सत्यप्रिय, शिस्तप्रिय आणि सेवेची तळमळ असलेले दुर्ग, छत्तीसगड येथील कै. शिवनारायण नाखले (वय ८४ वर्षे) !
‘शिवनारायण नाखले (वय ८४ वर्षे) यांचे २.८.२०२४ या दिवशी पहाटे ५.३० वाजता निधन झाले. १४.८.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्रीमती उषा शिवनारायण नाखले (कै. नाखले यांच्या पत्नी, वय ७४ वर्षे), दुर्ग, छत्तीसगड.
१ अ. प्रेमभाव : ‘माझे यजमान कुटुंबियांवर पुष्कळ प्रेम करत असत. त्यांना कुटुंबियांना नवीन गोष्टी शिकवणे आवडत असे.
१ आ. ते नेहमी सत्य बोलत असत. त्यासाठी त्यांना लोकांचा रोषही स्वीकारावा लागला.
१ इ. ते शेवटपर्यंत गुरुस्मरण करत होते.’
२. सौ. ज्योती झोड (मुलगी), नागपूर, महाराष्ट्र.
२ अ. ‘माझे बाबा एक कणखर व्यक्तीमत्त्व होते.
२ आ. मला आवश्यकता असतांना बाबांनी मला चांगले मार्गदर्शन केले.’
३. श्री. फणीन्द्र शिवनारायण नाखले (मोठा मुलगा), चंद्रपूर, महाराष्ट्र.
३ अ. सकारात्मक : ‘बाबा आम्हाला प्रोत्साहन देत असत. त्यांच्याकडे सर्व अडचणींवर उपाययोजना होत्या. ते प्रत्येक परिस्थितीला सामोरे जात होते.
३ आ. सेवेची तळमळ : एकदा मी त्यांना विचारले, ‘‘विद्युत् देयकाचे पैसे ‘ऑनलाईन’ देता येत असतांना तुम्ही देयकाचे पैसे देण्यासाठी प्रत्यक्ष का जाता ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘त्या निमित्ताने घराबाहेर गेल्यावर नवीन लोकांशी संपर्क येतो आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करता येतात.’’
३ इ. गुरूंप्रती भाव : बाबांच्या निधनाच्या आदल्या दिवशी साधक बाबांना भेटायला आले होते. त्यांनी बाबांसाठी प्रसाद आणला होता. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र बाबांना दिसेल, अशा पद्धतीने एका आसंदीत ठेवले. त्या कालावधीत बाबांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डोळे उघडायला त्रास होत होता; तरीही ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे एकटक पहात होते. याचे मला आश्चर्य वाटले.’
४. श्री. आशिष शिवनारायण नाखले (धाकटा मुलगा), कोरबा, छत्तीसगड.
४ अ. मुलांवर चांगले संस्कार करणे : ‘बाबांनी आम्हाला पुष्कळ चांगली शिकवण दिली. त्यांनी आम्हाला कठीण परिस्थितीत नेहमी आधार दिला आणि आमचे मनोबल वाढवले. त्यांची एक शिकवण माझ्या नेहमीच लक्षात राहील, ‘कोणत्याही स्थितीत कधीही निराश होऊ नका. कोणत्याही गोष्टीला नकार देण्यापूर्वी ती करण्याचा प्रयत्न करा.’
४ आ. बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चेहेर्यावर तेज दिसत होते.’
५. सौ. रजनी आशिष नाखले (धाकटी सून), कोरबा, छत्तीसगड.
अ. ‘बाबांचे (सासर्यांचे) माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते.
आ. त्यांच्यात पुष्कळ सहनशक्ती होती.’
६. श्री. विजय आ. झोड (जावई), नागपूर
अ. ‘माझे सासरे शिस्तप्रिय होते.
आ. ते रेल्वेत नोकरी करत असतांना त्यांना समाजसेवा करण्यासाठी वेळ नव्हता; मात्र ते सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी सनातनच्या सेवाकार्यात वाहून घेतले.’
७. श्री. सौम्य फणीन्द्र नाखले (वय २२ वर्षे) आणि कु. अंश फणीन्द्र नाखले (वय १२ वर्षे) (नातू , मोठ्या मुलाचे मुलगे), चंद्रपूर, महाराष्ट्र.
अ. ‘आजोबा तत्त्वनिष्ठ होते.
आ. त्यांचा इतरांवर प्रभाव पडत असे.’
८. कु. ऋत्विक आशिष नाखले (धाकटा नातू (लहान मुलाचा मुलगा, वय ११ वर्षे), कोरबा, छत्तीसगड.
अ. ‘माझे आजोबा माझे गुरु होते. त्यांनी मला हनुमानचालीसा आणि अनेक श्लोक शिकवले.’
कै. शिवनारायण नाखले यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. प्रतीक रिझवानी, रायपूर, छत्तीसगड.
१ अ. सेवेची तळमळ : ‘नाखलेकाका उतारवयातही सेवेनिमित्त ५ – ६ कि.मी. अंतर पायी चालत असत. एप्रिल २०२४ मध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही सेवा करत होतो. त्या वेळी कडक उन्हाळा असूनही काका आम्हाला साहाय्य करत होते.
१ आ. काका रुग्णाईत असतांना मी त्यांना भेटलो. त्या वेळी मला त्यांचा चेहरा चैतन्यमय जाणवत होता.’
२. सौ. प्रगती खंगण, भिलाई, छत्तीसगड.
२ अ. गुरुंप्रती भाव : ‘काकांना स्वतःच्या देहाची काळजी वाटत नव्हती. अनुमाने १० वर्षांपूर्वी काकांच्या हृदयाचे शस्त्रकर्म झाले होते. त्यांना पुष्कळ शारीरिक मर्यादा होत्या. एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘माझे शरीर म्हणजे गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला दिलेले पारितोषिक आहे. मला सांभाळणारे तेच आहेत. मला गुरुसेवा करायची आहे.’’
३. श्री. श्रीकांत पाध्ये (वय ७३ वर्षे) आणि सौ. अंजली पाध्ये (वय ६६ वर्षे), नागपूर, महाराष्ट्र.
३ अ. प्रेमभाव : ‘वर्ष २००१ पासून दुर्ग, छत्तीसगड येथे सनातन संस्थेच्या कार्याला प्रारंभ झाला. तेव्हा आम्ही दोघे तिकडे अध्यात्म प्रचारासाठी जात होतो. त्या वेळी आमची नाखलेकाकांशी ओळख झाली. आम्हाला काकांमधील प्रेमभाव प्रथम भेटीतच अनुभवायला मिळाला. ते आम्हाला भेटायला कधी कधी आवर्जून नागपूरला येत असत. त्यांच्याकडून आम्हाला निर्व्याज प्रेम मिळाले.’
४. श्री. शशिकांत रामचंद्र पाध्ये (वय ७७ वर्षे), वर्धा, महाराष्ट्र.
अ. काकांनी ज्या व्यक्तींना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार केले होते, त्या व्यक्तींशी माझे सेवेनिमित्त बोलणे होत असे. तेव्हा त्या व्यक्तींनी काकांविषयी सांगितलेले ऐकून माझी भावजागृती होत असे.
आ. मी काकांना भेटल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी बोलतांना काकांची भावजागृती होत असे.
इ. ते रायपूर येथे रुग्णालयात असतांना मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा मी त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दिला. तेव्हा काकांची भावजागृती होऊन त्यांनी हात जोडून नमस्कार केला. ‘गुरुदेव आपली किती काळजी घेतात !’, असे म्हणून तो ग्रंथ त्यांनी उशीजवळ ठेवला.’
५. श्री. हेमंत कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ५७ वर्षे), दुर्ग
५ अ. सेवेची तळमळ
१. ‘काका प्रत्येक मासात आगागाडीने २४० कि.मी. प्रवास करून कोरबा येथे त्यांच्या लहान मुलाकडे ‘सनातन प्रभात’चे अंक वितरण करण्यासाठी जात असत. तिथे ते मुलाच्या दुचाकीवरून अंक वितरण करत असत.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७५ व्या जन्मोत्सवानिमित्त काकांनी एका मासातच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ७५ वर्गणीदार करून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी भावपुष्प अर्पण केले. त्या वेळी काका ७८ वर्षांचे होते.
३. काका वयाच्या ८० व्या वर्षी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या १२५ हून अधिक वर्गणीदारांना अंक वितरण करत असत.
५ आ. शांत : ‘काका मागील दीड ते दोन मासांपासून अत्यल्प प्रमाणात अन्नग्रहण करत होते. ते एवढे रुग्णाईत असतांनाही कण्हत असलेले दिसले नाही. ते स्थिर आणि शांत होते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ८.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |