Kolkata Paternity Leave Case : पुरुषांनाही मिळावी २ वर्षांची बाल संगोपन रजा ! – कोलकाता उच्च न्यायालय
कोलकाता – महिला कर्मचार्यांप्रमाणे पुरुषांनाही मुलांच्या संगोपनासाठी २ वर्षांची बाल संगोपन रजा मिळावी, असे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने समानता आणि लिंगभेद लक्षात घेऊन ३ महिन्यांत यावर निर्णय घ्यावा, असे न्यायमूर्ती सिन्हा यांनी सांगितले. ‘मुलांची काळजी घेण्याचे दायित्व केवळ महिलांचेच मानता कामा नये. मुलांच्या संगोपनासाठी दोघेही पालक तितकेच उत्तरदायी आहेत’, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. बंगालमध्ये सध्या पुरुष कर्मचार्यांसाठी ३० दिवसांची, तर महिला कर्मचार्यांसाठी ७३० दिवसांची बाल संगोपन रजा देण्याची तरतूद आहे.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक अबू रेहान यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हे निर्देश दिले आहेत. अबू रेहान यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यांना त्यांच्या लहान मुलींना सांभाळण्यासाठी ७३० दिवसांची बाल संगोपन रजा मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्याच्याविना त्यांच्या कुटुंबात कुणी नाही, असे त्यांनी म्हटले होते.