. या बैठकीत लव्ह जिहाद, भूमी जिहाद, थूक जिहाद, तसेच बांगलादेशात हिंदूंवर होणारी आक्रमणे यांविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी ‘हिंदू रक्षा समिती’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर येथील गांधी चौकात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या समितीच्या माध्यमांतून तहसीलदार, पोलीस ठाणे आणि नगरपंचायत येथे निवेदन देण्यात आले.
दोडामार्गमध्ये यापूर्वी बांगलादेशी युवक सापडले होते. दोडामार्गमध्ये अनेक परप्रांतीय लोकांचे वास्तव्य आहे. याची सखोल चौकशी करावी. दोडामार्गचा काही भाग ‘मिनी (छोटा) पाकिस्तान’ झाल्याचा संशय बळावत आहे. ११ ऑगस्ट या दिवशी म्हापसा, गोवा येथून नजरकैदेतून बांगलादेशी पसार झाले असून ते दोडामार्गमध्ये आश्रयाला असण्याची शक्यता आहे. याची सखोल चौकशी करून अशा राष्ट्रविघातक व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी हिंदू रक्षा समितीचे निमंत्रक गणेश गोपाळ गावडे, महादेव प्रभाकर वझे, नीलेश नामदेव साळगावकर, नीलकंठ फाटक, राजेश धर्णे, निश्चल परमेकर, मोहिनी रेडकर, नीलम गवस, वैभव रेडकर, महेश शेटकर, प्रवीण गोलम, झिलू गवस, गुरुनाथ नाईक आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी निवेदन दिले.
दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याचे आवाहन !हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या बैठकीत ‘भारतमाता की जय’ संघटनेचे पदाधिकारी तथा दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. गणेश गावडे यांनी उपस्थितांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगितले, तसेच इतर दैनिकांपेक्षा दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यायोग्य आहे. नेहमी निर्भीडपणे बातम्या दिल्या जातात, असे सांगून दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याचे आवाहन केले. |