Mirza Fakhrul Islam Alamgir : (म्‍हणे) ‘सीमेवर सीमा सुरक्षा दल बांगलादेशी लोकांची हत्‍या करतो !’ – मिर्झा इस्‍लाम आलमगीर, ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’

  • ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’चे वरिष्‍ठ नेते मिर्झा इस्‍लाम आलमगीर यांचे धादांत खोटे वक्‍तव्‍य

  • एका प्रसारमाध्‍यमाला दिलेल्‍या मुलाखतीत ‘लोकशाहीला सशक्‍त करू’, असे वक्‍तव्‍य; परंतु हिंदूंवरील अत्‍याचारांवर चकार शब्‍दही नाही !

मिर्झा इस्‍लाम आलमगीर

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश आणि भारत या देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. तथापि उभय देशांमध्‍ये काही समस्‍याही सूचीबद्ध असून त्‍यांचे निराकरण होणे आवश्‍यक आहे. पाणीवाटपाचा प्रश्‍न, सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडून बांगलादेशी लोकांची होणारी हत्‍या, तसेच व्‍यापार असमतोल दूर करणे आवश्‍यक आहे. बांगलादेशातील विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’चे वरिष्‍ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस मिर्झा इस्‍लाम आलमगीर यांनी हे वक्‍तव्‍य केले. ते एका प्रसारमाध्‍यमाने घेतलेल्‍या मुलाखतीत बोलत होते. या वेळी त्‍यांनी बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांवर मात्र चकार शब्‍दही उच्‍चारला नाही.

मिर्झा इस्‍लाम आलमगीर पुढे म्‍हणाले की,

१. आमच्‍या पक्षाच्‍या अध्‍यक्षा आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया आजारी आहेत. डॉक्‍टरांनी अनुमती दिल्‍यास त्‍या उपचारांसाठी परदेशात जातील. जर त्‍या परतल्‍या नाहीत, तर पुढच्‍या निवडणुकीत कार्यवाहक अध्‍यक्ष तारिक रहमान त्‍यांची जागा घेतील.

२. देशात विद्यार्थी आणि नागरिक यांनी उठाव केला. या काळात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्‍या पोलिसांनी अनुमाने १ सहस्र विद्यार्थ्‍यांना ठार मारले आणि अनुमाने १२ सहस्र लोकांना अटक केली.

३. नोबेल पारितोषिक विजेते प्रा. युनूस हे अंतरिम सरकारचे नेतृत्‍व करत आहेत. अंतरिम सरकार निश्‍चितपणे परिस्‍थिती स्‍थिर करेल आणि शांतता अन् सुव्‍यवस्‍था प्रस्‍थापित करेल. अंतरिम सरकारचे मुख्‍य कार्य मुक्‍त आणि निष्‍पक्ष निवडणुका घेणे हे आहे.

४. भ्रष्‍टाचार नष्‍ट करण्‍यासाठी आमचा पक्ष प्रयत्न करेल. आम्‍ही लोकशाही आणि लोकशाही मूल्‍ये यांची जोपासना करू.

संपादकीय भूमिका 

  • भारतीय सीमा सुरक्षा दलाच्‍या सैनिकांनी बांगलादेशी लोकांची हत्‍या केली असती, तर भारतात ५ कोटी मुसलमान बांगलादेशी घुसखोर राहू शकले असते का ? अशा भारतद्वेष्‍ट्यांचा भरणा असलेला पक्ष जर बांगलादेशात सत्तेवर आला, तर भारताला ती मोठी डोकेदुखीच होणार, हेच अशा वक्‍तव्‍यांवरून लक्षात येते !
  • हिंदु समुदायाच्‍या नायनाटासाठी बांगलादेशातील कट्टरतावादी मुसलमानांनी कंबर कसली आहे. अशा वेळी तेथील हिंदूंच्‍या रक्षणार्थ भारताने बांगलादेशावर मोठ्या प्रमाणात दबाव आणला पाहिजे !