नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही आळंदीत कमालीची अस्वच्छता !
शहरात ठिकठिकाणी उघड्यावर वहाणार्या गटारांच्या सांडपाण्यामुळे डासांचा उपद्रव !
आळंदी (जिल्हा पुणे) – ठिकठिकाणी उघड्यावर वहाणार्या गटारांचे सांडपाणी आणि अस्वच्छता यांमुळे शहरात डासांचा उपद्रव वाढला आहे. आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. नगर परिषदेच्या वतीने कोट्यवधी रुपये घनकचरा व्यवस्थापन, कचरा वेचणार्या कामगारांचा पगार, घंटागाडी यांवर खर्च होत आहे; मात्र शहरातील काही ठराविक भाग सोडला, तर अन्यत्रची स्थिती बिकट आहे.
शहरातील देहूफाटा चौकात गटाराचे सांडपाणी सदोदित उघड्यावर वहात आहे. हीच अवस्था काळे कॉलनी भागात आहे. दोन्ही ठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वहाते. सांडपाणी थेट गरुडस्तंभाच्या पुलावर साचत आहे. हीच अवस्था भागीरथी नाल्यावर आहे. भागीरथी नाल्यावर नियमित स्वच्छता केली जात नसल्याने अधूनमधून खुरटे गवत वाढलेले असते.
फुलांचा कचरा, दुकानांचा कचरा, तर कार्यालयवाले शेष अन्न फेकून देत असल्याने भागीरथी नाल्यावर नियमित स्वच्छतेची आवश्यकता आहे. इथल्या कुंडामधेही कचरा फेकला जातो. सांडपाणी जात असल्याने कुंडाची दुरवस्था झाली आहे. नगर परिषदेने नियमित स्वच्छता करणे आवश्यक बनले आहे.
संपादकीय भूमिकासमस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना काढण्यासह कामे व्यवस्थित होत आहेत कि केवळ पैशांची उधळपट्टी होत आहे, हे पहाणे आवश्यक आहे ! |