कोलवा येथे कायद्याचे उल्लंघन करून बांधलेला बंगला पाडला
मडगाव, १३ ऑगस्ट (वार्ता.) – कोलवा समुद्र किनार्यानजीक गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन (सीआर्झेड) कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेला बंगला १३ ऑगस्टला प्रशासनाने पाडला. हे बांधकाम देहलीतील व्यावसायिक पवनकुमार अरोरा यांनी केले होते. या वेळी सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर उपस्थित होते. हे बांधकाम पाडण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर पाडण्यात आल्याची माहिती मामलेदार प्रतापराव गावकर यांनी माध्यमांना दिली. हा बंगला सीआर्झेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आला असल्याची याचिका कोलवा नागरी मंचचे ज्युडीथ आल्मेदा यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली होती. (एका नागरिकाला लक्षात येते, ते तेथील प्रशासनाला का लक्षात येत नाही ? – संपादक) त्यानंतर न्यायालयाने किनारपट्टी प्राधिकरणाला या प्रकरणी सुनावणी घेण्यास सांगितले होते. किनारपट्टी प्राधिकरणाच्या सुनावणीत बांधकाम भरती रेषेच्या २०० मीटर आत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर हे बांधकाम पाडण्याचा आदेश देण्यात आला होता.