Microplastics : देशातील मीठ आणि साखर यांमध्ये सापडले ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण !
(‘मायक्रोप्लास्टिक’ म्हणजे प्लास्टिकचे लहान कण)
नवी देहली – ‘मायक्रोप्लास्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर’ या नावाने ‘टॉक्सिक्स लिंक’ नावाच्या पर्यावरण संशोधन संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात विविध प्रकारचे मीठ आणि साखर यांच्या केलेल्या परीक्षणात ‘मायक्रोप्लास्टिक’, म्हणजे प्लास्टिकचे लहान कण आढळून आले.
१. मायक्रोप्लास्टिक्स तंतू, गोळ्या आणि तुकडे यांच्या स्वरूपात आढळतात. या मायक्रोप्लास्टिकच्या कणांचा आकार ०.१ मि.मी. ते ५ मि.मी. इतका असल्याचे आढळून आले. आयोडिनयुक्त मीठामध्ये मायक्रोप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण आढळले. ते बहुरंगी पातळ तंतूच्या स्वरूपात होते.
२. मिठाच्या नमुन्यांमध्ये १ किलोग्राममध्ये ६.७१ ते ८९.१५ ग्रॅम इतके मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण आढळले. आयोडिनयुक्त मिठात सर्वाधिक, तर सेंद्रिय खडे मिठामध्ये सर्वांत अल्प प्रमाण आढळले.
३. साखरेच्या नमुन्यांमध्ये प्रति १ किलोग्रॅममध्ये ११.८५ ते ६८.२५ ग्रॅम इतके मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण आढळले.
४.मायक्रोप्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवा यांद्वारे मानवी शरिरात प्रवेश करू शकतात. अलीकडील संशोधनात फुफ्फुसे, हृदय, आईच्या दुधात आणि गर्भामध्येही मायक्रोप्लास्टिक आढळले आहे.
५. ‘टॉक्सिक्स लिंक’चे संस्थापक-संचालक रवि अग्रवाल म्हणाले की, आमच्या अभ्यासाचा उद्देश ‘मायक्रोप्लास्टिकवर सध्या उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक माहितीमध्ये योगदान देणे’, हा आहे. या अभ्यासानंतर धोरण सिद्ध करण्याच्या दिशेने काम चालू व्हावे आणि मायक्रोप्लास्टिकचा धोका न्यून करणार्या तंत्रज्ञानाकडे संशोधकांचे लक्ष जावे, असाही आमचा उद्देश आहे.
संपादकीय भूमिकाप्लास्टिकचे कण नाहीत ?, अशी एकतरी गोष्ट आता शेष राहिली आहे का ? विज्ञानाने प्लास्टिकचा शोध लावला असून त्याचा निसर्ग आणि मनुष्य यांच्यावर कसा विपरित परिणाम होत आहे ?, हे लक्षात येते ! यावरून असे विज्ञान अधोगतीकडे नेणारे आहे, हेच सिद्ध होते ! |