स्वातंत्र्याची घोषणा मध्यरात्री १२ वाजता का करण्यात आली ?

१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री १२ वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली; मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा हा दिनांक आणि वेळ अचानक ठरलेली नाही. हा दिनांक आणि वेळ यांमागेही इतिहास आहे.

१. कसा ठरला स्वातंत्र्याचा दिनांक ?

पंडित जवाहरलाल नेहरूंनी ठरवले असते, तर २६ जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन असता. भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी ठरवले असते, तर भारताचा स्वातंत्र्यदिन ३० जून असता. नेहरू यांनी १९२९ या वर्षी स्वातंत्र्याची मागणी केली आणि २६ जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याची घोषणा केली. वर्ष १९३० नंतरही हा दिवस ‘स्वतंत्रतादिन’ म्हणून साजरा करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. वर्ष १९४५ मध्ये दुसर्‍या जागतिक युद्धात ब्रिटनची आर्थिक स्थिती वाईट झाली, राजकीय संकटही होते. वर्ष १९४५ मध्ये झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली. लेबर पार्टीने ‘आमचे सरकार बनले, तर ब्रिटीश राजवटीतील देशांना मुक्त केले जाईल’, असे आश्वासन दिले होते आणि लेबर पार्टीचे सरकार येतात भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ चालू झाली. भारताला हक्क सुपुर्द करण्यासाठी फेब्रुवारी १९४७ मध्ये माऊंटबॅटन यांची नियुक्ती झाली. त्यांनी एक मसूदा सिद्ध केला. ‘३० जून १९४८ ला सर्व अधिकार भारताला सुपुर्द करणार’, असे या मसुद्यात नमूद होते; मात्र भारतीय नेत्यांचे यावर एकमत झाले नाही. त्यांनी जून १९४८ हा महिना ठरवला, ज्याला विरोध झाला आणि मग १९४७ हेच वर्ष ठरले.

२. स्वातंत्र्याची वेळ रात्री १२ का ?

जून १९४७ मध्ये ठरले की, भारताला ऑगस्टपर्यंत स्वतंत्र करायचे. माऊंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट हा दिनांक निश्चित केला; कारण याच दिवशी दुसरे महायुद्ध संपतांना जपानने आत्मसमर्पण केले होते. माऊंटबॅटन हा दिनांक त्यांच्यासाठी शुभ मानत होते; पण भारतीय ज्योतिषतज्ञ या दिनांकाला भारतासाठी अशुभ मानत होते. ज्योतिषतज्ञांनी दुसरा दिनांक दिला; मात्र माऊंटबॅटन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे मधला मार्ग म्हणून एक शुभ वेळ काढण्यात आली. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री ११.५१ ते १२.३९ ही वेळ शुभ होती. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार रात्री १२ नंतर १५ ऑगस्ट हा दिवस चालू होतो; मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार दिनांक बदलतो. त्यामुळे मध्यरात्री १२ ही वेळ निश्चित झाली.

(साभार : ‘न्यूज १८ मराठी’)