गोहत्या करतांना व्हिडिओ करून तो प्रसारित करणार्यांवर कठोर कारवाईची निषेध फेरी आणि निवेदन यांद्वारे मागणी !
नळदुर्ग (जिल्हा धाराशिव), १२ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही नळदुर्ग शहरात पवित्र श्रावण मासामध्ये गोहत्या करून त्याचा व्हिडिओ प्रसारित केल्याने समस्त हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणातील दोषींवर गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १० ऑगस्ट या दिवशी समस्त हिंदु संघटनांनी एकत्र येत निषेध फेरी काढली. या वेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी गोहत्या होत असल्याच्या तक्रारी करूनही पोलीस प्रशासन अपेक्षित कारवाई करत नसल्याने यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. व्हिडिओ मधील आरोपी आणि व्हिडिओ प्रसारित करणारा यांना तात्काळ अटक करावी. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदुराष्ट्र सेना, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि गोरक्षक उपस्थित होते.