शाहिरीतून अश्लीलता सादर केल्यास कडक निर्बंध घालणार !

  • अनादी सिद्ध शक्ती-तुरा समाज शाहीर संघ मंडळाच्या वर्धापनदिन सोहळ्यातील अभिनंदनीय निर्णय !

  • सोहळ्यात अनेक ज्येष्ठ शाहिरांचा सत्कार

  • राजापूर येथे स्वमालकीचे शाहिरी भवन बांधणार

राजापूर, १३ ऑगस्ट (वार्ता.) – शाहिरीमधून समाज प्रबोधन करून जे शाहीर कला सादरीकरण करतांना गाण्यातून अश्लीलता सादर करतील त्यांच्यावरती कडक निर्बंध घालण्याचा निर्णय अनादी सिद्ध शक्ती-तुरा समाज शाहीर संघ राजापूरच्या वतीने घेण्यात आला. (रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य मंडळांनीही हा आदर्श घ्यावा ! – संपादक)

अनादी सिद्ध शक्ती-तुरा समाज शाहीर संघ राजापूर (रजि.) या मंडळाचा वर्धापनदिन सोहळा ११ ऑगस्ट या दिवशी तालुक्यातील हातीवले येथील श्री दत्त मंदिरात या मंडळाचे संस्थापक गुरुवर्य विश्वनाथ उपाख्य भाई गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी पारंपरिक लोककलेचे आधुनिकीकरण होतांना त्यात अश्लीलता येवू लागल्याने त्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

सोहळ्याला सुमारे १७५ शाहीर, गुरुवर्य, कविवर्ग, वस्ताद, सभासद, चिठी मालक उपस्थित होते. प्रामुख्याने अध्यक्ष चंद्रकांत वालम, सेक्रेटरी संतोष हातणकर, उपाध्यक्ष विजय जोशी, सरपंच नाना गोटम आणि मोठ्या प्रमाणात शाहीर वर्ग उपस्थित होता.


सोहळ्यातील महत्त्वाचे क्षण !

१. या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर कणेरी मठ येथील नामवंत शाहीर बळवंत चव्हाण उपस्थित होते.

२. या सोहळ्यात अनेक ज्येष्ठ शाहिरांचा सत्कार करण्यात आला.

३. भविष्यात राजापूर येथे स्वमालकीचे शाहिरी भवन बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला.


एकमुखी ठराव !

राजापूर तालुक्यातील सद्य:परिस्थितीनुसार छोटी मुले शिक्षणानिमित्त मुंबईत असल्याने जाखडी नृत्य कला सादर करतांना मुलांची उणीव भासते. त्यामुळे या वर्धापनदिनी एकमुखाने ठराव करण्यात आला की, साधारण १२ ते १३ वयोगटातील मुलींनाही नृत्यपथकांत नृत्य करण्यासाठी सहभाग देण्यात यावा. जेणेकरून ही कला ग्रामीण भागांत जिवंत राहील.