Balochistan Liberation Army Attack : बलुचिस्तानमध्ये पाकचे राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानावर आक्रमण : ३ जण ठार !

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतले दायित्व

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला क्वेट्टा शहरात झालेल्या बाँबस्फोटात ३ जण ठार, तर ६ जण घायाळ झाले. या स्फोटाचे दायित्व बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने घेतले आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील लियाकत बाजारात पाकचा राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानदारावर ग्रेनेड फेकण्यात आले होते.

१. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने सांगितले की, आम्ही परिसरातील दुकानदारांना झेंडे विकण्यास मनाई केली होती. दुकानदारांनी ऐकले नाही, तेव्हा त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.

२. पाकिस्तानमध्ये १४ ऑगस्टला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने लोकांना १४ ऑगस्ट या दिवशी सुटी साजरी करू नये, असे सांगितले होते.

३. अलीकडच्या काळात बलुचिस्तानमध्ये पाकच्या स्वातंत्र्यदिनी होणार्‍या आक्रमणांच्या घटना वाढल्या आहेत. राष्ट्रध्वज विकणार्‍या दुकानांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांना राष्ट्रध्वज विकण्याचा व्यवसाय सोडावा लागला आहे. वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये अशा घटना घडल्या, ज्यात पाकिस्तानचे झेंडे विकणार्‍या लोकांवर आक्रमणे झाली.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे काय ?

बलुचिस्तानमधील अनेक लोकांना भारताच्या फाळणीनंतर स्वतंत्र देश म्हणून जगायचे होते; मात्र त्यांच्या संमतीविनाच त्यांचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये सैन्य आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहे. बलुचिस्तानच्या साधनसंपत्तीवर त्यांचा हक्क आहे, असा त्यांचा विश्‍वास आहे. पाकिस्तान सरकारने वर्ष २००७ मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा आतंकवादी संघटनांच्या सूचीमध्ये समावेश केला.

संपादकीय भूमिका

करावे तसे भोगावे, असे म्हटले जाते, ते सध्या पाकच्या संदर्भात घडत आहे. भारतात आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकमध्ये अशा घटना घडणे ही त्याच्या कर्माची फळे आहेत !