‘बकासुर थाळी !’

प्रतिकात्मक छायाचित्र

व्यवसाय करतांना नाविन्यपूर्ण करण्याच्या नादात एका उपाहारगृहामध्ये जेवणाच्या थाळीला ‘बकासुर थाळी’, ‘रावण थाळी’ अशी नावे दिली जात असल्याचे लक्षात आले. अशाच प्रकारे अलीकडेच अनेक उपाहारगृहांनाही ‘बकासुर’ नाव दिल्याचे पहायला मिळाले, तसेच उपाहारगृहाचे नाव लिहिलेल्या ठिकाणी राक्षसाप्रमाणे शिंगे दाखवली होती. ते पाहून ‘जणू काही त्या उपाहारगृहात जाणारी लोक बकासुर आहेत आणि त्या राक्षसाप्रमाणे त्यांचा आहार आहे कि काय ?’, असे वाटले. आजच्या स्पर्धायुगात स्वत:चे वेगळेपण निर्माण करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ लागलेली असते. त्या नादात योग्य-अयोग्य याचा विचार न हाेता ‘केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे’, असा विचार केलेला असतो.

केवळ ग्राहकांना आकर्षित करून खप वाढवण्यासाठी जेवणाच्या थाळीला बकासुराचे नाव देणे, तसेच उपाहारगृहांचा नामोल्लेख करतांना राक्षसाचे नाव देऊन त्याप्रमाणे त्याचे चित्रात्मक वर्णन करणे अतिशय अयोग्य आहे. बकासुर हा राक्षस होता. अध्यात्मशास्त्रानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती तिथे आकृष्ट होते. यानुसार विचार केला, तर बकासुर थाळी मागवल्यावर किंवा तशा उपाहारगृहात गेल्यावर राक्षसाचेच स्मरण झाल्याविना रहाणार नाही. त्याच विचारात तिथे अन्नग्रहणही केले जाणार. राक्षसी वृत्तीच्या आणि रज-तमाच्या विचारांचाच चुकीचा परिणाम मनावर होऊन अयोग्य संस्कार होणार नाही का ? प्रत्येक नावाची आणि चित्राची स्पंदने त्याच्या आजूबाजूला पसरतात. त्या उपाहारगृहाच्या नावाचे बोधचिन्ह उपाहारगृहाचे देयक, मेनूकार्ड आदींवर असणार. त्यातूनही रज-तमाची स्पंदने पसरणार.

एकीकडे आपण ‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे’, म्हणतो. त्याने ग्रहण केल्याने आपण तृप्त होतो. अन्न बनवतांनाही आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, तसे तत्त्व कार्यरत होऊन ते अन्नामध्ये उतरते. जसे की, जेव्हा गृहिणी मनापासून आणि आनंदाने जेवण बनवते तेव्हा ते चविष्ट होते आणि ते खावेसे वाटते. त्यामुळे आपले मनही तृप्त होते; मात्र ‘बकासुर थाळी’सारख्या पदार्थांवर ताव मारतांना राक्षसी वृत्तीनेच आसुरी आनंद घेण्याचा प्रयत्न होणार नाही का ? आसुरी प्रवृत्तीचा मनावर अयोग्य संस्कार होणार हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे उपाहारगृहांना अशी नाव देणे कितपत योग्य आहे ? याचा सर्वांनी विचार करायला हवा. व्यवसाय चांगला होण्यासाठी आणि ग्राहकांनी आकर्षित होण्यासाठी अशा प्रकारचे हानीकारक पर्याय वापरणे चुकीचेच आहे !

– सौ. पल्लवी कणसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.