महर्षि अरविंद घोष यांचे आध्यात्मिक चरित्र चिंतन
उद्या १५ ऑगस्ट या दिवशी महर्षि अरविंद घोष यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
‘विदेशात शिक्षण घेत असतांनाच योगी अरविंद यांनी ‘इंग्रज सरकारची नोकरी करणार नाही’, असे ठरवले होते. त्याप्रमाणे पित्याच्या इच्छेसाठी ते सनदी परीक्षा उत्तीर्ण झाले. ‘अश्वारोहणाची परीक्षा नाकारून त्यांनी स्वतःला पदवी मिळणार नाही’, अशी व्यवस्था करून घेतली. तरीही ‘आय.सी.एस्.’ची (भारतीय नागरी सेवेची) सनदी परीक्षा आणि ‘ट्रायपॉस’ची पदवी त्यांनी इतक्या यशस्वीपणे प्राप्त केली होती की, त्यांची योग्यता विदेशात असतांनाच सिद्ध झाली. तिथेच त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याला संस्थानची नोकरी देऊ केली होती. ती अवघ्या २०० रुपये वेतनावर ! एवढे न्यून मोल देऊन एक बहुमोल रत्न पदरात पाडून घेण्याच्या आनंदात त्यांनी योगी अरविंद यांना बडोद्याला बोलावले. भारतात परतलेले योगी अरविंद पित्याच्या मृत्यूची बातमी ऐकून मुंबईहून कोलकाता येथील स्वतःच्या घरी न जाता परस्पर बडोद्याला गेले.
१. योगी अरविंद यांचे जीवन चहूअंगाने विकसित होणे
गुर्जरांची ही भूमी योगी अरविंद यांच्यासाठी कार्यभूमी ठरली. पैसा हा घटक त्यांच्या जीवनात कधीही महत्त्वाचा नव्हताच. बडोदा हे त्यांच्या जीवनात असे स्थान ठरले की, ज्या स्थानी त्यांना त्यांचे जीवन चहूअंगाने विकसित करता आले. बडोद्याच्या महाराजांसमवेतच त्यांच्या अनेक विभागांमधून कार्य करता करता योगी अरविंद यांना त्यांच्या आवडीचे अध्यापनाचे कार्य करता आले. वाचन, लेखन, क्रांतीकार्य, राजकारण, अध्यात्मसाधना, योगाभ्यास या त्यांच्या सगळ्या गोष्टींना चालना मिळाली, तसेच संस्कृत, बंगाली, मराठी आणि गुजराती या भारतीय भाषांचा अभ्यासही ते करू लागले. त्यांचे वाङ्मयाचे अध्ययनही याच काळात झाले.
२. योगी अरविंद यांच्या जीवनाला आध्यात्मिक कलाटणी देणार्या घटना
२ अ. एका नागा साधूंच्या यौगिक मंत्रसामर्थ्याच्या प्रत्ययाने योगी अरविंद योगशास्त्राकडे आकर्षित होणे : काही घटनांनी योगी अरविंद यांच्या जीवनाला आध्यात्मिक कलाटणी मिळाली. किंबहुना असे म्हणता येईल की, त्यांच्यातील आध्यात्मिक वृत्ती उफाळून यायला इथेच निमित्त मिळाले. योग आणि अध्यात्म हे योगी अरविंद यांच्या जीवनाचे २ महत्त्वाचे आधारस्तंभ याच स्थानी बळकटपणे रोवले गेले. त्या वेळी योगी अरविंद यांच्यासमवेत त्यांचे बंधू श्री. बारींद्र घोष (हे काही कालावधीनंतर महान क्रांतीकारक म्हणून ओळखले जाऊ लागले) हे त्यांच्याजवळ रहात होते. ते आजारी पडले. काही केल्या त्यांच्यावर औषधोपचारांचा उपयोग होत नव्हता. अशा वेळी एका नागा संन्याशाने केवळ एक फुलपात्रभर पाणी देऊन त्यांना तात्काळ बरे केले. यौगिक मंत्रसामर्थ्याच्या या प्रत्ययाने योगी अरविंद योगशास्त्राकडे आकर्षित झाले. यापूर्वीच चांदोडच्या श्री ब्रह्मानंद महाराज या महान हठयोगींचे शिष्य श्री. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायामाच्या पद्धतीने योगशास्त्राचा अभ्यास योगी अरविंद करत होते. या प्रसंगामुळे त्यांना त्या अभ्यासात अधिकच रुची वाटू लागली. त्यांनी योगशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यास आरंभ केला.
२ आ. योगी अरविंद यांची योगशास्त्र अभ्यासक श्री. विष्णु भास्कर लेले यांच्याशी भेट होऊन योगसाधना आरंभ होणे : बडोदा येथे असतांनाच त्यांना श्री. विष्णु भास्कर लेले यांनी योगशास्त्राचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. श्री. लेले हेसुद्धा क्रांतीकार्याची ओढ असलेले होते. त्यांना वाटायचे, ‘क्रांती करायची असेल, तर त्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे.’ योगी अरविंद यांच्याशी त्यांची भेट, म्हणजे समागम संयोगच होता. हा संयोगही एका मनोरंजक पद्धतीने झाला. त्यांचे बंधू श्री. बारींद्र यांनी लेले महाराजांना बडोद्याला बोलावले होते. ते आले, तेव्हा योगी अरविंद हे खासेराव जाधव यांच्या वाड्यात रहात होते. तिथेच दोघांची भेट झाली. मुजुमदारांच्या वाड्यातील तिसर्या मजल्यावरच्या एका खोलीत योगी अरविंद यांची प्रत्यक्ष योगसाधना चालू झाली. आजही बडोद्याला योगी अरविंद यांच्या आश्रमाला भेट देणारे लोक मुजुमदारांच्या घरच्या साधना स्थळाला भेट दिल्याविना रहात नाहीत.
योगी अरविंद यांच्या या साधनेमुळे त्यांचे मन इतके व्यापक झाले की, त्यांच्या वैयक्तिक मर्यादा नाहीशा होऊन ते विश्वमनाशी एकरूप झाले.
२ इ. योगी अरविंद यांची हठयोगी श्री ब्रह्मानंद, केशवानंद स्वामी, महान योगी साखरे महाराज यांच्याशी भेट होणे : हठयोगी श्री ब्रह्मानंद यांच्याशीही याच काळात योगी अरविंद यांची कर्नाळी क्षेत्रात गाठ पडली होती. श्री ब्रह्मानंद यांनी योगी अरविंद यांच्याकडे डोळे भरून बघितले आणि योगी अरविंद यांना हवे ते मिळाले. जणू काही महाराजांच्या नेत्रांमधील तेज योगी अरविंद यांच्या नेत्रांमध्ये संक्रमित झाले असावे. सत्पुरुषांचे दर्शन घेण्यासाठी योगी अरविंद नेहमीच तत्पर असत. नर्मदा तीरावर गंगनाथ मठात त्यांनी केशवानंद स्वामी यांचेही दर्शन घेतले होते. सुरतला काँग्रेसच्या एका कार्यक्रमासाठी गेले असतांना एक महान योगी आणि भक्त असलेल्या साखरे महाराजांचीही त्यांनी भेट घेतली होती. ‘आपले गुरु आपल्या अंतर्यामीच असतात, त्यांच्या आदेशाप्रमाणे वागावे’, ही शिकवण योगी अरविंद यांना त्यांचे गुरु याेगीराज लेले यांच्याकडूनच मिळाली होती.
२ ई. योगी अरविंद यांना योगिराज लेले महाराज यांनी अंतर्यामी असलेल्या गुरूंची ओळख करून देणे : ‘गुरूंच्या वरील उपदेशाचा प्रत्यय योगी अरविंद यांना आधी आला आणि मग तो उपदेश केला गेला’, असे म्हणता येईल, अशी ती घटना घडली होती. १९ जानेवारी १९०८ या दिवशी योगी अरविंद यांचे मुंबईला ‘नॅशनल युनियन’ या संस्थेच्या वतीने भाषण आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे योगगुरु लेले महाराज होते. ऐन व्याख्यानाच्या वेळी अचानक योगी अरविंद यांना काहीही आठवेनासे झाले, त्यांचे मन रिक्त झाले. आता काय बोलायचे ? व्याख्यान कसे द्यायचे ? हा विचित्र संभ्रम त्यांच्यापुढे निर्माण झाला. ते निर्विचार झाले. काय करावे त्यांना सुचेना. तेव्हा त्यांनी हा पेच आपल्या गुरूंपुढे व्यक्त केला. लेले महाराज म्हणाले, ‘‘श्रोत्यांना नमस्कार करा आणि जे स्फुरेल ते बोला.’’
योगी अरविंद यांनी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे केले आणि त्यांच्या मुखावाटे शब्दांमागून शब्द, वाक्यांमागून वाक्ये सुसंगतपणे बाहेर पडू लागली. एक उत्कृष्ट व्याख्यान ऐकल्याच्या समाधानात श्रोते चिंब झाले. त्या कार्यक्रमाहून योगी अरविंद हे कोलकाता येथे गेले आणि लेले महाराजांनी योगी अरविंद यांना निरोप देतांना अंतर्यामी असलेल्या गुरूंची ओळख करून दिली, हीच त्यांच्यासाठी कायमस्वरूपी शिदोरी ठरली. बडोद्याचे वास्तव्य योगी अरविंद यांच्यासाठी आध्यात्मिक पाया भरणीचे सिद्ध झाले.
३. योगी अरविंद यांचे वैवाहिक जीवन
बडोद्याचे वास्तव्य योगी अरविंद यांच्यासाठी केवळ अध्यात्मच नाही, तर अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरले. वर्ष १९०१ मध्ये भूपालचंद्र बसूंची सुस्वरूप कन्या मृणालिनीदेवी यांच्याशी योगी अरविंद यांचा विवाह झाला. त्या वेळी त्यांचे वय २९ वर्षे आणि पत्नीचे जेमतेम १३ वर्षांचे होते. विवाहानंतर योगी अरविंद हे त्यांची पत्नी आणि बहीण यांच्यासह काही दिवस नैनीताल (उत्तराखंड) येथे होते. १९०२ जुलैच्या सुमारास ते पुन्हा बडोद्याला परतले. त्यांच्या वैवाहिक जीवन काळात योगी अरविंद यांना योग आणि राजकारण याच २ गोष्टींचे आकर्षण होते. मृणालिनीदेवींना मात्र वैवाहिक संसारी जीवनाची आवड होती. लौकिक जीवनात पती-पत्नी फार काळ एकत्र नव्हते, तरी त्यांचे आंतरिक नाते अतूट होते. त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून ते व्यक्त झाले आहे. योगी अरविंद यांनी पत्नीला लिहिलेली ३ पत्रे आजही उपलब्ध आहेत. वर्ष १९१८ मध्ये भारतभर पसरलेल्या भयंकर प्लेगच्या साथीने या अलौकिक योग्याची पत्नी होण्याचे भाग्य घेऊन आलेल्या मृणालिनीदेवींची जीवनयात्रा समाप्त केली आणि योगी अरविंद यांच्या आयुष्यातील हे लौकिक पर्व वा एक अध्याय समाप्त झाला.
४. योगी अरविंद यांनी केलेले क्रांतीकार्य
बडोद्यामध्येच योगी अरविंद यांच्या क्रांतीकार्याचीही मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्थानावर ठपका येऊ नये; म्हणून सयाजीराव गायकवाड महाराजांच्या नोकरीत असतांना त्यांनी पडद्यामागे राहूनच राजकारणाची सूत्रे हलवली. स्वातंत्र्यासाठी क्रांतीकार्य करण्याचा त्यांचा वज्रकठोर निश्चय याच काळात व्यक्त झाला होता. स्वातंत्र्यासाठी कार्य करणे, तेही क्रांतीकार्य करणे, हे अपरिहार्य असल्याचे त्यांनी अनेकदा त्यांचे वक्तव्य आणि प्रत्यक्ष कृती यांतूनही दाखवून दिले होते.
त्या वेळी बंगाली युवकांना सैन्यात घ्यायचे नाही, हे सरकारी धोरण होते. त्यातून पळवाट काढून त्या धोरणाला शह देऊन नाव-गाव पालटलेल्या जतिन बॅनर्जी या युवकाला शिक्षणासाठी योगी अरविंद यांनी बडोद्याला सैन्यात प्रवेश मिळवून दिला होता. स्नेही माधवराव जाधव यांना त्यांनीच खर्चाचे प्रावधान (तरतूद) करून स्फोटके सिद्ध करण्याच्या प्रशिक्षणासाठी विदेशात पाठवले होते, ते येथूनच. देशप्रेमाच्या प्रेरणेने त्यांनी ठिकठिकाणी व्याख्यानांचे दौरेही काढले होते.’
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर – डिसेंबर २०२१)
योगी अरविंद यांचे आध्यात्मिक सामर्थ्यवास्तविक केवळ प्राणायामाच्या अभ्यासानेच योगी अरविंद यांना कितीतरी सामर्थ्य प्राप्त झाले होते ! दिवसातून सकाळ-संध्याकाळ असे मिळून ते ५ घंटे प्राणायाम करू लागले. त्यामुळे त्यांचा मेंदू प्रकाशमय होऊन स्फूर्ती वाढली. केवळ १ घंटा किंवा कधी कधी त्याहीपेक्षा न्यून वेळात ते २०० हून अधिक काव्यपंक्ती लिहू लागले. त्यापूर्वी १० ते १२ ओळी लिहिण्यात त्यांचा अर्ध्याहून अधिक दिवस व्यय होत असे. त्यांचे शारीरिक सामर्थ्य इतके अद्भुत झाले की, ते साधनेला बसले असतांना आसपास डासांचे मोहोळ घोंगावत असले, तरी त्यांच्या अंगावर एकही डास बसत नसे किंवा त्यांना चावत नसे. (साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’) |
संपादकीय भूमिकाक्रांती करायची असेल, तर त्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे ! |