१७ ऑगस्टपर्यंत असणारी बेळगाव-मिरज रेल्वे नियमित चालू ठेवण्याची मागणी !

बेळगाव – बेळगाव जिल्ह्यात आलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्ते बंद होते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी ३० जुलैपासून रेल्वेने दिवसातून २ वेळा बेळगाव-मिरज पॅसेंजर रेल्वेसेवा चालू केली होती. ही सेवा ६ ऑगस्ट, १० ऑगस्ट आणि १७ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली हाेती. १७ ऑगस्टला ही सेवा बंद होणार असून तसे झाल्यास अनेक प्रवाशांना अडचणी निर्माण होणार आहेत. तरी बेळगाव-मिरज ही दिवसातून दोन वेळा चालू असणारी विशेष पॅसेंजर रेल्वेसेवा नियमित चालू ठेवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

ही गाडी सध्या सकाळी ६ वाजता बेळगाव येथून निघते आणि सकाळी ९ वाजता मिरज येथे पोचते, तर मिरज येथून सकाळी ९.५० वाजता निघून दुपारी १२.५० वाजता बेळगाव येथे पोचते. परत दुपारी १.३० ला निघून दुपारी ४.३० वाजता मिरज येथे पोचते आणि सायंकाळी ५.३५ ला निघून रात्री ८.४५ ला बेळगाव येथे पोचते. या विशेष रेल्वेसेवेमुळे मिरज आणि बेळगाव या दरम्यानच्या अनेक प्रवाशांना त्याचा लाभ होत आहे.