साम्यवाद्यांशी वैचारिक पातळीवरील अंतिम लढाईत हिदूंनी जागरूक आणि सर्वार्थाने सुसज्ज रहाण्याची आवश्यकता !
इकोसिस्टीम (यंत्रणा) : साम्यवाद्यांचे मायावी महाजाल
‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या माझ्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात ‘डाव्यांनी (साम्यवाद्यांनी) पाश्चिमात्य संस्कृतीच्या विध्वंसासाठी योजना आखून १०० हून अधिक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ती कशी पूर्णत्वाला नेली’, याविषयी मी विवेचन केले आहे. या पुस्तकाविषयी चर्चा करतांना माझा एक मित्र मला म्हणाला, ‘‘जगात साम्यवाद्यांची सगळीकडे पीछेहाट झाली आहे. एखादा-दुसरा देश सोडला, तर ते कुठेही सत्तेवर नाहीत. त्यांच्याकडे इतकी शक्ती कुठे आहे की, ते अमेरिका आणि पश्चिम युरोप यांसारख्या महासत्तांचा विध्वंस घडवू शकतील ?’’ अनेक लोकांच्या मनात ही शंका असते; कारण ते जेव्हा ‘साम्यवाद्यांकडे कुठे इतकी शक्ती आहे ?’, असे म्हणतात, तेव्हा ते केवळ ‘हार्ड पॉवर’चा विचार करत असतात. देशाची आर्थिक, औद्योगिक, सैन्य शक्ती ही ‘हार्ड पॉवर’ मानली, तर त्याची भाषा, संस्कृती, साहित्य, शिक्षण ही त्याची ‘सॉफ्ट पॉवर’ ठरते. साम्यवाद्यांकडे आज सोव्हिएत युनियनसारखी शक्तीमान राष्ट्रे नाहीत. चीन केवळ नावालाच कम्युनिस्ट (साम्यवादी) आहे. त्यांची आर्थिक धोरणे पूर्णपणे उजवी आहेत आणि आता तर ते चीनच्या प्राचीन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून एक ‘सुसंस्कृत जग’ (सिव्हिलायझेशनल स्टेट) बनण्याकडे वाटचाल करत आहे, जे साम्यवादी विचारसरणीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. यामुळे साम्यवाद्यांकडे ‘हार्ड पॉवर’ नसली, तरी त्यांची ‘सॉफ्ट पॉवर’ मात्र पुष्कळ चांगली आहे आणि या ‘सॉफ्ट पॉवर’चे महत्त्वही वादातीत आहे.
(टीप : ‘इकोसिस्टीम’ म्हणजे देशात कुठले प्रश्न, विषय, घटना यांची चर्चा होते, कुठली सूत्रे प्राधान्याने पुढे आणली जातात, त्याविषयी कुणाची मते ग्राह्य धरली जातात, हे ठरवणारी व्यवस्था !)
१. ‘सॉफ्ट पॉवर’चे महत्त्व
इंग्लंड ही जेव्हा महासत्ता होती, तेव्हा इंग्रजी भाषा आणि एक सुसंस्कृत देश ही प्रतिमा त्यांची ‘सॉफ्ट पॉवर’ होती. त्यामुळे उघड्या साम्राज्यवादावर ‘व्हाइट मॅन्स बर्डन’, म्हणजे सगळ्या जगाला सुसंस्कृत करण्याचे उत्तरदायित्व आमच्यावर असल्याचे गोंडस वस्त्र ते चढवू शकले. आज मोठी माहिती तंत्रज्ञान आस्थापने, हॉलीवूड आणि गुणवत्तेचा सन्मान करणारी दर्जेदार शिक्षणपद्धत ही अमेरिकेची ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. तिच्यामुळे जगभरातील हुशार, प्रतिभावान लोक अमेरिकेकडे आकर्षित होतात आणि तेच त्यांची आर्थिक, वैज्ञानिक, तसेच सैनिकी (लष्करी) ‘हार्ड पॉवर’ निर्माण करतात. आजवर केवळ आर्थिक आणि सैनिकी शक्तीवर महासत्ता बनू पहाणार्या चीननेही आता ‘सॉफ्ट पॉवर’चे महत्त्व ओळखले आहे. म्हणूनच जगभरातील हुशार विद्यार्थ्यांनी अमेरिकेपेक्षा चीनमधील विद्यापिठांमध्ये यावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यांनी तशी सिद्धताही चालू केली आहे.
२. रक्तरंजित क्रांतीपेक्षा सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून साम्यवादी क्रांती करण्याची योजना !
साम्यवाद्यांनी ‘इकोसिस्टीम’चे महत्त्व कधी आणि कसे जाणून घेतले ? याची कथा विलक्षण आहे. मुळात साम्यवाद्यांचा भर हा बंदुकीच्या नळीतून येणार्या रक्तरंजित क्रांतीवर, म्हणजेच ‘हार्ड पॉवर’वर होता. दुसरे महायुद्ध चालू असतांना रूझवेल्ट आणि चर्चिल यांनी ‘आपण पोपना मित्रराष्ट्रांच्या बाजूने भूमिका घेण्याचे आवाहन करूया’, असा प्रस्ताव मांडला. तेव्हा पोपकडे किती ‘डिव्हिजन’ सैन्य आहे ? असा प्रश्न स्टॅलिनने केला होता. साम्यवाद्यांचा महागुरु कार्ल मार्क्सने असे भविष्य वर्तवले होते की, ‘कामगारांची रक्तरंजित क्रांती सर्वप्रथम औद्योगिक प्रगती झालेल्या देशांमध्ये, म्हणजेच इंग्लंड आणि जर्मनीमध्ये होईल’; पण ती औद्योगिकरणाचा वाराही न लागलेल्या रशियामध्ये झाली. पश्चिम युरोपमधील कामगारांनी क्रांतीकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि भांडवलशाहीतून येणार्या समृद्धीत ते आनंदाने सहभागी झाले. त्याच वेळी कामगारांची रक्तरंजित क्रांती ही कल्पना बाजूला ठेवून साम्यवाद्यांनी एक नवी रणनीती आखली.
इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष अँटोनियो ग्राम्स्की आणि जर्मनीतील फ्रँकफर्ट विद्यापिठातील काही साम्यवादी विद्वानांनी असा विचार मांडला की, पश्चिमात्य देशातील कामगार क्रांतीसाठी सिद्ध होत नाहीत; कारण ते आपल्या देशाची संस्कृती ही त्यांची संस्कृती मानतात. त्यांना क्रांतीसाठी सिद्ध करायचे असेल, तर त्यांना पश्चिमात्य संस्कृतीपासून तोडले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी त्यांनी ‘लाँग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स’ (विविध संस्थांच्या माध्यमातून पालट करण्यासाठीची नीती) या नव्या रणनीतीची आखणी केली. यानुसार पश्चिमात्य संस्कृती ज्या आधारांवर उभी आहे त्या कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, शिक्षण, देशप्रेम, लोकशाही या सगळ्या संस्थांना वाळवीप्रमाणे हळूहळू पोखरून टाकत त्यांचा विध्वंस घडवून आणायचा. हे बंदुकीच्या नळीतून, म्हणजेच ‘हार्ड पॉवर’च्या साहाय्याने साध्य होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी माध्यमे, विद्यापिठे, चित्रपट निर्मिती, इतिहास यांसारख्या आणि माणसांच्या मनावर प्रभाव टाकणार्या संस्था कह्यात घेण्याची योजना आखली, म्हणजेच त्यांनी ‘हार्ड पॉवर’ऐवजी ‘सॉफ्ट पॉवर’वर स्वतःची सत्ता निर्माण करण्याचे ठरवले.
३. ‘सांस्कृतिक मार्क्सवादा’च्या माध्यमातून चालणारी साम्यवाद्यांची विध्वंसक ‘इकोसिस्टीम’ !
गेल्या १०० वर्षांच्या प्रयत्नांतून त्यांनी ही प्रक्रिया पूर्णत्वाला नेली आहे. या तंत्रावर त्यांनी संपूर्ण सत्ता प्राप्त केली आहे. आज अमेरिकेतील शालेय शिक्षण, विद्यापिठे, माध्यमे, हॉलीवूड, मोठी माहिती-तंत्रज्ञान आस्थापने यांसारख्या ‘सॉफ्ट पॉवर’च्या सर्व स्रोतांवर साम्यवाद्यांची पोलादी पकड आहे. ‘अमेरिकेत साम्यवादी कुठे आहेत ?’, असा अनेकांचा भाबडा समज असतो; पण वास्तव त्याच्या पूर्णपणे विपरीत आहे. मार्क्सवादाच्या नव्या स्वरूपाने, म्हणजेच ‘सांस्कृतिक मार्क्सवादा’ने अमेरिकेसह संपूर्ण पाश्चिमात्य जगताला विध्वंसाच्या टोकावर आणून उभे केले आहे. ‘मानवी व्यवहारातील प्रत्येक विषयाकडे केवळ शोषक-शोषित या दृष्टीनेच बघायचे आणि सतत संघर्ष भडकता ठेवायचा’, या सांस्कृतिक मार्क्सवादाच्या रणनीतीने आज अमेरिका हा पूर्णपणे विभाजित झालेला देश ठरला आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, साम्यवाद्यांची ही विध्वंसक ‘सॉफ्ट पॉवर’ त्यांच्या ‘इकोसिस्टीम’च्या रूपाने भारतातही कार्यरत आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारच्या छत्रछायेखाली या ‘इकोसिस्टीम’ने भारतातील माध्यमे, न्यायव्यवस्था, बॉलीवूड, नोकरशाही, विद्यापिठे, सांस्कृतिक आणि इतिहासविषयक संस्था, अशा ‘सॉफ्ट पॉवर’च्या विविध केंद्रांवर जबरदस्त पकड बसवली आहे.
४. साम्यवाद्यांची भारताविषयीची उद्दिष्टे आणि त्याचे स्वरूप !
साम्यवाद्यांनी भारतात नेहमीच प्रमुख २ उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून काम केले आहे.
अ. एक म्हणजे भारताला खंडित करून त्याचे अधिकाधिक तुकडे करणे.
आ. दुसरे उद्दिष्ट म्हणजे हिंदु धर्माचा सतत तेजोभंग आणि विनाश घडवून आणणे. ‘अधिकारी डॉक्ट्रिन’ या नावाने ओळखल्या जाणार्या साम्यवाद्यांच्या धोरणानुसार त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे, ‘भारत हे एक कृत्रिम प्रजासत्ताक असून त्याचे १६ तुकडे होणे आवश्यक आहे.’ यानुसार पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आंदोलन जरी ‘मुस्लीम लीग’ने केले असले, तरी त्याची वैचारिक चौकट साम्यवाद्यांनी सिद्ध केली होती. खलिस्तानची चळवळ, काश्मीरमधील आणि ईशान्येकडील फुटीरतावाद, देशाच्या राज्यघटनेच्या विरुद्ध युद्ध पुकारणारी नक्षलवादी चळवळ, या भारताचे तुकडे करू पाहणार्या प्रत्येक कारस्थानाला साम्यवाद्यांचा सक्रीय पाठिंबा असतो. अनेक तथाकथित विचारवंत, लेखक, कवी, पत्रकार ज्यांना हल्ली ‘अर्बन नक्षल्स’ (शहरी नक्षलवादी) या नावाने ओळखले जाते, अशा लोकांचा या कारस्थानांमध्ये सक्रीय सहभाग असतो. महत्त्वाचे हे की, या कारवाया उघड आणि सर्वज्ञात असूनही त्यांना जामीन देण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रात्री १२ वाजता न्यायालयाचे दरवाजे उघडतात. त्यांच्याविरुद्ध कुठली कारवाई केल्यास माध्यमांतील त्यांचे हस्तक जगभर ‘भारतातील लोकशाही संपली’, असे म्हणून अपप्रचाराची राळ उठवतात. त्यामुळे उघड देशद्रोही कारवाया करूनही त्यांच्याविरुद्ध कुठलेही पाऊल १० वेळा विचार करून उचलावे लागते. ही आहे साम्यवाद्यांच्या ‘इकोसिस्टीम’ची शक्ती, म्हणजेच त्यांची ‘सॉफ्ट पॉवर’ !
५. हिंदु धर्माचा तेजोभंग करण्यासाठी भारतातील साम्यवाद्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका !
भारतातील साम्यवादी हिंदु धर्माचा तेजोभंग करण्याचे काम, तर एखादे व्रत असावे, अशा निष्ठेने करतात. त्यासाठी ते इतिहास क्षेत्रावरील त्यांच्या एकाधिकारशाहीचा पुरेपूर वापर करतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून इतिहास क्षेत्रावरील साम्यवाद्यांच्या प्रभावामुळे भारताच्या इतिहासात हिंदु धर्माचे चित्रण नेहमीच नकारात्मक पद्धतीने करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात इतिहास लेखनात मोठी भूमिका बजावणारे २ गट होते.
अ. पहिला म्हणजे मुसलमान विद्वानांचे देवबंद स्कूल आणि अलीगड स्कूल. या गटाच्या वतीने इतिहास लेखनाचे काम मुख्यतः हाताळले ते महंमद हबीब यांनी. ते स्वतः साम्यवादी होते. त्यामुळे त्यांनी नेहमी साम्यवाद्यांच्या ‘अजेंडा’नुसारच (कार्यप्रणालीनुसार) इतिहास लेखन केले.
आ. दुसरा गट होता काँग्रेस पक्षाचा. त्यांच्या वतीने इतिहास लेखनाचे काम पार पाडणारे एम्.एन्. रॉय हेही साम्यवादीच होते. यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही अहमहमिकेने सहभाग घेतल्यामुळे भारताचे इतिहास क्षेत्र पूर्णपणे साम्यवाद्यांच्या कह्यात गेले.
५ अ. भारताच्या इतिहासात एकांगी लिखाण करणे : वर्ष १९६९ मध्ये इंदिरा गांधींचे सरकार अल्प मतात आले, तेव्हा सरकार वाचवण्याच्या मोबदल्यात साम्यवाद्यांनी इतर कुठलेही खाते न मागता शिक्षण मंत्रालय मागून घेतले आणि साम्यवादी नुरुल हसन हे शिक्षणमंत्री झाले. त्याच वर्षी जवाहरलाल नेहरू विद्यापिठाची (जे.एन्.यू.ची) स्थापना झाली आणि तेथील रोमिला थापर, इरफान हबीब, डी.एन्. झा यांसारख्या ‘जे.एन्.यू. हिस्टॉरियन्स’ (जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील इतिहासतज्ञ) या नावाने ओळखल्या जाणार्या इतिहासकारांनी शिक्षणमंत्री नुरुल हसन यांच्यासह संपूर्ण समन्वयाने काम करून भारताचा इतिहास कमालीच्या एकांगी पद्धतीने लिहिला. ‘त्यांच्याशी सहमत नसलेल्या कुणालाही इतिहास क्षेत्रात काम करणे अशक्य व्हावे आणि इतर कुठलाही मतप्रवाह शेषच राहू नये’, अशी चोख व्यवस्था केली. या टोळक्याने लिहिलेल्या इतिहासाचे मुख्य उद्दिष्ट ‘इस्लामी आक्रमकांनी १ सहस्र वर्षे केलेल्या कत्तली, बलात्कार, मंदिरांचा विध्वंस आणि अत्याचार आदी काही झालेच नाहीत; म्हणून संपूर्णपणे नाकारणे अन् भारताचा इतिहास हा केवळ पराभव आणि गुलामगिरी यांचा इतिहास आहे’, हा समज रुजवणे हेच होते. यामुळे भारतियांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान यांना मोठा धक्का बसून देशाची प्रचंड हानी झाली. हिंदु धर्माच्या गौरवशाली परंपरेला भाकडकथा ठरवून नाकारण्यात आले आणि जे हिंदु ते जुनाट, टाकाऊ अन् त्याज्य ठरवण्यात आले. या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडून भारताचे सांस्कृतिक पुनरुत्थान करण्याचे काम स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी आता कुठे चालू होत आहे.
६. भारतात साम्यवाद्यांनी राबवलेल्या ‘इकोसिस्टीम’च्या घटना
असे असले, तरी या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ विरुद्धचा लढा हा कठीण आणि प्रदीर्घ काळ चालणारा असेल, हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण पाहिले त्यानुसार त्यांनी १०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नातून ही इकोसिस्टीम निर्माण केली आहे. त्यामुळे जगभरातील साम्यवाद्यांची ही यंत्रणा एखाद्या तेल-पाणी दिलेल्या यंत्रासारखे काम करते. भारतात थोडेसे काही झाले, तरी ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या नियतकालिकांमध्ये लेख येतात, जगभरातील ‘सेलिब्रिटीज’ (प्रतिष्ठित) ‘एक्स’वर (पूर्वीचे ‘ट्विटर’वर) वादळ निर्माण करतात, भारतातील न्यायालयांमध्ये जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केल्या जातात, रस्त्यावर आणि विद्यापिठांमध्ये धरणे आंदोलन केले जाते अन् एखाद्या बिनमहत्त्वाच्या विषयाला मोठ्या प्रमाणात भडकवले जाते. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’(सीएए)विरोधी आंदोलन, शाहीन बाग, देहलीतील दंगली, शेतकरी आंदोलन यांसारख्या विविध प्रसंगांमध्ये साम्यवादी ‘इकोसिस्टीम’च्या या कार्यशैलीचा आपण अनुभव घेतला आहे. ‘सीएए’चा भारतीय मुसलमानांशी काहीही संबंध नसतांना ‘मुसलमानांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार’, हा समज कसा पसरवला गेला ? देहली दंगलीत दोन्ही बाजूच्या लोकांचे जीव जात असतांना ‘मुसलमानांची कत्तल’, असे त्या दंगलीचे चित्र कसे उभे केले गेले ? एम्.एस्. स्वामिनाथन् यांच्यासह सगळ्या कृषी तज्ञांनी ‘शेतकरी कायदे आवश्यक आहेत’, असे एकमुखाने सांगूनही ‘ते शेतकर्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतील’, हा अपप्रचार कसा केला गेला ? यांसारख्या अनेक उदाहरणांवरून साम्यवाद्यांकडे ‘हार्ड पॉवर’, म्हणजे सत्ता नसली, तरी त्यांची ‘सॉफ्ट पॉवर’, म्हणजे ‘इकोसिस्टीम’ किती परिणामकारक आणि घातक ठरू शकते, हा अनुभव आपण घेतला आहे.
७. साम्यवाद्यांची भारतविरोधी हातमिळवणी आणि त्या विरोधात भारतियांनी करावयाचे प्रयत्न
‘द कश्मीर फाइल्स’मधील वाक्य आहे, ‘सरकार उनकी है तो क्या हुआ, सिस्टीम तो हमारा है ।’ (सरकार त्यांचे असले, तरी यंत्रणा आपली आहे), हे पुन:-पुन्हा खरे ठरतांना आपण बघत आहोत. याविरुद्ध लढणारी यंत्रणा उभी करायची, तर साम्यवाद्यांकडून बर्याच गोष्टी शिकाव्या लागतील. भावनेच्या आहारी न जाता डोके शांत ठेवून नियोजनबद्धरितीने विचारपूर्वक पावले कशी टाकायची ? उघड प्रचार वाटेल अशी भडक मांडणी न करता, ज्याला ‘सटल’ (संयत) किंवा ‘सब्लिमिनल मेसेजिंग’ (अचेतन संदेश) म्हणतात, अशा पद्धतीने स्वतःचे म्हणणे कसे पोचवायचे ? हे तंत्र शिकून घ्यावे लागेल. सखोल अभ्यास करून चिरेबंद मांडणी कशी करायची ? हेही समजून घ्यावे लागेल. एकांडे शिलेदार बनून काम न करता एकमेकांशी समन्वय राखून सुसूत्र पद्धतीने ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) कसे उभे करायचे ? यावर पकड मिळवावी लागेल; पण कितीही अवघड असले तरी हे करणे अनिवार्य आहे; कारण भारताचे तुकडे आणि हिंदु धर्माचा विनाश ही उद्दिष्टे समोर ठेवून पावले उचलणाऱी ही यंत्रणा आता भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून ती जागतिक स्तरावर कार्यरत आहे.
आज ‘अमेरिकेतील वंशवाद, म्हणजे भारतातील जातीयवाद, अमेरिकेतील काळे, म्हणजे भारतातील दलित, अमेरिकेतील गोरे, म्हणजे भारतातील उच्चवर्णीय’, अशी मांडणी केली जात आहे. अमेरिकेत यशस्वी होणार्या भारतियांवर ‘जातीयवादी’ म्हणून खटले प्रविष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारताच्या आयआयटीज् (भारतीय तंत्रज्ञान संस्था) या जातीयवादाचे कारखाने आहेत’, असे आरोप केले जात आहेत. ‘संपूर्ण जगातील वंशवाद आणि विषमता यांचे मूळ भारतात आहे’, असा उघडपणे खोटा सिद्धांत मांडला जात आहे. त्या आधारावर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे समूळ उच्चाटन) असे कार्यक्रम घेतले जात आहेत. भारत आणि भारतीय यांच्या प्रगतीला खीळ बसावी, यासाठी जंग जंग पछाडले जात आहेत. या प्रयत्नात साम्यवाद्यांची सगळ्या भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी झाली आहे आणि या युतीमागे आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस प्रभुतींच्या ‘डीप स्टेट’ची आर्थिक शक्ती उभी आहे. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते, जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) या महाशक्तीशाली असुरी युतीशी भारताची अंतिम लढाई होणार, हे निश्चित आहे. ही लढाई वैचारिक पातळीवर लढली जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला जागरूक रहाण्याची अन् सर्वार्थाने सुसज्ज होण्याची आवश्यक आहे. अंतिम विजय आपलाच आहे !
– लेखक : श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे. (१.८.२०२४)
इकोसिस्टीम म्हणजे काय ? आणि तिचे महत्त्व
इतकी महत्त्वाची असलेली ‘सॉफ्ट पॉवर’ साम्यवाद्यांना प्रदान करणारी त्यांची पोलादी यंत्रणा, म्हणजे त्यांची ‘इकोसिस्टीम’. इकोसिस्टीम म्हणजे नक्की काय ? तर देशात कुठल्या प्रश्नांची, विषयांची, घटनांची चर्चा होते, कुठली सूत्रे प्राधान्याने पुढे आणली जातात, त्याविषयी कुणाची मत ग्राह्य धरली जातात, हे ठरवणारी व्यवस्था. हिच्यावर समाजातील बोलक्या वर्गाची सत्ता असते. या वर्गात माध्यमे (मिडिया), विद्यापिठे, नाटक, चित्रपट, साहित्य यांसारखे कला आणि सांस्कृतिक क्षेत्र, इतिहास अशा अनेक क्षेत्रांमध्ये अधिकार गाजवणार्या ‘इंटलेक्चुअल’ (बुद्धीमान) म्हणवल्या जाणार्या लोकांचा समावेश असतो. यांचा आवाज मोठा असल्यामुळे प्रत्यक्ष शक्तीपेक्षा त्यांचा प्रभाव अधिक असतो आणि यातच जगात फारशी ‘हार्ड पॉवर’ नसतांनाही साम्यवाद्यांचा इतका प्रभाव कसा ? याचे उत्तरही दडलेले असते. उत्तरप्रदेशमधील अखलाकच्या ‘लिंचिंग’ची (समूहाने केलेली हत्या) अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होते; पण राजस्थानमधील कन्हैयालालचा गळा कापला गेला, याविषयी कुणी शब्दही काढत नाही असे का ? या प्रश्नाचे उत्तर या ‘इकोसिस्टीम’मध्ये दडलेले असते.
– श्री. अभिजित जोग