Paris (FRANCE) Protest : सहस्रावधी हिंदूंचे बांगलादेशातील हिंदूंच्‍या नरसंहारावरून आंदोलन !

पॅरिस (फ्रान्‍स) – येथील ऐतिहासिक ‘प्‍लेस दे ला रिपब्‍लिक’ (रिपब्‍लिक स्‍क्‍वेअर) येथे स्‍थानिक वेळेनुसार १२ ऑगस्‍टच्‍या दुपारी ३ वाजता सहस्रावधी हिंदू एकवटले. त्‍यांनी बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या नरसंहाराविषयी वाचा फोडत जोरदार आंदोलन केले. या वेळी ‘वर्ल्‍ड हिंदू फेडरेशन’ आणि ‘जस्‍टिस मेकर्स बांगलादेश’ या संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते. ही माहिती ‘वर्ल्‍ड हिंदू फेडरेशन’च्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी सनातन प्रभातला कळवली.

१. या वेळी बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंवर होत असलेले मोगली अत्‍याचार, त्‍यांच्‍या मंदिरांवर होत असलेली आक्रमणे आदींच्‍या विरोधात जोरदार घोषणा देण्‍यात आल्‍या. तसेच आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटना आणि जागतिक नेते यांना आवाहन केले की, बांगलादेशी हिंदूंवरील अत्‍याचार थांबले पाहिजेत अन् तेथील हिंदूंचे रक्षण केले पाहिजे.

२. या वेळी बांगलादेशी सरकारकडे निवेदन सुपुर्द करण्‍यात आले. यामध्‍ये ‘अल्‍पसंख्‍य हिंदूंवरील अत्‍याचारांची प्रकरणे जलदगतीने सोडवली गेली पाहिजेत, आक्रमणकार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तसेच पीडित हिंदूंना अर्थसाहाय्‍य दिले जावे आणि त्‍यांचे पुनर्वसन व्‍हावे. अल्‍पसंख्‍यांकांच्‍या रक्षणासंदर्भात कायदा करून अल्‍पसंख्‍यांक प्रकरणांसंबंधी मंत्रालय स्‍थापन करण्‍यात यावे. बांगलादेशाला कोणताही सरकारी धर्म नसावा’, या मागण्‍यांचे निवेदनात उल्लेख करण्‍यात आला होता.