धर्मरक्षणार्थ प्राणांची आहुती देणार्‍या कोट्यवधी हिंदूंसाठी १५ ऑगस्ट हा ‘श्राद्ध संकल्प दिवस’ ! – मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन

  • २ ऑक्टोबर या दिवशी असलेल्या सर्वपित्री अमावास्येला ‘सामूहिक तर्पणा’चे केले आवाहन !

  • गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत झालेल्या हिंदूंच्या नरसंहारानिमित्त ‘अयोध्या फाऊंडेशन’ संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शरण यांनी केले आयोजन !

अयोध्या फाऊंडेशन’ संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शरण

इंदूर (मध्यप्रदेश) – वर्ष १९४७ मध्ये अखंड भारताची झालेली भयावह फाळणी आणि त्यासाठी उत्तरदायी असलेल्या घटकांविषयी माहिती देणे, हे भारताची एक जबाबदार नागरिक असल्याच्या नात्याने मी माझे कर्तव्य समजते. या कालावधीत हिंदूंनी ज्या हालअपेष्टा सोसल्या, अक्षरश: तशीच स्थिती आज बांगलादेशातील हिंदू भोगत आहेत. हे आपण तेथील हिंदूंची लूट, बलात्कार, अमानुष मारहाण, हत्या आणि जाळपोळ यांच्या भयानक व्हिडिओजमधून पाहू शकतो, अनुभवू शकतो. भारताच्या फाळणीच्या आधीचा काळ, फाळणीचा काळ आणि आजचा काळ या सगळ्यात हिंदूंवर होणारे अत्याचार यांच्यात आश्‍चर्यकारक साम्य आहे. आपण इतिहास कदापि विसरता कामा नये. अन्यथा तो पुन:पुन्हा घडत असतो. या दृष्टीकोनातून गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून धर्मरक्षणार्थ प्राणार्पण केलेल्या कोट्यावधी हिंदूंसाठी तर्पण विधी करणे, हे आपल्या सगळ्यांचे धर्मकर्तव्य आहे, असे वक्तव्य ‘अयोध्या फाऊंडेशन’ या संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शरण यांनी केले. या दृष्टीने १५ ऑगस्ट हा दिवस ‘श्राद्ध संकल्प दिवस’ म्हणून पाळण्याचे त्यांनी जगभरातील हिंदूंना आवाहन केले आहे.

यंदा या मोहिमेचे हे आठवे वर्ष असून १५ ऑगस्ट २०२४ हा आठवा श्राद्धसंकल्प दिवस असणार आहे. गेल्या १ सहस्र ४०० वर्षांमध्ये ज्यांनी धर्मांतराला विरोध करून, प्रसंगी लढून मरण पत्करले, परंतु हिंदु धर्मश्रद्धेचा त्याग केला नाही, अशा कोट्यवधी हिंदूंसाठी आपण संकल्प करूया. तसेच २ ऑक्टोबर, म्हणजे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आपण सामूहिक तर्पण करूया. यासाठी हातात गंगाजल आणि अक्षता घेऊन तर्पण विधी करण्याचा आपण संकल्प करूया, असे आवाहनही मीनाक्षी शरण यांनी केले.

यासाठी सामाजिक माध्यमांतून जनजागृती करणारे विविध व्हिडिओ आणि पोस्ट प्रसारित करण्यात येत आहेत. हिंदूंनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीनेही केले आहे. ‘अयोध्या फाऊंडेशन’कडून या मोहिमेच्या प्रसारार्थ #श्राद्ध_संकल्प_दिवस, #सामूहिक_तर्पण, #ShraddhSankalpDiwas, #SamoohikTarpan या हॅशटॅगचा वापर केला जात आहे. या माध्यमातून हिंदूंनी हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावा, असे आवाहनही संघटनेकडून करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंवर गेली शेकडो वर्षे अनन्वित अत्याचार करण्यात आले. आजच्या जागतिक मानवसमूहाला यासंदर्भात माहिती देणे आणि या माध्यमातून आपल्या पूर्वजांमुळेच आपली हिंदु ओळख टिकून राहिली, यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे. या मोहिमेत हिंदूंनी कोट्यवधींच्या संख्येने सहभागी होऊन याला जनचळवळीचे रूप दिले पाहिजे !
  • सामूहिक तर्पण विधीचे आयोजन केल्याच्या निमित्ताने मीनाक्षी शरण यांचे आभार आणि अभिनंदन !