बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थे’च्या कार्यालयांवर ‘ईडी’च्या धाडी !
ठेवीदारांची १६८ कोटी रुपयांची फसवणूक !
पुणे – बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थे’तील शेकडो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक आणि ‘मनी लाँडरिंग’ प्रकरणांमध्ये ‘अंमलबजावणी संचालनालया’च्या (‘ईडी’च्या) पथकाने धाडी घातल्या. पतसंस्थेच्या राज्यातील बीड, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयांवर धाडी घातल्या. या धाडीमध्ये जंगम मालमत्ता, कागदपत्रे, संगणकांसह अनुमाने १ कोटी २० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
‘ईडी’ने पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि इतर संचालक यांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत. आजपर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार पतसंस्थेने गुंतवणूकदारांची १६८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची फसवणूक होत असतांना एकाही यंत्रणेला ते कसे लक्षात येत नाही ? – संपादक) अध्यक्ष कुटे आणि संचालक यांनी ठेवीदारांच्या ठेवींचा उपयोग स्वत:च्या लाभाकरता केला. पतसंस्थेतील ठेवींची रक्कम इतर उद्योग आणि ‘कुटे ग्रुप’ यांमध्ये गुंतवणूक केली. बोगस ‘शेल कंपन्यां’चे जाळे सिद्ध करून मनी लाँड्रिंगद्वारे पैसे हाँगकाँगला पाठवल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे.