Jaipur Army Commando Assault : राजस्‍थान : पोलिसांनी सैन्‍याच्‍या कमांडोचे कपडे काढून केला लाठीमार !

  • कमांडो शिव्‍या देत असल्‍याचे वरून स्‍पष्‍टीकरण !

  • केंद्रीय सैनिककल्‍याण मंत्री राज्‍यवर्धन सिंह राठोड यांनी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना खडसावले !

केंद्रीय सैनिककल्‍याण मंत्री राज्‍यवर्धन सिंह राठोड

जयपूर (राजस्‍थान) – सैन्‍यात कमांडो या पदावर सेवारत असलेले अरविंद यांना येथील एका पोलीस ठाण्‍यात ५ पोलिसांकडूनच अमानुष मारहाण करण्‍यात आली. या वेळी त्‍यांचे कपडे काढून त्‍यांना कारागृहात टाकण्‍यात आले. पोलिसांनी त्‍यांच्‍यावर लाठीमार केला आणि शिवीगाळही केली. त्‍यांना गुन्‍हेगारांमध्‍ये बसवून सांगितले की, पोलीस हा भारतीय सैन्‍याचा बाप आहे ! ही घटना शहरातील शिप्रा पथ पोलीस ठाण्‍यातील असून कमांडोने याविषयीची तक्रार सैनिककल्‍याण मंत्री राज्‍यवर्धन सिंह राठोड यांच्‍याकडे केली. यानंतर राठोड यांनी सरळ पोलीस ठाणेच गाठले आणि पोलीस उपायुक्‍त संजय शर्मा यांना फटकारले.

१. राठोड यांनी स्‍वतः ही घटना प्रसारमाध्‍यमांना सांगितली. जम्‍मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला येथे सध्‍या कमांडो अरविंद तैनात आहेत. ११ ऑगस्‍टला कमांडो अरविंद त्‍यांच्‍या ओळखीच्‍या एका सैनिकाच्‍या संदर्भातील एका प्रकरणाची माहिती घेण्‍यासाठी पोलीस ठाण्‍यात पोचले. त्‍या वेळी ही घटना घडली.

२. राठोड यांनी पोलिसांना फैलावर घेतले. त्‍यांनी सैनिकाच्‍या झालेल्‍या मारहाणीचे पुरावे स्‍वत:च्‍या भ्रमणभाषमध्‍ये दाखवले. यावर पोलीस उपायुक्‍त संजय शर्मा यांनी युक्‍तीवाद केला की, कमांडोने पोलिसांना शिवीगाळ केली. यावर संतापलेले मंत्री राठोड यांनी नाराजी व्‍यक्‍त करत म्‍हटले की, मी बोलत असतांना तुम्‍ही का बोलत आहात ? जेव्‍हा तुमच्‍याशी बोलले जाते, तेव्‍हा प्रतिसाद द्या, अन्‍यथा सावध रहा. तुम्‍हाला येथे उभे रहायचे नसेल, तर तुमच्‍या कार्यालयात जा.

ज्‍याच्‍याकडे शक्‍ती आहे, त्‍याला पुष्‍कळ संयमाची आवश्‍यकता असते ! – मंत्री राठोड

मंत्री पुढे म्‍हणाले की, तुम्‍ही मूलभूत शिष्‍टाचार शिकला नाहीत. अंगात पोलिसांचा गणवेश असेल, तर वेगळाच रुबाब असतो का ? तुमच्‍या मनात काही सार्वजनिक सेवा आहे कि गुंडगिरी आहे ? त्‍यांनी (सैनिकाने) शिवीगाळ केली किंवा नाही, पण तुम्‍ही सैन्‍यातील कमांडोना निर्वस्‍त्र करून लाठ्या-काठ्या मारले कि नाही ? ते सांगा ! ज्‍याच्‍याकडे शक्‍ती आहे, त्‍याने पुष्‍कळ संयमाने वागण्‍याची आवश्‍यकता आहे. जेव्‍हा आम्‍ही सेवेत होतो, लोकांनी आम्‍हाला शिव्‍या दिल्‍या नाहीत का ? आम्‍ही त्‍याकडे कधी लक्ष दिले नाही. काही फरक पडत नाही. ज्‍यांना बोलायचे असेल, त्‍यांना बोलू द्या. आम्‍ही आमची कामे करायचो. राठोडे हे सैन्‍यात मेजर पदावर कार्यरत असतांना त्‍यांनी निवृत्ती घेतली होती.

गणवेश घालून देशाचे रक्षण करणार्‍यांना धमकावणे हा भ्‍याडपणा आहे ! – मंत्री राठोड

या वेळी राठोड प्रसारमाध्‍यमांना म्‍हणाले की, हे अत्‍यंत दुःखद आहे. यातून घृणास्‍पद मानसिकता दिसून येते. असे लोक समाजासाठी धोकादायक आहेत. गणवेश घालून देशाचे रक्षण करणार्‍यांना धमकावणे हा भ्‍याडपणा आहे ! मी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्‍त यांच्‍याशी बोललो आहे. संबंधितांवर पुढील कारवाई करण्‍यात येईल.

संपादकीय भूमिका

जे पोलीस एका सैनिकाशी असे वर्तन करतात, ते सर्वसाधारण जनतेला कशा प्रकारे वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कठोर कारवाईच व्‍हायला हवी !